marathi blog vishwa

Tuesday, 29 August 2023

आम्हा न कळे ज्ञान..

 #सुधा_म्हणे: आम्हा न कळे ज्ञान..

29 ऑगस्ट 23

चोखोबा तत्कालीन समाजाच्या उतरंडीमध्ये अगदी खालच्या पायरीवर होते तरी त्यांचे जगणे, त्यांचे विचार, त्यांच्या आचरणातील सात्विकता ही थोर होती. उच्च दर्जाची होती. अगदी मोजक्या भाषेत, अत्यंत समर्पक असे शब्द वापरुन त्यांनी त्यांच्या मनातील कोलाहल व्यक्त केला ते पाहता त्यांच्या विचारशील, क्षमाशील मनाला वंदन करावेसे वाटते. त्यांच्या रचना पाहता हेही लक्षात येते की त्यांनी बारकाईने कित्येक गोष्टींचा अभ्यास केला आहे. “अभ्यासोनी प्रकटावे..” ही समर्थांची उक्ती इथे प्रत्ययास येते. तत्कालीन समाजात वेद, उपनिषदे, शास्त्रे, योगविद्या, तपाचरण, अनेक प्रकारच्या देवतांच्या उपासना, व्रते अशा विविध गोष्टींचे अनुकरण केले जात होते. त्यामुळे अशा गोष्टींचा अभ्यास करणारी मंडळी विद्वान म्हणून नावाजली जात होती. गौरवली जात होती.

 

त्यामुळेच चोखोबा म्हणतात,

आम्हां न कळे ज्ञान न कळे पुराण । वेदांचे वचन न कळे आम्हां ॥१॥

आगमाची आढी निगमाचा भेद । शास्त्रांचा संवाद न कळे आम्हां ॥२॥

योग याग तप अष्टांग साधन । न कळेची दान व्रत तप ॥३॥

चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा । गाईन केशवा नाम तुझें ॥४॥

त्या काळी अनेक विद्वान होते, देवभक्त होते. पुजारी किंवा पुरोहित होते. मात्र कित्येक मंडळी केवळ अभ्यासू असली तरी त्यांच्यात माणूसपणाचा अभाव होता हेही इतिहास पाहताना दिसून येते. उदंड अभ्यास केल्याने माणसातले काठिन्य भंगले पाहिजे, त्यांच्या चित्तवृत्ती उदार, क्षमाशील व्हायला हव्यात. मात्र या ऐवजी असे लोक माणसा-माणसात दुरावा निर्माण करतात. शास्त्राचे दाखले देत समाजात भीती निर्माण करतात. पुरोहित किंवा पुजारी वर्गातदेखील तेंव्हा विविध जाती होत्या, त्यांच्याकडून देखील दडपशाही केली जात असे. निव्वळ हीन जातीतील असल्यामुळे चोखोबाना देखील जिवंत असेतोवर विठ्ठल दर्शन घेताच आले नाही. विठ्ठालाचे नामस्मरण करत आपल्या कामात गुंतलेले असताना भिंत कोसळून त्यात त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांची वेदना, असहाय्य आक्रोश केवळ त्यांच्या अजरामर शब्दातून ठिबकत राहिला.

हा अभंग म्हणजे अशा पुरोहित वर्गावर त्यांनी केलेली उपरोधिक टीका आहे. कोणत्याही शास्त्राचे अध्ययन करता येत नाही. मला तर वेद वगैरे काहीच कळत नाही. तरीही देवाला माझा भोळा भाव समजतो, मी प्रेमाने मारलेली हाक त्याला ऐकू जाते. त्यामुळे देव जात पात न पाहता सर्वांवर समदृष्टीने कृपा करतो. तो आपल्याला अप्राप्य नाही. आपण त्याचे नाव घेत राहणे पुरेसे आहे असे सांगत चोखोबा जणू या पुरोहित वर्गविरुद्ध बंडाचा मूक आणि निग्रही झेंडा उभरतात असे वाटते.

-सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com)



No comments:

Post a Comment