marathi blog vishwa

Friday, 11 August 2023

कौन कहता हे भगवान आते नहीं...

 #सुधा_म्हणेकौन कहता हे भगवान आते नहीं...

11   ऑगस्ट 23

ईश्वर. कुठं असतो, कसा असतो, कसा दिसतो, काय करतो अशा सगळ्या गोष्टींची आपण फार चर्चा करतो. आपल्याला देव किंवा ईश्वर आठवतोच तोच मुळी अडचणीत आल्यावर, संकट आल्यावर. खरे तर आपल्या संस्कृतीत असे म्हटले आहे की या चराचरात ईश्वर भरलेला आहे. काहीजण म्हणतात, या दगडात कुठे देव आहे? पण दगडच कशाला, इथली माती, झाडे, पाने, फुले, नदी, तलाव सगळ्यातच तर देव आहे. आपल्याला जगायला बळ देणारी प्रत्येक गोष्ट म्हणजेच ईश्वर. 

आपण तहानलेले असताना कधी तो नदी बनून येतो तर उपाशी असताना फळ बनून येतो. त्याला हवी असते प्रेमाने मारलेली फक्त एक हाक. कित्येक वर्ष आपल्याकडे एक पद फार लोकप्रिय आहे त्यात अगदी असेच म्हटले आहे...

अच्चुतम केशवं कृष्ण दामोदरं, राम नारायणं जानकी ल्लभम..

कौन कहता हे भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं..

कौन कहता है भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं

कौन कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं

कौन कहता है भगवान नाचते नही, गोपीयो जैसे तुम नचाते नहीं

नाम जपते चलो काम करते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो

याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी..........

ज्यावेळी आपल्याला त्याची अतीव आठवण येते, त्याला भेटल्याविना आता तरणोपाय नाही असे वाटते तेंव्हाच तो भेटतो. त्यासाठी आपण मीरा व्हावे लागते. तो केवळ भावाचा भुकेला. त्याला आपण मात्र आपल्या स्वार्थासाठी लालूच देत रहातो. कुणी 101 रु देतो, कुणी डोक्यावर एक लीटर दूध अभिषेक म्हणून घालतो तर कुणी उत्तमोत्तम फुलांनी त्याला शृंगारू पाहतो. त्याला तर तुम्ही प्रेमाने दिलेली उष्टी बोरे, तुमच्याच पानावरील एखादा घास पुरतो. लहानपणी आपण विविध कहाण्या ऐकायचो त्यातल्या “खुलभर दुधाच्या” कहाणीसारखे उरलेले थोडेसे दूध देखील त्याला पुरते.

लहानपणापासून आपण विविध चित्रे पाहिलेली असतात, हल्लीच्या काळात टीव्ही, सिनेमामधून देवाच्या भूमिका करणारे नट/नट्या पाहतो. म्हणून आपल्याला वाटते की देव असाच. त्यामुळे आपल्या अडी-अडचणीला मित्र बनून, डॉक्टर बनून, व्यापारी बनून, एखादा फकीर बनून, एखादा नातेवाईक बनून जेंव्हा तो आपल्याला हळूच अडचणीतून बाहेर काढतो तेंव्हा आपणच त्याला ओळखू शकत नाही. त्याने तर आपल्याला हात-पाय-बुद्धी सगळं दिले आहे. त्यामुळे दर वेळी संकट आले तरी यातून मी नक्की तरुन जाईन, तू फक्त सोबत रहा इतकेच पुरेसे. आणि जेंव्हा खरच सगळे हाताबाहेर जाते तेंव्हा तो एका हाकेच्या अंतरावर असतोच. समर्थ म्हणतात तसं, “सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्प धारीष्ट्य पाहे..” हेच खरे. त्यामुळे फक्त श्रद्धा आणि विश्वास हवा आणि आपणच त्याला आर्त हाक मारायला हवी.!

( ब्लॉग वर anonymous म्हणून कमेंट करताना कृपया नांव लिहावे म्हणजे तुमच्या प्रतिक्रियाना उत्तर देता येईल. )

-    - सुधांशु नाईक( nsudha19@gmail.com )




No comments:

Post a Comment