#सुधा_म्हणे: नको देवराया अंत आता पाहू..
22 ऑगस्ट 23
संत कान्होपात्रा हे नुसतं नाव जरी उच्चारले तरी कारुण्य मनभर दाटून येते. किती हृदयद्रावक आहे तिची कहाणी. पंढरपूर जवळच्या मंगळवेढे गावातील एका श्रीमंत गणिकेची ही देखणी मुलगी. हाताखाली अनेक नोकर चाकर असलेली ही मुलगी लाडात वाढली. त्या पेशानुसार नाच गाणे शिकली. अत्यंत देखण्या कान्होपात्रेची ख्याती हळूहळू सर्वत्र पसरू लागली. गावातील मुखिया सदाशिव मालगुजर हा तिचा बाप असे तिच्या आईने सांगितलेले. मात्र त्यालाच ती हवीशी वाटू लागली. तिने माझ्याकडे यावे, समोर नाच गाणे करावे असे तो वारंवार तिच्या आईला सांगू लागला. दोघीनी जेंव्हा त्याला नकार दिला त्यानंतर मग त्याने अनंत प्रकारे त्रास दिला. त्यांची अवस्था बिकट झाली. उदरनिर्वाह नीट चालेना. शेवटी आईने, मनाविरुद्ध तिला त्याच्याकडे पाठवायचे कबूल केले. ही गोष्ट कळताच कान्होपात्राने तिथून पलायन केले. ती पंढरपूर मध्ये जाऊन राहिली.
पंढरपुरी आल्यावर इथल्या संत सज्जनांमध्ये ती भजन कीर्तन आदि भक्तीरंगात रंगून गेली. पेशाने गणिका असली तरी कान्होपात्रा मात्र देवभक्तीत रमलेली असे. तरीही तिच्या सौंदर्याची सर्वत्र खूप चर्चा होऊ लागली. पाहता पाहता तिच्याविषयीची माहिती बादशहाला कळली. पंधराव्या शतकात त्या प्रांतात बिदरच्या बादशहाची सत्ता होती. त्याला तिचा मोह पडला. त्याने बोलावणे पाठवले. तिने नकार दिला. शेवटी तिला पकडायला सैनिकांची तुकडी आली. ज्याच्या प्रेमात, ज्याच्या भक्तीसाठी आपण सगळे सोसतो आहोत तो विठोबा अजूनही मला उराशी धरत नाही म्हणून मग कान्होपात्रा आक्रंदन करू लागते,
नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सवर्था जाऊ पाहे
हरीणीचे पाडस व्याघ्रे धरियेले , मजलागी जाहले तैसे देवा
तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी,धावे हो जननी विठाबाई
मोकलुनी आस, जाहले उदास, घेई कान्होपात्रेस हृदयास
नको देवराया अंत आता पाहू ,प्राण हा सवर्था जाऊ पाहे ..
हरिणीच्या पाडसाला धरून जेंव्हा वाघ त्याच्या नरडीचा घोंट घेऊ पाहतो त्यावेळी त्याला जी मरणप्राय वेदना होईल तसे दुःख मी झेलत आहे. तुझ्याशिवाय आता माझे कुणीच नाही त्यामुळे आता मला अधिक अंत पाहू नको, मला तुझ्यात मिसळून जाऊ दे असं सांगत कान्होपात्रा विठोबाच्या चरणी आपले प्राण अर्पण करते. स्त्रीचे आयुष्यच किती वेगळे. सतत कुणाच्या तरी वासनामय नजरा, स्पर्श झेलत राहणारे. तिच्याकडे कित्येक युगे समाज भोगवस्तू म्हणून पाहत राहिला. कान्होपात्रा सारखी स्त्री, पेशाने गणिका असली म्हणून काय झाले, तिला तिचा अधिकारच नव्हता. मात्र तरीही कान्होपात्रा झुकत नाही. समोरच्या बलवान बादशहाची मागणी जर तिने मान्य केली असती तर कदाचित तिला राजमहालात राहण्याचे सुख मिळाले असते. पण ती योगिनी होती. तिला फक्त विठ्ठलाच्या सहवासातील सुख मोलाचे वाटत होते. भौतिक सुखाच्या कल्पनांच्या ती पार निघून गेली होती. विठ्ठलाच्या भक्तीमध्ये रमून राहण्यासाठी लागेल तेवढे दुःख भोगायची तिची तयारी होती. ज्या देहाला विठोबाचे मानले आहे त्या देहाला विटाळण्यापेक्षा म्हणूनच ती मरण सुखकर मानते.
हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावविभोर आवाजात हे आर्त गीत ऐकताना मन भरून येते. खरतर हे स्त्रीचे आक्रंदन. भैरवीच्या सुरात हृदयनाथ ते असे काही आपल्याला ऐकवतात की मन वेदनेने भरून येते. असहाय्य तरीही स्वाभिमानी कान्होपात्रेची ही हृदय हेलवणारी कारुण्यमय गाथा ऐकताना डोळे कधी वाहू लागतात ते खरंच कळत नाही.
- सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com)
No comments:
Post a Comment