#सुधा_म्हणे: या देवी सर्वभूतेषू बुद्धीरुपेण संस्थिता..
18 ऑक्टोबर 23
स्त्री आणि पुरुष. हे विश्व
वाढत राहावे यासाठी आवश्यक असलेले दोन जीव. एकाविना दूसरा अपूर्णच. दोघांच्यात
निसर्गत: अनेक वेगवेगळ्या गोष्टी. शारीरिक, मानसिक, भावनिक अशा सगळ्याच गोष्टी
कितीतरी वेगळ्या. परस्पर पूरक अशाच. प्रत्येक बाबतीत समानतेचा अट्टहास हा जितका
वाईट तितकेच एकाने दुसऱ्याला हिणवत राहणे, नावे ठेवणे हे देखील वाईटच. जे तुझ्यात
नाही ते माझ्यात आहे.. दोघे मिळून आपले जगणे समृद्ध करू असा विचार असेल तर त्यांचे
सहजीवन सुंदर आणि हवेहवेसे बनते. मात्र अनेकदा “बँकेच्या या फॉर्मवर इथे सही कर
फक्त. मी नंतर जाईन बँकेत.. जास्त काही विचारू नको, तुला काय यातले कळते?” “तुम्ही
उगीच किचनमध्ये लुडबूड करू नका..तुम्हाला कशात काय घालायचे हे अजिबात कळत नाही.. ”
असे संवाद घरोघरी दिसतात आणि एकमेकांच्या बुद्धीला आपण किती गृहीत धरतो हे पाहून
हसू येते.
मुळात जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला
निसर्गत: बुद्धीचे देणे मिळालेले असते. कुणाला गणिती डोके मिळते, कुणाला कलेची
देणगी मिळते,कुणाला अथक मेहनत करता येते तर कुणाला खिलाडूवृत्ती. आपल्याला जे देणे
मिळाले आहे त्याचा स्वीकार करून पुढे जाणे महत्वाचे. स्त्री आणि पुरुषांच्या
मेंदूची रचनाच वेगवेगळी असते. दोघांच्या हार्मोन्स मध्ये वेगळेपण असते त्यामुळे
परस्परांनी एकमेकाना आदर आणि प्रेम देऊन पुढे जायला हवे.
( सोबतचे चित्र राजा रवीवर्मा यांचे आहे.)
देवी सरस्वतीला तर आपण विदयेची, बुद्धीची देवता मानतोच. देवी सरस्वतीच्या व्यतिरिक्त बारकाईने पाहिले तर प्राचीन भारतात देखील अन्य बुद्धिमान स्त्रिया होत्याच. राजकारणापासून धर्मकारणापर्यंत सर्वत्र त्या आपल्या बुद्धिमत्तेचा ठसा उमटवत होत्या. आजही घोडदौड करत आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकी, संशोधन, मानसशास्त्र, संरक्षण क्षेत्र अशा प्रत्येक क्षेत्रात ज्यांनी आजवर आपल्या बुद्धिमत्तेचा अमीट असा ठसा उमटवला आहे त्यांची नुसती यादी द्यायची झाली तरी एक मोठे पुस्तक लिहावे लागेल. जगभरच्या प्रगत आणि विकसनशील देशात प्रत्येक ठिकाणी स्त्रीच्या बौद्धिक कौशल्याचा आधारावर तर संसार सुरू असतात. आपल्या जगण्यात किंवा कामात असताना, एखादी समस्या आली तर त्यावेळी आपली आई, बहीण, पत्नी, मैत्रीण किंवा मुलगी एखाद्या वेगळ्या कोनातून त्याकडे पाहतात आणि अचूक सल्ला देतात असे अनुभव घरोघरी येत असतातच. असे असताना आपल्याच नव्हे तर अन्य देशात आजही स्त्रीला गुलामगिरीचे जिणे जगायला लावणाऱ्या क्रूर मनोवृत्तीची तीव्र निंदा करावीशी वाटते. कोणतीच परीक्षा न घेता “तिला अमुक एक गोष्ट येत नाही..” हे लोक कसे म्हणू शकतात ?जिथे जिथे स्त्रीला सन्मानाने
पाचारण करण्यात आले, तिथे तिथे तिने आपल्या बुद्धीचा प्रभाव पाडला आहे. मग
महिषासुरासारख्या असुरांचे निर्दालन असो की सध्याच्या चंद्रयान सारख्या मोहिमांची
आखणी असो. आपली बुद्धिमत्ता, क्षमता दाखवण्याची संधी मिळाली की प्रत्येक स्त्री तेजाने
झळाळून उठते. त्या तेजाला वंदन करताना मग आपणही म्हणू लागतो,
या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥
No comments:
Post a Comment