marathi blog vishwa

Tuesday, 31 October 2023

माणसातील प्रेम वाढते राहो..

#सुधा_म्हणे: माणसा-माणसातील प्रेम वाढते राहो..

31 ऑक्टोबर 23

माणसांच्यात निर्माण होणारी प्रेमभावना कशी विविध स्तरावर असते हे आपण कालच्या लेखात पाहिले. कोणत्याही नात्यात प्रेमभावना ही चटकन निर्माण होऊ शकते. बरेचदा त्यासाठी बाह्य घटक जास्त कारणीभूत असतात. एखाद्याचे दिसणे, बोलणे, चालणे, हावभाव आदि गोष्टींचा जास्त प्रभाव आपल्यावर पडतो. त्यामुळे माणसे आकर्षित तर जरूर होतात पण त्यापुढे जाऊन ते नाते टिकवू शकतातच असे नाही. “दुरून डोंगर साजरे..” या म्हणीप्रमाणे दुरून सगळे छानच वाटते. मात्र जेंव्हा आपण एकमेकांच्या जवळ असतो तेंव्हा विविध गोष्टी टोचू लागतात. त्या काही नव्याने आलेल्या नसतात. त्या आधीपासून असतातच. पण प्रेमाच्या सुरुवातीच्या बहरात त्याकडे आपलेच दुर्लक्ष झालेले असते. त्यामुळे लहानपणी एखाद्या बबडूच्या सुस्त वागणुकीबद्दल कौतुकाने सांगणारी आई नंतर त्यालाच रोज शिव्या देत राहते. तेच पती-पत्नीच्या नात्यात, सासू- सुनेच्या नात्यात, प्रियकर प्रेयसीच्या नात्यात, मित्र किंवा मैत्रिणींच्यातही घडू शकते. सुरुवातीला नाते नवे असताना आपण आपल्या अनेक सवयीना, विचारांना दुसऱ्याचा विचार करून मुरड घालतो. मात्र तसे मनाला कुणी जास्त काळ रोखू शकत नाही. तिथे प्रेमभावनेचा कस लागतो.


आपल्या समोरची व्यक्तीसोबत अधिकाधिक सहवास जसा मिळत जातो तसतसे आपल्याला कळत जाते की आपली प्रेमभावना सच्ची आहे की फक्त सुरुवातीची ती तीव्रता अधिक होती. आणि या टप्प्यावर अपेक्षेपेक्षा स्वीकार महत्वाचा ठरतो. एखाद्या घरात सुरुवातीला सासू-सुनेचे अजिबात पटत नाही. मात्र काही काळ गेल्यानंतर दोघीनाही कळते की आपण एकतर एकाच पद्धतीने विचार करतो आहोत किंवा आपले मार्ग खरेच वेगळे आहेत. जर त्यांनी परस्परांचे विचार समजून घेतले तर नाते अधिक समृद्ध होते. किरकोळ कुरबुरी सुरु राहिल्या तरी एकमेकाना समजून घेतल्याने नाते लोणच्यासारखे मुरत जाते. तर यापेक्षा उलटे वागत जर रोज उठून जे आवडत नाही, जे पटत नाही त्यावर बोलणे, वाद घालणे हे घडले तर आहे ते नाते विरून जाते. त्यातला ओलावा संपून जातो.

दोन भिन्नलिंगी जीवांच्यात प्रेमभावना निर्माण होणे सोपे असते मात्र ती जपणे, एकमेकांचा अधिकाधिक विचार करून ती प्रेमभावना वृद्धिंगत करणे जास्त कठीण असते. त्यासाठी परस्परांना समजून घेता यायला हवे. दुसऱ्याला खुपणारे आपल्या स्वभावातील टोकेरीपण घासून काढता यायला हवे. परस्परांचा विचार करून, एकमेकांसाठी  जे जे उत्तम ते करू पाहणे, आपले अहंकार बाजूला ठेवणे, एकमेकाना सुखी करण्यासाठी समर्पण करणे ज्याना जमते त्यांची नाती अधिक परिपक्व होऊन जातात. त्यांच्या जगण्याला स्थिरता येते. शांतता येते. त्यांचे सहजीवन सुंदर बनते. सर्जनशील प्रवृत्तीने ते आपले विश्व अधिक सुंदर, अधिक भव्य करण्याची वाट चालत राहतात. 

प्रेमभावनेचा उत्कट आविष्कार अनुभवलेली, जिवलग लाभलेली अशी माणसे मग जग सुंदर करण्यासाठी अधिकाधिक कार्यरत होऊन जातात. माणसा-माणसातील प्रेम वाढत राहणे हे म्हणूनच किती सुंदर आहे ना?

-सुधांशु नाईक(9833299791)

No comments:

Post a Comment