marathi blog vishwa

Tuesday, 31 October 2023

माणसातील प्रेम वाढते राहो..

#सुधा_म्हणे: माणसा-माणसातील प्रेम वाढते राहो..

31 ऑक्टोबर 23

माणसांच्यात निर्माण होणारी प्रेमभावना कशी विविध स्तरावर असते हे आपण कालच्या लेखात पाहिले. कोणत्याही नात्यात प्रेमभावना ही चटकन निर्माण होऊ शकते. बरेचदा त्यासाठी बाह्य घटक जास्त कारणीभूत असतात. एखाद्याचे दिसणे, बोलणे, चालणे, हावभाव आदि गोष्टींचा जास्त प्रभाव आपल्यावर पडतो. त्यामुळे माणसे आकर्षित तर जरूर होतात पण त्यापुढे जाऊन ते नाते टिकवू शकतातच असे नाही. “दुरून डोंगर साजरे..” या म्हणीप्रमाणे दुरून सगळे छानच वाटते. मात्र जेंव्हा आपण एकमेकांच्या जवळ असतो तेंव्हा विविध गोष्टी टोचू लागतात. त्या काही नव्याने आलेल्या नसतात. त्या आधीपासून असतातच. पण प्रेमाच्या सुरुवातीच्या बहरात त्याकडे आपलेच दुर्लक्ष झालेले असते. त्यामुळे लहानपणी एखाद्या बबडूच्या सुस्त वागणुकीबद्दल कौतुकाने सांगणारी आई नंतर त्यालाच रोज शिव्या देत राहते. तेच पती-पत्नीच्या नात्यात, सासू- सुनेच्या नात्यात, प्रियकर प्रेयसीच्या नात्यात, मित्र किंवा मैत्रिणींच्यातही घडू शकते. सुरुवातीला नाते नवे असताना आपण आपल्या अनेक सवयीना, विचारांना दुसऱ्याचा विचार करून मुरड घालतो. मात्र तसे मनाला कुणी जास्त काळ रोखू शकत नाही. तिथे प्रेमभावनेचा कस लागतो.


आपल्या समोरची व्यक्तीसोबत अधिकाधिक सहवास जसा मिळत जातो तसतसे आपल्याला कळत जाते की आपली प्रेमभावना सच्ची आहे की फक्त सुरुवातीची ती तीव्रता अधिक होती. आणि या टप्प्यावर अपेक्षेपेक्षा स्वीकार महत्वाचा ठरतो. एखाद्या घरात सुरुवातीला सासू-सुनेचे अजिबात पटत नाही. मात्र काही काळ गेल्यानंतर दोघीनाही कळते की आपण एकतर एकाच पद्धतीने विचार करतो आहोत किंवा आपले मार्ग खरेच वेगळे आहेत. जर त्यांनी परस्परांचे विचार समजून घेतले तर नाते अधिक समृद्ध होते. किरकोळ कुरबुरी सुरु राहिल्या तरी एकमेकाना समजून घेतल्याने नाते लोणच्यासारखे मुरत जाते. तर यापेक्षा उलटे वागत जर रोज उठून जे आवडत नाही, जे पटत नाही त्यावर बोलणे, वाद घालणे हे घडले तर आहे ते नाते विरून जाते. त्यातला ओलावा संपून जातो.

दोन भिन्नलिंगी जीवांच्यात प्रेमभावना निर्माण होणे सोपे असते मात्र ती जपणे, एकमेकांचा अधिकाधिक विचार करून ती प्रेमभावना वृद्धिंगत करणे जास्त कठीण असते. त्यासाठी परस्परांना समजून घेता यायला हवे. दुसऱ्याला खुपणारे आपल्या स्वभावातील टोकेरीपण घासून काढता यायला हवे. परस्परांचा विचार करून, एकमेकांसाठी  जे जे उत्तम ते करू पाहणे, आपले अहंकार बाजूला ठेवणे, एकमेकाना सुखी करण्यासाठी समर्पण करणे ज्याना जमते त्यांची नाती अधिक परिपक्व होऊन जातात. त्यांच्या जगण्याला स्थिरता येते. शांतता येते. त्यांचे सहजीवन सुंदर बनते. सर्जनशील प्रवृत्तीने ते आपले विश्व अधिक सुंदर, अधिक भव्य करण्याची वाट चालत राहतात. 

प्रेमभावनेचा उत्कट आविष्कार अनुभवलेली, जिवलग लाभलेली अशी माणसे मग जग सुंदर करण्यासाठी अधिकाधिक कार्यरत होऊन जातात. माणसा-माणसातील प्रेम वाढत राहणे हे म्हणूनच किती सुंदर आहे ना?

-सुधांशु नाईक(9833299791)

Monday, 30 October 2023

माणसे आणि प्रेम...

#सुधा_म्हणे: माणसे आणि प्रेम.. 

30 ऑक्टोबर 23 

माणसे जन्माला येतात तीच मुळी उरात प्रेमभावना घेऊन. आईच्या उदरात असताना तिच्या श्वासाशी, तिच्या शरीराशी आपण एकरूप झालेलो असतो. गर्भातील त्या वातावरणाशी आपली शब्दश: नाळ जुळलेली असते. तिथून बाहेर आल्यावर त्या आईविषयी प्रेम असते ते अधिक स्पष्ट जाणवते. मग आसपासचे जग दिसू लागते. डोळ्याना माणसे, वस्तू, झाडे, पाने, फुले, घरे, नदी, समुद्र असे सगळे सगळे दिसू लागते. काही गोष्टींबाबत फार प्रेम वाटते तर काही गोष्टींबद्दल कधी भीती, कधी तिरस्कार, कधी क्रोध, कधी मत्सर वाटत राहतो. कित्येकदा असे होते की कालांतराने आपल्या भावना बदलूही शकतात किंवा आहे तशाच कायम राहतात. कित्येक माणसे आपल्याला सुरुवातीला अजिबात आवडत नाहीत किंवा काहीजण प्रथम भेटीत आवडून जातात. कुणीतरी त्यांच्याविषयी काही खरे-खोटे बोललेले असते. तेच आपण मनाशी ठरवून ठेवतो. मात्र कालांतराने त्यांच्या संपर्कात आल्यावर मग आपल्याला ती व्यक्ती नक्की कशी आहे हे तपासून पाहता येते. सुरुवातीला आपल्या डोळ्यांवर जणू एक पडदा असतो. चांगल्या किंवा वाईट विचारांचा. त्याच नजरेने आपण पाहत बसतो. जेंव्हा आपण एखाद्याला त्याच्या गुण आणि अवगुणासकट स्वीकारतो तेंव्हा जी प्रेमभावना मनात राहते तीच खरी असे म्हणायला हवे.


जेंव्हा एखाद्या व्यक्तीविषयी तुम्हाला प्रेम वाटते तेंव्हा तुम्ही त्याचा एखादा न आवडणारा स्वभावगुण वा लकब, त्याची विशिष्ट वर्तनशैली स्वीकारू शकता का हाच मुख्य प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. आपण त्याला हे दोष, किंवा हे अवगुण दाखवून दिल्याने तो दुखावेल का असा विचार करून जर त्याबाबत बोलणे टाळले तर ते योग्य नव्हे. त्याला ते न्यून दूर करण्याची मग संधीच मिळणार नाही. अर्थात जेंव्हा आपले एखाद्या व्यक्तीवर प्रेम असते तेंव्हा त्याच्यामधील हे अवगुण कमी व्हावेत, संपून जावेत म्हणूनदेखील आपण प्रयत्न करायला हवेत.

आधी प्रेम या शब्दाकडे आपण मुळात नीट पाहायला हवे. कारण प्रेम हा शब्द आपण फार वरवर किंवा उथळपणे वापरतो असे मला वाटते. प्रेम म्हटले की सर्वसामान्य लोकांना फक्त “प्रियकर प्रेयसी” चे प्रेम आठवते. मजेची गोष्ट म्हणजे त्याकडे देखील आपण निर्व्याज नजरेने पाहत नाही. “दुसऱ्याने केले तर ते लफडे..” असाच सर्वसाधारण लोकांचा समज. निसर्गाच्या नियमानुसार भिन्नलिंगी व्यक्तिमध्ये जिव्हाळा निर्माण होतोच. त्या प्रेमाचे किती स्तर असतात. मानसशास्त्राच्या अभ्यास करताना बहुसंख्य वेळा आई-मुलगा, बाप-मुलगी, भाऊ-बहीण, नवरा-बायको, मित्र-मैत्रीण, सासरा-सून आदि भिन्नलिंगी नात्यात जास्त जिव्हाळा किंवा जवळीक असल्याचे जाणवते जितकी जवळीक बाप-मुलगा, सासू-सून, बहिणी-बहिणी यांच्यात नसतेच. त्याची अनेक कारणेदेखील असतात. शारीरिक आणि मानसिक पातळीवर आपल्या मेंदूत / विचारात अनेक लोचे होत असतात ज्यामुळे अशा प्रेमभावना निर्माण होतात. भरपूर वाढतात किंवा संपून जातात. आपल्याला त्याकडे स्थिरपणे पाहता यायला हवे.

प्रेम नीट फुलवले तर ते आनंद देते. जसे एखाद्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत हळुवार रंगत गेलेले गायन असते तसे. तिथे कुणी गायक/वादक एखादा राग उभा करतो, रंगवतो. प्रेमाचे नाते तसेच. जसे त्या रागाचे सगळे स्वर तेच असले तरी प्रत्येक कलाकाराची मैफल वेगळी भासते. त्याचे कारण त्याने केलेली उपज. ठरवलेले, शिकलेले इतकेच जर त्याने गायले तर काही मैफिली झाल्यावर मग त्याच्या गाण्यात मजा आहे असे वाटत नाही. मात्र एखादा गायक नवनवीन स्वरावल्याची निर्मिती म्हणजे “उपज” करत राहतो. आपले गाणे अधिक सर्जनशील करत राहतो. स्वतःही आनंद घेतो आणि दुसऱ्यालाही आनंद देतो. प्रेमाचे नाते असेच असते. तिथे एकमेकाना जपण्यासाठी नवनवीन कृतींची उपज हवी. आपण केलेल्या अशा छोट्या छोट्या कृतींमुळे नाते फुलते. प्रेम वाढत राहते. ही वाढत राहणारी प्रेमभावना आपल्यातील न्यून कमी करून गुण वाढवायला मदत करते. कृतिशील बनवते. नवनवीन काहीतरी करायला प्रेरणा देत राहते. असे प्रेम करणारे जिवलग आपल्याजवळ असणे यासारखी दुसरी आनंदी गोष्ट नाही असे मला वाटते.

-सुधांशु नाईक(9833299791)

Saturday, 28 October 2023

माणसे आणि भूतदया

#सुधा_म्हणे: माणसे आणि भूतदया

28 ऑक्टोबर 23

गावात घुसलेल्या गव्याला हुसकावून लावणाऱ्या जमावाची चित्रफीत पाहताना एक मित्र तावातावाने म्हणत होता, “अरे, माणसे माणसाशी नीट वागत नाहीत तर प्राण्याशी कशी नीट वागतील?” त्याचदिवशी संध्याकाळी बातमी आली की एका मोठ्या कंपनीच्या अधिकाऱ्याचा भटक्या कुत्र्यानी चावल्यामुळे अचानक मृत्यू झाला. आणि सर्वत्र सोशल मिडियात चर्चा रंगली की समस्त भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करायला हवा आहे वगैरे. आपल्या आसपास एखादा अपघात घडतो, एखादी गाडी आपल्याला धडक देऊन जाते  म्हणून लगेच आपण सगळ्या गाड्यांवर बंदी आणतो का? मग हे फक्त कुत्र्यांच्या बाबतीतच का? ते बोलू शकत नाहीत म्हणून ?

जग हे परस्पर सहकार्य आणि सामंजस्यावर चालते. शक्यतो जंगलातील प्राणी आपणहून कुणावर आक्रमण करत नाहीत. ते आपल्या वाटेने जात असतात. आपल्या परिघात राहतात. माणसे अशी वागत नाहीत. खूपशी माणसे शांत रहातात. आपल्या आखलेल्या वाटेवरून इतराना इजा न करता चालत राहतात. मात्र अनेकांना सतत हव्यास असतो अधिक जमीन हवी, अधिक पैसा हवा, अधिक चैन – मौज मस्ती हवी. आणि मग ही माणसे इतरांकडून त्या गोष्टी ओरबाडून घेऊ लागतात. अशाच माणसांनी मग जंगलावर अतिक्रमण केले. नदीवर, समुद्रावर, तलावांवर अतिक्रमण केले. प्रत्येक गोष्ट आपल्या फायद्यासाठी हवी म्हणून अनेक प्राण्याना गुलाम बनवले. प्रत्येक प्राणी केवळ आपल्याला काय देईल याचाच विचार केला. दूध, कातडी, मांस तर आपण त्यांच्याकडून घेतोच पण शारीरिक कष्टदेखील करायला लावतो. इतकेच नव्हे तर त्यांना करमणुकीसाठी देखील वापरुन घेतो. एकेकाळी आपण सर्कस पहायचो. त्यात विविध वन्यप्राण्याना माणसाला हवे आहे तसे प्रशिक्षित होण्यासाठी किती वेदना सहन करायला लागायच्या. हे किती अमानुष आहे. सुदैवाने आता त्यावर बंदी आली आहे.

तशीच गोष्ट शिकारीची. माणसे स्वत:च्या करमणुकीसाठी शिकार करत होती. अनेक प्राण्यांचे जीव घेतले गेले. वाघ, चित्ते, सिंह यांच्यासारख्या देखण्या प्राण्यांना, कित्येक दुर्मिळ प्रजातीच्या पक्ष्यांना आपण नष्ट केले. जे जीव उरले त्यांच्यासाठी कित्येक जंगलात पुरेशी जागाच उरली नाही. जंगले मोठ्या वेगाने संपत गेली. कित्येक प्रजाती आता अस्तित्वात नाहीत त्याला मोठ्या प्रमाणात माणूस कारणीभूत आहे.


ज्या वेगाने हे घडत गेले त्यामुळे मग माणसाचे डोळे उघडले. अनेक संस्था स्थापन झाल्या. हे विश्व विविधतेने भरलेले आहे. यामध्ये सगळे प्राणी असणे, त्यांना त्यांचे जीवन सुखाने जागता येणे हेही गरजेचे आहे हे मानवाला उमगले आहे. आपण ज्या प्राण्याना पाळतो त्यांच्याशी तरी आपण प्रेमाने वागायला हवे. कुत्रा, मांजर, गाय, बैल, म्हैस, रेडा आदि प्राण्यांच्या सहवासाने आपल्याला फायदाच होतो. त्यांना नीट हाताळले पाहिजे. आज देशसंरक्षण सारख्या महत्वाच्या गोष्टीत प्रशिक्षित कुत्रे अतिशय मोलाची कामगिरी बजावत असतात. आपण त्यांना प्रेम दिले तर तेही आपल्याला प्रेम देतात हे पाहायला मिळते. हे जग त्यांचेदेखील आहे हे समजून घ्यायला हवे. एका छोट्याशा मुंगीपासून हत्ती पर्यन्त सगळे जीव इथे परस्पर सामंजस्याने राहत असतात. आपण त्यांच्याप्रती अधिक माया दाखवली तर ते निर्भयपणे जगू शकतील. लहानपणापासून कुत्रा, मांजरे आदि प्राण्यांच्या सहवासात राहिल्यामुळे असे वाटते की योग्य ती काळजी घेतली तर आपण नक्कीच अशा घटना टाळू शकू. एखादा दुर्दैवी अपघात घडला म्हणून सर्व प्राण्यांच्यावर सूड उगवणे अन्यायकारक आहे. आपण त्यांच्यावर जितके अत्याचार करतो त्याच्या तुलनेत अशा तुरळक घटना या काहीच नव्हेत..

समाजातील महत्वाचा घटक म्हणून आपण इतराना भूतदया दाखवायला हवी. त्यांना मुक्त असे त्यांचे अधिवास द्यायला हवेत असे मला वाटते.

-सुधांशु नाईक (9833299791)

Friday, 27 October 2023

माणसे: अपयश आणि सहकार्य

#सुधा_ म्हणे: माणसे: अपयश आणि सहकार्य 

27 ऑक्टोबर 23

आपल्या आयुष्यात आपण ठरवलेले ध्येय साध्य करता येणे यातला आनंद तर अवर्णनीय असतो पण जेंव्हा अपयशी होतो तेंव्हा? तेंव्हा काय करायला हवे? सगळे काही चांगले असते तेंव्हा अधिक विचार करावा लागत नाही. पण जेंव्हा सगळीच गणिते चुकतात तेंव्हा मात्र अधिक विचार करणे क्रमप्राप्त ठरते. अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे घासून गुळगुळीत झालेले वाक्य आपण सगळेच अनेकदा वापरतो. मात्र अपयशी झाल्यावर काय वाटते ते ज्याचे त्यालाच ठाऊक असते. यश, विजय हवी ती गोष्ट मिळणे यासाठी अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. योग्य ते प्रयत्न, अचूक नियोजन, पुरेशी आर्थिक तरतूद, कुशल कर्मचारी, ऐनवेळी येणाऱ्या अडचणी ओळखून तयार ठेवलेले प्लॅन बी, उत्तम जाहिरात तंत्र आणि शेवटी आपले नशीब हे सगळे एकत्र येते तेंव्हा यशाची शक्यता खूप जास्त असते. मात्र जेंव्हा यातील एखादी गोष्ट नीट घडत नाही किंवा आपल्याकडून चुका होतात तेंव्हा अपयश येणे, पराभूत होणे घडते. अपयशी होणे या घटनेपेक्षाही त्यानंतर आपण कसे वागतो, काय करतो हे जास्त महत्वाचे ठरते.


अपयशी झाल्यावर सगळे काही उदास उदास वाटू लागते. आर्थिक फटका बसला असेल, कर्ज वगैरे डोक्यावर वाढले असेल तर ते कसे भागवायचे याची चिंता भेडसावू लागते. त्यामुळे मानसिक ताण तणाव निर्माण होतात. ती व्यक्ती आणि तिच्या परिघातील घरचे, बाहेरचे अशा सर्वच लोकाना असंख्य नकोशा गोष्टीना तोंड द्यावे लागते. थकलेला जीव मग लोकाना टाळायला लागतो, घरातच बसून राहू पाहतो. लोक देखील त्या व्यक्ती टर उडवत राहतात. काहीजण हा तणाव सोसू शकत नाहीत आणि आयुष्य संपवून बसतात. मात्र यामुळे प्रश्न सुटतात का? 

जो निघून गेला त्याच्या माघारी उरणाऱ्या लोकानी काय करावे ? त्यांनी कसे जगावे? एखाद्याला आलेल्या अपयशाचा  लोक इतका बाऊ का करतात ? त्याऐवजी त्या व्यक्तीला खरेतर आपण मायेने वागवायला हवे. त्याची काही चूक नसताना जर अन्य कारणामुळे यश हुकले असेल तर दिलासा द्यायला हवा. त्याच्याच चुकीमुळे अपयश आले असेल तर ती चूक नीट दाखवून द्यायला हवी. मित्रहो, जेंव्हा एखाद्याला अपयश येते तेंव्हा त्याला सर्वात जास्त गरज असते ती सहकार्याची. 

अपयश पदरी पडण्यात कदाचित त्याची चूक कारणीभूत असते किंवा परिस्थिती. मात्र या क्षणी त्याला आधार हवा असतो. कुणीतरी पाठीवर हात ठेवण्याची गरज असते. मनात जो प्रचंड क्षोभ निर्माण झालेला असतो त्याला शांत करण्याची गरज असते. अपयश ज्याने कधीच पाहिले नाही अशी माणसे दुर्मिळच. 


सध्या क्रिकेट विश्वकपाचा माहोल आहे. या खेळात सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, कपिलदेव पासून सध्याच्या विराट, रोहित, शमी आणि हार्दिक पर्यन्त आपण अनेक खेळाडू पाहिले आहेत. वेळोवेळी त्यांना अपयशाचा सामना करावा लागला आहे. प्रसंगी त्यांची थट्टा केली गेली. त्यांच्यावर विनोदी मीम्स आलेले देखील आपण पाहिले. त्यांनीही पाहिले असतील. तरी त्यांचे त्यांचे कुटुंबीय, मित्र, मार्गदर्शक त्यांच्या पाठीशी राहिले. त्यांना भावनिक, मानसिक आधार दिला. मन शांत होऊ दिले. मग त्यांचे नेमके काय चुकते आहे हे दाखवून दिले. त्यांच्या सल्ल्याने खेळाडूनी पुन्हा अथक मेहनत केली. आपल्या चुका सुधारल्या आणि ते पुन्हा मैदान गाजवू लागले. जे क्रिकेटचे चाहते आहेत त्यांना ठाऊक असेल की ऑस्ट्रेलियाच्या एका दौऱ्यात सचिन कायम ऑफसाईडला खेळताना बाद होत होता. मग त्याने त्यावर विचार केला. मेहनत घेतली. कोचचे सहकार्य मिळाले. त्यानंतरच्या सामन्यात त्याने जेंव्हा शतक- द्विशतक झळकवले तेंव्हा अजिबात ऑफ साइडला फटका मारला नव्हता. आपल्या चुकांवर अशी मात करता यायला हवी.

पराभव किंवा अपयश हेच खरे गुरु असतात. आपल्याला ते जणू आरसा दाखवतात. त्यामुळे हातून घडून गेलेल्या चुकांवर, चुकलेल्या निर्णयांबाबत आपण विचार करू शकतो आणि नव्याने पुन्हा कार्यरत होतो. जी माणसे राखेतून पुन्हा उडणाऱ्या पक्षाप्रमाणे पुन्हा उसळून वर येतात त्यांच्यासाठी अवघे आकाश मोकळे असते हेच खरे. 

आपण शिक्षण घेत असताना आपला एखादा मित्र विशिष्ट विषयात मागे पडत असतो. त्यावेळी त्याची टर उडवणारे खूप असतात. पण जर आपण त्यावेळी त्याला सहकार्य केले, त्याला काय समजत नाहीये, कोणती चूक होत आहे हे प्रेमाने समजावले तर त्या अपयशावर तो सहज मात करू शकतो. जे शिक्षण घेत असताना घडते तेच नोकरीत देखील घडू शकते. तेच आपल्या नातेसंबंधात घडू शकते. जेंव्हा कुणीतरी अडचणीत आहे हे लक्षात येते तेंव्हा त्याला अधिक जखमी न करता त्याच्या मदतीला आपण धावून जायला हवे.

आर्थिक मदत, विशिष्ट किंवा एखाद्या वस्तूची मदत, काही कामात प्रत्यक्ष मदत, कधी फक्त मानसिक आधार हे जर आपण करू शकलो तर ती व्यक्ती पुन्हा नव्याने जीवन जगू शकते. आपल्या चुका सुधारल्यामुळे अधिक आत्मविश्वासाने काम करू शकते. आणि सहकार्य केले आहे त्यांच्याप्रती आयुष्यभर कृतज्ञ राहते. त्याचवेळी त्या व्यक्तीच्या व्यवसायावर अवलंबून असलेले त्याचे कर्मचारी, विक्रेते यांचेही आयुष्य सुरळीत सुरू राहते. अपयशी माणसाला हिणवणे, टिंगल करणे सोपे असते मात्र त्याला पुन्हा नव्याने कार्यरत करणे हे फार पुण्याचे काम आहे. सर्वजण असे करत राहिले तर कशाला जगात लोक दुःखी होतील ?

-सुधांशु नाईक (9833299791)

Wednesday, 25 October 2023

माणसे : ध्येय आणि टप्पे

#सुधा_म्हणे: माणसे : ध्येय आणि टप्पे

25 ऑक्टोबर 23

विजयादशमीला सीमा ओलांडून माणूस बाहेर पडत असे ते काहीतरी नव्याने घडवून दाखवायला. प्रत्येकाच्या आयुष्याची कोणती न कोणती उद्दिष्टे असतात. आणि एखादे विशिष्ट ध्येय असते. व्यवस्थापन कौशल्याचा एक महत्वाचा भाग असतो ध्येय निश्चिती करणे. मग हे व्यवस्थापन आपल्या वैयक्तिक आयुष्याचे असो किंवा आपण जिथे नोकरी / व्यवसाय करतो तिथले असो. आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर आपली उद्दिष्टे वेगवेगळी असू शकतात पण ध्येय मात्र बऱ्याचदा अविचल राहते. कुणाला खूप श्रीमंत व्यक्ती बनायचे असते. कुणाला उत्तम तबलावादक किंवा गिटारवादक बनायचे असते. तर कुणाला स्वतःचा व्यवसाय निर्माण करायचा असतो. तर कुणाला एखादा तपस्वी किंवा संन्यासी व्हायचे असते. आपापली ध्येये साध्य करणे ही जणू एक दीर्घ तपश्चर्या असते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण त्यासाठी नेमके काय करतो हे म्हणूनच महत्वाचे ठरते. त्यासाठी मार्गदर्शक तत्वे किंवा strategies तयार कराव्या लागतात.

 
आपल्याला जे बनायचे आहे, जे घडवायचे आहे त्यातील शिक्षण घेणे ही पहिली अतिशय महत्वाची गोष्ट असते. समजा, एखाद्याला संन्यासी व्हायचे आहे तर त्यासाठी आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन, मनन आणि चिंतन आवश्यक असते. कोणती साधना करायची, त्यातील टप्पे कोणते हे जाणकार व्यक्तीकडून समजून घ्यावे लागते. आपण त्या वाटेवरून चालू लागलो की अनेक अडथळे येतात. मोहाचे क्षण येतात. त्याला कसे तोंड द्यायचे हे आधीच समजून घ्यावे लागते. त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींच्या भेटीगाठी, त्यांच्याशी चर्चा करून आपली वाट तयार करावी लागते. इतके केले म्हणजे लगेच उद्दिष्ट, ध्येय साध्य होईलच असे मात्र नसते. आयुष्य असे असते की एकाला लागू झालेली गोष्ट दुसऱ्याला चालेलच असे ठामपणे सांगता येत नाही. अध्यात्माच्या वाटेवर आपले परिश्रम, आपली प्रचिती या गोष्टी फार महत्वाच्या ठरतात. आपल्या ध्येयावर अविचल नजर ठेऊन नियमित परिश्रम घ्यावे लागतात.

अगदी असेच एखाद्याला गायक व्हायचे असेल तर त्यासाठी स्वरसाधना करावी लागते. अथक रियाज करावा लागतो मग कुठेतरी आपण एकेक टप्पे गाठू लागतो. कित्येकदा असे होते की अर्ध्या वाटेवर गेल्यावर जाणवते की वाट चुकते आहे. त्यावेळी स्वतःचे, आपल्या कामाचे मूल्यमापन करता यायला हवे. हट्ट, अहंकार, अभिमान हे बाजूला ठेऊन जाणत्या व्यक्तीला शरण जाऊन त्याच्याकडून आपल्या चुका समजावून घ्यायला हव्यात. त्यानुसार स्वतःमध्ये सुधारणा करायला हवी. कित्येकदा खूप कष्ट केल्यावर अशी वेळ येते. तेंव्हा वाटते की बास, पुरे आता सगळे. मात्र तेंव्हा आपण स्वतःच किंवा योग्य गुरुने जर मार्गदर्शन केले तर पुन्हा उमेदीने आपण कामाला लागतो. आणि अचानक पटकन ध्येय गवसते. तेंव्हा जाणवते की आपण ध्येयप्राप्तीच्या किती जवळ पोचलो होतो. इथून मागे फिरलो असतो तर मोठी चूक झाली असती.

आयुष्यात ठरवलेले ध्येय गवसण्यासाठी एखाद्याला अवघे आयुष्य खर्ची घालावे लागते तर एखाद्याला खूप लवकर सारे मिळून जाते. ध्येयप्राप्तीनंतर जे समाधान मिळते ते शब्दातीत असते. आयुष्यभर काढलेले कष्ट, सोसलेले त्रास सगळ्याचे सार्थक होऊन जाते आणि आपला आत्मा सुखिया झाल्याची अवर्णनीय अनुभूती मिळून जाते. यापेक्षा आणि काय हवे असते आपल्याला?

-सुधांशु नाईक (9833299791)



Tuesday, 24 October 2023

सोन्यासारखे रहा..!

#सुधा_म्हणे: सोन्यासारखे रहा..!

24 ऑक्टोबर 23

आज विजयादशमी. वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींनी मिळवलेल्या विजयाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस. प्रतीकात्मक सोने म्हणून आपण एकमेकाना आपट्याची पाने देतो. शुभेच्छा देताना म्हणतो, “सोने घ्या आणि सोन्यासारखे रहा..!” किती छान ओळ आहे ना ही..?

सोन्यासारखे रहाणे म्हणजे नुसतेच चमकत राहणे नव्हे. किंबहुना “चमकते ते सारे सोने नसते..” ही म्हण देखील आपल्याला माहिती असतेच. सोन्यासारखे राहणे म्हणजे शुद्ध राहणे. गुणवंत होणे. सोने हा धातू हवा, पाणी, वायू यांच्या संपर्कात कधी खराब होत नाही. तो शुद्ध राहतो. अन्य धातूंची संयुगे बनतात पण सोने बावनकशी शुद्ध राहते. उष्णता, थंडी यांच्यामुळे देखील सोन्याला विशेष फरक पडत नाही. त्याचे काठिन्यदेखील वेगळे आणि त्याची तन्यताही वेगळीच. प्रचंड उष्णतेत, भट्टीत तापवल्याविना सोने झळाळून उठत नाही. बाह्य परिस्थितीच्या परिणामाने विचलित न होणारे असते तेच सोने बनते. ही प्रक्रिया अजिबात सोपी नसते. उलट जीवघेणी असतेच. मात्र ध्येयनिश्चिती असेल तर येणाऱ्या सर्व अडचणीतून शांत चित्ताने मार्ग काढता येतो. 


आपल्या भारतीय इतिहासात इतकी थोर थोर माणसे सर्व क्षेत्रात होऊन गेली, ती देखील लहानपणापासून अनेक संकटांना तोंड देत मोठी होत गेली आहेत. विविध आपत्ती, कष्ट, वंचना, वेदना सहन करताना विचलित होत नाहीत म्हणून तर अशा झळाळून उठलेल्या माणसांचे तेज आपल्याला दिपवून टाकते. त्यांचा आदर्श घ्यावा असे वाटते. आपले आयुष्य त्यांच्यासारखे हवे असे वाटत राहते. त्यासाठी गरज असते ती आपल्या चौकटी, आपले “कम्फर्ट झोन” सोडून बाहेर पडायची. आव्हाने अंगावर घेण्याची.!

विजयादशमीचा सण, हा दिवस सीमोल्लंघनाचादेखील. तसे सीमा ओलंडण्याचे क्षण आयुष्यात अनेकदा येतच असतात. हा क्षण वेगळाच असतो. आपल्याला त्रास देणारी गोष्ट, मग तो शत्रू असेल किंवा एखादी समस्या. त्याला तोंड देण्यासाठी, त्याच्यावर मात करण्यासाठी केलेल्या सज्जतेची परीक्षा पाहणारा. आपल्या चौकटी भेदून आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी नव्याने पाऊल टाकायला भाग पाडणारा.

मनात एकीकडे उत्साह, एकीकडे हुरहूर, एकीकडे विजयाची आस आणि एकीकडे पराभवाची चिंता हे सगळे असतेच मनात. अर्थात नुसतीच चिंता किंवा विचार करत बसून कार्य घडत नाही. त्यासाठी कृती करावी लागते. पाऊल उचलावेच लागते. आज ना उद्या येणाऱ्या त्या क्षणासाठी तर हा मुहूर्त. शूर योद्ध्यांचे हात या दिवशी शिवशिवू लागतात. नवी क्षितिजे, नवी आव्हाने त्यांना खुणावू लागतात. त्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे आत्मविश्वास वाढलेला असतो. आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने काहीतरी साध्य करण्यासाठी अशा अधिकाधिक लोकांची सीमोल्लंघने समाजासाठी आवश्यक असतातच. म्हणूनच दुष्ट शक्तीवर मात करून सुष्ट शक्तींच्या विजय होण्यासाठी जगातील सर्वाना बळ मिळो. माणसे अधिकाधिक सोन्यासारखी तेजस्वी होत राहोत यासाठी आपण ही म्हणूया, “सोने घ्या, सोन्यासारखे रहा.”

-सुधांशु नाईक (9833299791)

Monday, 23 October 2023

सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके...

#सुधा_म्हणे: सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके..

23 ऑक्टोबर 23

आपण माणसे ही ईश्वराची निर्मिती. लाखों वर्षांपासून विविध जीवांच्यात बदल होत होत माणूस निर्माण झाला. यापुढे कोणत्या आणि नव्या प्रजाती जन्माला येतील हे आज नीटसे आपल्याला ठाऊक नाही. मात्र आज आपण माणसे स्वतःला जणू प्रति ईश्वर समजत आहोत. आपण अनेक नवनवे शोध लावले. टाचणीपासून अवाढव्य विमान आणि उपग्रहा पर्यन्त लाखों वस्तू निर्माण केल्या. तरीही आपल्याला आजही असंख्य गोष्टी समजत नाहीत. विश्वातील विविध आश्चर्ये, विविध घडामोडी याबद्दल आजही आपण अनभिज्ञ असतो. महापूर, भूकंप, वादळे, महामारीच्या साथी, त्सुनामी, पर्वत ढासळणे आदि अनेक आपत्तीच्या बाबत आपल्याला आधी काही पुरेसे समजत नाही. काही प्रमाणात सूचना मिळाली तरी ती तितकीशी पुरेशी नसते. रोजच्या जगण्यात देखील कोरोनासारख्या साथी जेंव्हा आल्या आणि त्यामुळे जगभर जो हाहाकार माजला तो आपण सर्वानी हल्लीच अनुभवला आहे. त्यामुळे विश्वातील त्या एका शक्तीला आपण अनन्यभावे शरण जाणे इतकेच सामान्य माणूस करू शकतो. म्हणूनच त्या शक्तीरूपी, मातृरूपी जगन्मातेला प्रार्थना करताना,

सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके।

शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।।

असे म्हणत जगात सर्वांचे मंगल व्हावे, कुणीही दुःखी, कष्टी असू नये यासाठी आपण प्रार्थना करायला हवी. जगात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा जीव घेणारी ही मनोवृत्ती नष्ट होण्यासाठी आपण प्रार्थना करायला हवी. आपले मन हे फार विचित्र असते म्हणूनच तर आपण म्हणतो की “मन चिंती ते वैरी न चिंती..”. आपल्या मनातील वाईट विचार नष्ट होत जावेत आणि विश्वकल्याणाचे विचार सर्वांच्या मनी रुजावेत यासाठी आपण प्रार्थना करायला हवी. 

माणूस जसा सर्वात बलिष्ठ होत गेला आणि त्याने अन्य जीवांवर आपला अंकुश निर्माण केला त्यात इतर अनेक प्रजाती धोक्यात आल्या. आपल्या विकासासाठी झाडे, डोंगर, समुद्र, नदी यांचा हवा तसा वापर केला गेला. विश्वातील या गोष्टी विश्वासाठी आवश्यक अशाच. या सगळ्याची तोडमोड करायची बुद्धी कशी होते काही जणांना ? त्यांना केवळ आपल्याच फायद्याचे विचार न सुचता इतरांच्या कल्याणासाठी कृतिशील होता येऊ दे अशी प्रार्थना आपण करूया. जिथे जिथे अन्याय, अत्याचार दिसेल तिथे तिथे त्याचे निर्मूलन होण्यासाठी आपल्याला बळ मिळावे आणि जिथे आपली ताकद कमी पडेल तिथे ईश्वराने वाईट गोष्टींचे परिपत्य करावे अशी प्रार्थना करूया.

सर्वात बलिष्ठ होण्याची मानवाची महत्वाकांक्षा आता लपून राहिलेली नाही मात्र त्याने विश्व आपल्या मर्जीने हवे तसे उद्ध्वस्त न करता विश्वातील इतर जीवांचा मोठा बंधू बनून सर्वांच्या आयुष्यात सगळे काही मंगल असावे यासाठी प्रार्थना करू या. केवळ माझे, माझ्या कुटुंबाचे कल्याण इतकीच संकुचित वृत्ती न ठेवता जगाच्या कल्याणासाठी किमान एक छोटेसे पाऊल प्रत्येकाला उचलावेसे वाटू दे अशी प्रार्थना आपण करूया असे मला वाटते.

-सुधांशु नाईक(9833299791)



Friday, 20 October 2023

या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता ।

#सुधा_म्हणे: या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता  

21 ऑक्टोबर 23

जन्माला आलेल्या प्रत्येकाचे आयुष्य अनेक चढ उतारातून जात असते. कष्ट, दुःख, वेदना तर आयुष्याचा एक घटक आहेच. त्या सगळ्यापार जात त्यांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी असावी हे महत्वाचे. आपण कितीही काही परिश्रम घेतले तरी शेवटी नशिबाचा भाग उरतोच आणि म्हणूनच आपण ईश्वरी शक्तीला शरण जातो.

शांती लाभणे ही मात्र फार महत्वाची गोष्ट. एखाद्याकडे कोणतीही गोष्ट नसतानादेखील तो शांत राहू शकतो तर एखाद्याकडे सर्व काही असूनही तो अस्वस्थ असू शकतो. जन्मल्यापासून मरेपर्यंत मनुष्यास कोणत्या ना कोणत्या इच्छा, अपेक्षा असतात. प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याच्या नादात आपण धावत राहतो. किती धावतोय, कुठे धावतोय हे कळेनासे होते आणि मग आयुष्यातील शांती नष्ट होऊन जाते. इतकेच नव्हे तर वाढत्या महत्वाकांक्षा, अपेक्षा, हव्यास यामुळे माणसे मग दुसऱ्याला त्रास देऊ लागतात. जात, पंथ, धर्म, प्रांत, देश अशा प्रत्येक गोष्टीवरून मग वाद, ईर्ष्या, चढाओढ, स्पर्धा हे सारे सुरू होते. आणि संगळ्यांचीच शांती भंग होते.

आपल्या पौराणिक कथा, पुराणे वाचली तर असे लक्षात येते की जेंव्हा जेंव्हा असुरांमुळे त्रिलोकाची शांती भंग होऊ लागली तेंव्हा सर्वजण आदिमायेला शरण गेले. तिच्या सल्ल्याने कधी शंकर, कधी विष्णू यांनी विविध अवतार घेऊन त्या दैत्यांचे पारिपत्य केले. जेंव्हा सर्व देवसुद्धा हतबल ठरले तेंव्हा देवीने अवतार घेऊन महिषासुरसारख्या दैत्यांचे निर्दालन केले. प्रत्येक गोष्ट असावी पण ती प्रमाणात असावी असे आपला धर्म मानतो. जेंव्हा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होतो तेंव्हा मग आपली मानसिक, शारीरिक शांती भंग होते. लोकांचे हव्यास वाढले की इतराना त्रास दिला जातो आणि मग अशांतीच्या वादळात अवघे विश्व हेलकावत राहते.

 
सध्या आपल्याला जगभर सुरू असणारी लहानमोठी युद्धे, अंतर्गत कलह हे सगळे ठाऊक आहे. या सगळ्याचा बारकाईने विचार केला तर सगळीकडे पुरुषी आक्रमकता, पुरुष नेतेच सर्व ठिकाणी दिसतात. हिजबूल्ला , आयसिस, हमाससारख्या अत्यंत घातक अशा दहशतवादी संघटनेमुळे जे युद्ध सर्वत्र सुरू आहे त्या सारख्या संघटनेत तर स्त्रियांना केवळ भोगवस्तू म्हणूनच वापरले जाते. हे माणुसकीला काळीमा फासणारेच आहे. जिथे स्त्रीला माणूस स्त्रीला एखादा निर्णय घेण्यात सहभागी करून घेणे ही तर त्यामुळे दूरची गोष्ट. घरातील स्त्री ही घरातील सर्वांचा विचार करते. सर्वांच्या सुखा-समाधानासाठी राबत असते. त्यामुळे जर जगभरातील स्त्रियांना जर सन्मानाने वागवले गेले, विविध निर्णयात त्यांना सक्रिय सहभाग घेऊ दिला तर विश्वहिताच्या निर्णयात नक्कीच वाढ होईल असे मला वाटते. जगभरातील दुष्ट प्रवृत्तीना नष्ट करून सर्वत्र शांती आणि सुख देणारी अशी देवता गावोगावी स्त्रीच्या रूपात मानली जायला हवी. पूर्वी गौरी, दुर्गा आदि रूपात देवीने विश्वशांती निर्माण केली होती. तसे  दिवस पुन्हा यावेत मग आपण सर्वजण अतीव आनंदाने नक्कीच असे म्हणू शकू,

या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता  

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।

आपल्या घरापासून जगभरात सर्वत्र शांतता निर्माण व्हावी यासाठी जगन्मातेला मनोभावे वंदन करूया..!

-सुधांशु नाईक(9833299791)





या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता ।

#सुधा_म्हणे: या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता  

20 ऑक्टोबर 23

जन्माला आलेली बहुतेक माणसे काही ना काही कामं करतात ते स्वतःचे आणि कुटुंबाचे पोट भरण्यासाठी. आणि त्यासाठीच मग आवश्यक असते लक्ष्मी किंवा धन. म्हणूनच देवीचे लक्ष्मीरूप सर्वांच्या पूजेत असतेच असते. प्राचीन पौराणिक कथेनुसार समुद्रमंथन करताना त्यातून लक्ष्मी अवतीर्ण झाली. तेंव्हापासून सर्वजण लक्ष्मीरूपाची पूजा अर्चना करतात. लक्ष्मीची पूजा करणारी सगळीच माणसे स्त्रीकडे सन्मानाने का पाहू शकत नाहीत असा प्रश्न मात्र मला अस्वस्थ करतो.

पैशाशिवाय जगात काही चालत नाही असे आपण म्हणतो आणि म्हणूनच लक्ष्मीचे महत्व अधिक. एका संस्कृत सुभाषितात म्हटले आहे की, “आलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम्..” म्हणजेच जी माणसे आळशी असतात त्यांना ना विद्या मिळते ना धन. त्यामुळे विविध प्रकारचे शिक्षण घेऊन स्वतःची बुद्धिमत्ता वाढवणे आणि मग प्रामाणिक  प्रयत्न करून धन कमावणे हा तर प्रत्येक माणसाच्या संसाराचा जणू पायाच असायला हवा. प्रत्येक जण आपापल्या परीने काही ना काही करत राहतो. राबतो, पैसे कमवतो. पैसे जपत राहतो. सतत कार्यरत असण्याऱ्या, इतरांचे भले व्हावे असा विचार करणाऱ्या व्यक्तीवर लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते.

 
प्रामाणिक कष्ट करून किंवा आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर धनसंपत्ती मिळवणे हे केंव्हाही उत्तम असतेच. त्याला मान-प्रतिष्ठा आणि ऐश्वर्य तर मिळतेच. मात्र जगात असे ही लोक आहेत की जे गैरमार्गाने संपत्ती मिळवतात. चोरी, लुबाडणूक, फसवणे, हत्या आदि मार्गाने जी संपत्ती मिळते त्याला अलक्ष्मी असे म्हटले जाते. ही लक्ष्मी घरी येताना दुःख, त्रास, व्याधी, कलह आदि नकोशा गोष्टी घेऊन येते असे मानले जाते.

लक्ष्मीस्तुतीसाठी ऋग्वेदकाळात जे श्रीसूक्त रचले गेले त्यात देखील ही अलक्ष्मी नोंदली गेली आहे. तिथे असे म्हटले आहे की जेंव्हा आदित्यवर्णी, हिरण्मयी अशी लक्ष्मी घरी येते तेंव्हा ही अलक्ष्मी घरात थांबत नाही. त्यामुळे लक्ष्मीची आराधना केली तर अज्ञान, अंध:कार दूर होतात आणि ही अलक्ष्मी बाहेर पडते. 

आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः 

तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायश्च बाह्या अलक्ष्मीः||

वेदात असे लिहिलेले असले तरी घरात येऊ शकणारी अलक्ष्मी दूर ठेवायचे काम घरची लक्ष्मीच करू शकते. आपले वडील, भाऊ, पती किंवा मुलगा जर कोणतेही गैर काम करत असतील, अन्यायाने किंवा वाममार्गाने पैसे कमवत असतील तर त्यांच्या समोर रोखठोकपणे सांगायचे धाडस स्त्री दाखवू शकते. ज्या घरातील स्त्री असा ठाम पवित्रा घेते तिथे घरात येणारा पैसा हा फक्त कष्टाचाच असतो. ज्या घरात आर्थिक कमाईबाबत अशा गोष्टीवर चर्चा करताना स्त्रीला किंमत नसते, तिची मुस्कटदाबी केली जाते किंवा तिच्या योग्य सल्ल्याला डावलले जाते तिथे अलक्ष्मीचा वास असतो. अनेकांना ही गोष्ट एखादी अंधश्रद्धा वाटू शकते मात्र जर घरातील आई-बहीण-पत्नी किंवा मुलीने अवैध मार्गाने घरात येणाऱ्या संपत्तीबाबत जर कडक धोरण स्वीकारले तर समाजातील गैरकृत्ये काही प्रमाणात नक्की कमी होतील. मात्र असे घडत नाही. स्त्रीला कायम डावलले जाते.

मला एका गोष्टीचे कायम आश्चर्य वाटते की, माणूस धन संपत्ती मिळवायला इतकी धडपड करतो पण संसारातील आर्थिक घडामोडीत मात्र स्त्रीला दुय्यम स्थान देतो. आज सर्व क्षेत्रात स्त्री हिरीरीने कामे करत आहे. तरीही देशातील किमान 60 टक्के घरातील स्त्रियांना बँक / विमा किंवा प्रॉपर्टीचे व्यवहार माहिती नसतात. कित्येकदा “तुला यातले काय कळते?” हा प्रश्न जसा असतो तसेच स्त्रीने “तुम्ही / तू बघितले आहे ना मग ठीक आहे..” असे म्हणून फक्त सही करणे किंवा आर्थिक व्यवहाराकडे दुर्लक्ष करणे अत्यंत चुकीचे आहे. मुळात स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त हुशार / चतुर असते. तिला फक्त संधी मिळायला हवी. ती सर्वसमावेशक विचार करू शकते. घरातील सर्वांचा विचार करू शकते. रिस्क मॅनेजमेंट असो किंवा बचत या गोष्टी ती जास्त समर्थपणे हाताळू शकते. त्यामुळे आर्थिक निर्णय घेताना घरातील / व्यवसायातील स्त्री सहकाऱ्याला वगळून अजिबात घेतले जाऊ नयेत. घरातील सर्व कामे करणारी स्त्री आर्थिक व्यवहार, आर्थिक घडामोडी यामध्ये सक्षम असते. तिला सामील करून घ्यायला हवे.

प्राचीन काळापासून स्त्रीने आर्थिक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या आहेत. आणि त्यामुळे घरातील धनसंपत्तीची वृद्धी होते. घराचे आर्थिक व्यवहार ती प्रामाणिकपणे करते यात शंका नाही. म्हणूनच घरोघरीची लक्ष्मी अधिकाधिक सक्षम व्हावी आणि आपणा सर्वांवर माता लक्ष्मीने वरदहस्त ठेवावा यासाठी,

या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता  

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः 

असे म्हणून आपण वंदन करूया.

(सोबतचे रेखाचित्र आमची कतारमधील स्नेही रूपालक्ष्मी हिने काढलेले आहे.)

-सुधांशु नाईक(9833299791)



Thursday, 19 October 2023

या देवी सर्वभूतेषू मातृरुपेण संस्थिता..

 #सुधा_म्हणे: या देवी सर्वभूतेषू मातृरुपेण संस्थिता..

19 ऑक्टोबर 23

स्त्री केवळ चूल आणि मूल यापुरतीच असे ज्यांचे विचार असतात ना त्यांना खरच स्त्री कळली नाही. जगातील प्राचीन काळापासून आजच्या काळापर्यंतच्या थोर थोर अशा स्त्रियांची किती उदाहरणे द्यावीत तितकी कमीच आहेत. स्त्री घर तर सांभाळतेच. मूल जन्माला घालून त्याचे पालनपोषण तर करतेच पण त्याशिवाय किती गोष्टी करते. घराला घरपण तिच्यामुळेच तर येते. समाजशास्त्र किंवा समूहजीवन याचा जर अभ्यास केला तर पुरुष हा खरेच निमित्तमात्र आहे. स्त्रीच्या उदरी बीज देण्यापुरता. त्याचे मुख्य काम कुटुंबाचे संरक्षण करणे आणि कुटुंबाच्या अन्न, वस्त्रादि गरजा भागवणे. मात्र नुसते धन कमवून पुरत नाही. प्रपंच करताना शेकडो व्यवधाने बाळगावी लागतात. ते सगळे जपले जाते स्त्री कडून. आपले माहेर, सासर हे तर ती जपायचे प्रामाणिक प्रयत्न करतेच पण वय वाढेल तसे ती आपल्याच आई-बापापासून, सासू-सासरे, मुले, दीर, नणंदा इतकेच काय तर प्रसंगी नवऱ्याची देखील आई होते. सगळ्यांसाठी राबत राहते. प्रेमाने प्रत्येकाच्या आवडी जपत राहते.

काळाच्या ओघात अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडत राहिल्या तरी स्त्री ने आपली जबाबदारी कधी झिडकारली नाही. तिला मानसन्मान मिळो अथवा न मिळो, ती आपले कार्य इमाने इतबारे पार पाडतेच. त्या बदल्यात तिला असते फक्त प्रेमाची ओढ. स्त्रियांचे शॉपिंग वगैरे गोष्टींबाबत आपण कितीही विनोदाने बोलत असलो, तरी कोणतीही स्त्री घराचे बजेट याचाच आधी विचार करते. स्वतःला काही घेण्यापूर्वी इतरांचा विचार करते. मुळातच स्त्री ही multi-tasking सहजपणे करणारी आहे. पूर्वीच्या काळी घर सांभाळणे, स्वयंपाक, गुरे-ढोरे हे सगळं करताना ती शेतीच्या कामातदेखील सहभागी व्हायची. पतीचा जर व्यापार उद्योग असेल तर त्यात सामील होत असे. आणि एक काम करताना दुसरीकडे दुर्लक्ष झाले आहे असे सहसा तिच्याकडून कधी घडले नाही. पुन्हा हे सगळे करताना ती त्यात माया भरते. कधीच कोरडेपणाने वागत नाही. काही अपवाद वगळता प्रत्येक स्त्रीकडे एक जन्मजात मातृभाव असतो. अवघ्या जगासाठी मनात वात्सल्य भरलेले असते.


जेंव्हा जेंव्हा घर-कुटुंब किंवा देशाला एखादी अडचण येते तेंव्हा निःस्वार्थीपणे मदत करायला माऊली पुढे येतेच. आणि हे फक्त काहीतरी करून, उरकून टाकणे नसते तर त्यात सौन्दर्यदृष्टी असते. सारासार विचार असतो. नेताजींची आझाद हिंद सेना असो, स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकरकांचे योगदान असो किंवा सातारा प्रांतातील तत्कालीन पत्री सरकार असो, घराघरातील माऊलीने त्यासाठी सहज मदत केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पत्नी आणि वहिनीने केलेला त्याग, त्याची कहाणी ऐकली तरी डोळे भरून येतात. ऐनवेळी अनोळखी क्रांतीकारकांना घरात स्थान देणे असो किंवा प्रसंगी अंगावरील सर्व दागिने सहजतेने देशकार्यासाठी देणे असो, स्त्री अशा प्रसंगी कधीच मागे हटत नाही. जेंव्हा एखाद्या गावी एखादे मोठे सामाजिक कार्य ठरते तेंव्हा घरातील माताच त्यासाठी स्वयंपाक रांधून देतात. ज्याना त्यांनी पाहिले देखील नाही अशा लोकाना जेवण देताना त्यांच्या पोटात फक्त आणि फक्त ममता असते माया असते. तिच्यातील या मातृत्वाच्या जाणिवेचा सन्मान करताना म्हणूनच ओठांवर देवी स्तुतीतील श्लोक येतो,

या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता  

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।

-सुधांशु नाईक(9833299791)



Wednesday, 18 October 2023

या देवी सर्वभूतेषू बुद्धीरुपेण संस्थिता...

 #सुधा_म्हणे: या देवी सर्वभूतेषू बुद्धीरुपेण संस्थिता..

18 ऑक्टोबर 23

स्त्री आणि पुरुष. हे विश्व वाढत राहावे यासाठी आवश्यक असलेले दोन जीव. एकाविना दूसरा अपूर्णच. दोघांच्यात निसर्गत: अनेक वेगवेगळ्या गोष्टी. शारीरिक, मानसिक, भावनिक अशा सगळ्याच गोष्टी कितीतरी वेगळ्या. परस्पर पूरक अशाच. प्रत्येक बाबतीत समानतेचा अट्टहास हा जितका वाईट तितकेच एकाने दुसऱ्याला हिणवत राहणे, नावे ठेवणे हे देखील वाईटच. जे तुझ्यात नाही ते माझ्यात आहे.. दोघे मिळून आपले जगणे समृद्ध करू असा विचार असेल तर त्यांचे सहजीवन सुंदर आणि हवेहवेसे बनते. मात्र अनेकदा “बँकेच्या या फॉर्मवर इथे सही कर फक्त. मी नंतर जाईन बँकेत.. जास्त काही विचारू नको, तुला काय यातले कळते?” “तुम्ही उगीच किचनमध्ये लुडबूड करू नका..तुम्हाला कशात काय घालायचे हे अजिबात कळत नाही.. ” असे संवाद घरोघरी दिसतात आणि एकमेकांच्या बुद्धीला आपण किती गृहीत धरतो हे पाहून हसू येते.

मुळात जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला निसर्गत: बुद्धीचे देणे मिळालेले असते. कुणाला गणिती डोके मिळते, कुणाला कलेची देणगी मिळते,कुणाला अथक मेहनत करता येते तर कुणाला खिलाडूवृत्ती. आपल्याला जे देणे मिळाले आहे त्याचा स्वीकार करून पुढे जाणे महत्वाचे. स्त्री आणि पुरुषांच्या मेंदूची रचनाच वेगवेगळी असते. दोघांच्या हार्मोन्स मध्ये वेगळेपण असते त्यामुळे परस्परांनी एकमेकाना आदर आणि प्रेम देऊन पुढे जायला हवे.

( सोबतचे चित्र राजा रवीवर्मा यांचे आहे.)

देवी सरस्वतीला तर आपण विदयेची, बुद्धीची देवता मानतोच. देवी सरस्वतीच्या व्यतिरिक्त बारकाईने पाहिले तर प्राचीन भारतात देखील अन्य बुद्धिमान स्त्रिया होत्याच. राजकारणापासून धर्मकारणापर्यंत सर्वत्र त्या आपल्या बुद्धिमत्तेचा ठसा उमटवत होत्या. आजही घोडदौड करत आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकी, संशोधन, मानसशास्त्र, संरक्षण क्षेत्र अशा प्रत्येक क्षेत्रात ज्यांनी आजवर आपल्या बुद्धिमत्तेचा अमीट असा ठसा उमटवला आहे त्यांची नुसती यादी द्यायची झाली तरी एक मोठे पुस्तक लिहावे लागेल.  जगभरच्या प्रगत आणि विकसनशील देशात प्रत्येक ठिकाणी स्त्रीच्या बौद्धिक कौशल्याचा आधारावर तर संसार सुरू असतात. आपल्या जगण्यात किंवा कामात असताना, एखादी समस्या आली तर त्यावेळी आपली आई, बहीण, पत्नी, मैत्रीण किंवा मुलगी एखाद्या वेगळ्या कोनातून त्याकडे पाहतात आणि अचूक सल्ला देतात असे अनुभव घरोघरी येत असतातच. असे असताना आपल्याच नव्हे तर अन्य देशात आजही स्त्रीला गुलामगिरीचे जिणे जगायला लावणाऱ्या क्रूर मनोवृत्तीची तीव्र निंदा करावीशी वाटते. कोणतीच परीक्षा न घेता “तिला अमुक एक गोष्ट येत नाही..” हे लोक कसे म्हणू शकतात ?

जिथे जिथे स्त्रीला सन्मानाने पाचारण करण्यात आले, तिथे तिथे तिने आपल्या बुद्धीचा प्रभाव पाडला आहे. मग महिषासुरासारख्या असुरांचे निर्दालन असो की सध्याच्या चंद्रयान सारख्या मोहिमांची आखणी असो. आपली बुद्धिमत्ता, क्षमता दाखवण्याची संधी मिळाली की प्रत्येक स्त्री तेजाने झळाळून उठते. त्या तेजाला वंदन करताना मग आपणही म्हणू लागतो,

या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता  

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः 

-सुधांशु नाईक(9833299791)