#सुधा_म्हणे: 104 : म्हारे भूल मत जाज्यो जी..
09 ऑगस्ट 23
एका राजघराण्यात जन्मलेल्या मीरेची पार्श्वभूमी किती वेगळी. रतनसिंह या राजपूत राजांची ही एकुलती एक मुलगी. असं मानले जाते की, लहानपणीच एक लग्न समारंभ पाहताना मीरेने आईला विचारले की माझा नवरा कोण ? त्या निरागस प्रश्नाला उत्तर देताना आई ने कृष्णाच्या मूर्तीकडे बोट दाखवून म्हटल की, हा कृष्ण तुझाच ! आणि तेंव्हापासून मीरा कृष्णाची झाली.
तिचे पुढे लग्न करून दिले गेले राणासोबत. मात्र ती कधीच त्यांची होऊ शकली नाही. तिच्या अतीव कृष्णप्रेमाची थट्टा केली गेली. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले. ती मंदिरात चोरून कुणाला तरी भेटते अशा वावड्या तिच्या जवळच्या नातेवाईकानीच उठवल्या. तिची शेकडो प्रकारे परीक्षा पहिली गेली. ती मंदिरात असताना जेंव्हा अचानक तिथं लोक पोचले तेंव्हा मात्र त्यांनी पहिले की कृष्णाच्या मूर्तीशी बोलणारी मीरा भान हरपून त्याच्या भजनात रंगून गेली आहे. मग तिला वेडी ठरवले गेले. असं म्हंटले जाते की, मीरा स्नान करून बाहेर आल्यावर ज्या ठिकाणी आपले कपडे परिधान करायची, तिथं कपड्यात विषारी सर्प लपवून ठेवला गेला. मात्र तरीही तिला इजा झाली नाही. पुराण कथेत जसं सतत विष्णुनाम घेणाऱ्या प्रल्हादाला त्याच्याच पित्याने अतिशय त्रास दिला तसाच त्रास मीरेने देखील सोसला. तिला किती त्रास दिला गेला तरीही तिची नजर कृष्णाला शोधत राहिली. त्याच्यावरील तिचे प्रेम, तिची भक्ती अधिक वाढत राहिली.
तिने त्याला मनोमन आपला मानले आणि सगळ्या त्रासाला ती हसत हसत सामोरी गेली. तिने कधीही कुणाही विषयी वाईट विचार केले नाहीत की कुणाला शाप दिले नाहीत. ती फक्त व्याकुळपणे कृष्णाला विनवत राहिली, बोलवत राहिली. याविषयी मीरा लिहिते,
नैणां आगे रहज्यो जी, म्हारे भूल मत जाज्यो जी।
भौ-सागर में बही जात हूं बेग म्हारी सुधि
लीज्यो जी।।
राणाजी भेज्या बिखका प्याला सो इमरति कर
दीज्यो जी।
मीरा के प्रभु गिरधर नागर मिल बिछुडन मत
कीज्यो जी।।
“आता भेटायचं आणि मग विरहाचे दुःख देत पुनः निघून जायचं असं यापुढे करू नकोस” हे मीरा इतक्या काकुळतेने कृष्णाला विनवत राहते की आपलेही डोळे भरून येतात.
- सुधांशु नाईक (9833299791)
No comments:
Post a Comment