#सुधा_म्हणे: मीरा के प्रभू कब रे मिलोगे..
08 ऑगस्ट 23
वाचकहो, मीरेचे अवघे आयुष्यच किती वेगळं. ती फकिरी स्वीकारते आपल्या प्रिय अशा गिरीधरसाठी. जिच्यासाठी सगळी सुखं सहज उपलब्ध होती ती रानोमाळ भटकत राहते. तिच्या अवघ्या देहातून, शब्दातून केवळ वेदना पाझरत राहते. त्या वेदनेचेच मग गाणे होते. गीतकार शैलेन्द्र एकदा म्हणून गेले होते की,
है सब से मधुर वो गीत जिन्हे हम दर्द के सूर में गाते है..!
मीरेची पदे आपल्या काळजाला जाऊन भिडतात कारण तीही कृष्णभेटीची आस लागलेल्या मनाची अशीच तडफड उघडपणे दाखवणारी. उत्स्फूर्तपणे तिच्या मनातून उमटलेली. “मीरा बिरहिणी” हे तिचं व्याकुळ रूप आपल्यालादेखील अस्वस्थ करते. रोजचं आयुष्य आपण जगत असतोच, अन्न, वस्त्र, झोप, कामं हे सारं करताना ज्याची आस लागलीये त्या प्रियाचा विचार कायमच मनात असतो. कितीही कशातही मन गुंतवायचे प्रयत्न केले तरी अपयशी ठरतात. त्याला भेटण्याची उत्कट भावना सगळ्यापार जाते. तेंव्हा मीरा म्हणते,
प्रभु जी तुम दर्शन बिन मोय घड़ी चैन नहीं आवड़े॥
अन्न नहीं भावे, नींद न आवे, विरह सतावे मोय।
घायल ज्यूं घूमूं खड़ी रे, म्हारो दर्द न जाने कोय॥
तिची विरहव्यथा
इतकी तीव्र आहे की भूक नाही, तहान नाही, झोप लागत नाही अशी सतत भरून उरलीये एक
तीव्र ओढ. एखाद्या जखमी व्यक्तीसारखी ती तडफडत आहे केवळ आपला तो भेटावा म्हणून आणि
तिची ही व्यथा समजून घ्यायलादेखील कुणी नाही..!
जो मैं ऐसा जानती रे, प्रीत कियां दुख होय।
नगर ढुंढेरौ पीटती रे, प्रीत न करियो कोय ॥
प्रेम काय कधी
कुणावर ठरवून करता येत नाही. मात्र एकदा प्रेम केलं की खूप काही सोसावं लागतं. सतत
ती विरहवेदना तनामनाला सतावत राहते. मीरा कळवळून सांगत राहते की कुणी असं प्रेम
करू नका रे कारण मग त्यातून सुटका होत नाही. पण जसं ठरवून प्रेम करता येत नाही
तसंच होणारे प्रेम टाळताही येत नाही. आणि मग नशिबी येते जिवलगापासून दूर राहणे. यशवंत
देव त्यांच्या एका कवितेत विरहिणीची मनोगत व्यक्त करताना म्हणतात;
तुझ्या एका हाकेसाठी, आले दिशा ओलांडून, दिली सोडून रहाटी
दंगा दारात हा माझा, तुझ्या
एका हाकेसाठी..
तुझ्या एका हाकेसाठी, किती बघावी रे वाट,
माझी अधीरता मोठी, तुझे
मौनही अफाट..
पन्थ निहारूं डगर भुवारूं, ऊभी मारग
जोय।
मीरा के प्रभु कब रे मिलोगे, तुम
मिलयां सुख होय ॥
अवघे आयुष्य आपल्या मनमोहनाच्या भेटीसाठी झुरत राहिलेल्या मीरेची ही व्याकुलता सगुणभक्तीची एक विलक्षण कहाणी बनून अजरामर होऊन जाते. ज्याच्या उत्कटतेपुढे, त्या समर्पणापुढे आपण नतमस्तक होऊन जातो.
मीराबाईंच्या भजनांचे सुंदर रसग्रहण केलंय सुधांशु सर. हे तर प्रसिद्ध भजन आहे. 🙏💐🙏
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखुप छान रसग्रहण
ReplyDeleteधन्यवाद
Delete