#सुधा_म्हणे: या देवी सर्वभूतेषू शक्तिरुपेण संस्थिता..
17 ऑक्टोबर 23
नवरात्र सुरू झाले. हा देवीचा
उत्सव. त्या जगन्मातेचा उत्सव. प्रसंगी विश्व वाचवण्यासाठी हाती शस्त्र घेणाऱ्या
शक्तीदेवतेचा उत्सव. विश्वाची उत्पत्ती कशी झाली याबद्दल प्राचीन काळापासून अनेक
शक्यता वर्तवल्या गेल्या. लाखों संशोधने झाली. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली
आणि जगतजननी ची कित्येक रुपे निर्माण झाली. मनुष्य जन्म देखील अन्य प्राण्यांच्या
सारखाच असला तरी इथे ईश्वराने बुद्धीचे वरदान दिले. प्रज्ञा दिली. नवीन विश्व
घडवायला चेतना दिली. आणि या सगळ्यात स्त्री सर्वात महत्वाची राहिली. संतती निर्माण
करणारी, संपत्ती निर्माण करणारी, सगळे काही प्राणपणाने जतन करणारी, एकावेळी अनेक
गोष्टी सहज करू शकणारी स्त्री.
स्त्रीला अबला समजणाऱ्या लोकांची म्हणूनच खरंच कीव येते. आपण आपला इतिहासच वाचत नाही म्हणून असे घडते. जगातील पहिले साहित्य ज्याला मानले जाते त्या ऋग्वेदांत देखील वेदसूक्ते रचणाऱ्या स्त्रियांचे उल्लेख येतात. शौनक ऋषीनी आदिती,सरस्वती, लोपामुद्रा आदि स्त्रियांची सूचीच बृहदेवता नावाच्या ग्रंथात दिली आहे. एकेकाळी आपला समाज नातेसंबंधाबाबत फार प्रगत आणि मोकळ्या विचारांचा होता हे प्राचीन ग्रंथ अभ्यासताना जाणवते. स्वतःचा पती निवडण्यापासून प्रत्येक गोष्टीत स्त्रीला स्वातंत्र्य होते. तिला शिक्षणाचा अधिकार होता. वेदाध्ययन करण्याचा अधिकार होता. रणांगणी देखील कैकयी, सत्यभामा सारख्या स्त्रिया पुरुषांच्या जोडीने लढत होत्या. महिषासुराचा वध करणारी दुर्गा असो वा पार्वती, लक्ष्मी असो त्यांना कधीच समाजाने किंवा त्यांच्या पुरुषाने कोंडून ठेवले नव्हते. त्यांच्या तेजाने, त्यांच्या प्रगल्भ विचाराने, त्यांच्या गुणवंत वागणुकीमुळे त्या वंदनीय ठरल्या, त्यांच्या काळापासून ते अगदी आजपर्यन्त...!
जसजशी पुरुषांची सत्तेची, संपत्ती जमवण्याची ओढ वाढत गेली तसे मग स्त्रीवर बंधने येत गेली. त्यातही परकीय आक्रमणे भारतावर होत गेली तसतशी स्त्रीवरील बंधने वाढत गेली. मुस्लिम आक्रमकांनी केलेले निर्घृण अत्याचार इतके भयानक होते की 1500 वर्षापूर्वी स्त्रीला घरात जणू बंदिवान केले गेले. लढाई झाल्यावर जर हिंदू राजा पराभूत होऊ लागला तर मग विटंबना टाळण्यासाठी जोहार केले जात. पेशावर पासून पंजाब- राजस्थानपर्यन्तच्या भागाने इ. स. 600/700 पासून पुढील हजार वर्षे आणि इ. स. 1100 पासून भारतातील अन्य प्रांतातील स्त्रियांनी जे अनन्वित अत्याचार सोसलेत त्याच्या कहाण्या अक्षरश: वाचवत नाहीत. वाचताना डोळे भरून येतात. मागचा इतिहास मागे सारून स्त्री पुन्हा जोमाने सगळ्या क्षेत्रात आघाडीवर आहे. प्राचीन काळातील परकीय आक्रमणे असोत, बाप्पा रावळ – राणा प्रताप- शिवाजी महाराजांच्या सारख्या थोर राजांनी केलेले स्वातंत्र्यासाठीचे पराक्रम असोत, स्त्रियांनी घरातून कायमच पाठिंबा दिला आहे. प्रसंगी हाती शस्त्र धरून तिने शत्रूचा सामना केला आहे. शास्त्रे जाणणारी ती प्रसंगी सहज हाती शस्त्र घेऊ शकतेच. ती कायम तशीच आहे, म्हणून तर ऋषी म्हणतात,
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।
त्या शक्तीस्वरुप स्त्रीला
वंदन..!
No comments:
Post a Comment