#सुधा_म्हणे: या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता ।
20 ऑक्टोबर 23
जन्माला आलेली बहुतेक माणसे काही ना काही कामं करतात ते
स्वतःचे आणि कुटुंबाचे पोट भरण्यासाठी. आणि त्यासाठीच मग आवश्यक असते लक्ष्मी
किंवा धन. म्हणूनच देवीचे लक्ष्मीरूप सर्वांच्या पूजेत असतेच असते. प्राचीन
पौराणिक कथेनुसार समुद्रमंथन करताना त्यातून लक्ष्मी अवतीर्ण झाली. तेंव्हापासून
सर्वजण लक्ष्मीरूपाची पूजा अर्चना करतात. लक्ष्मीची पूजा करणारी सगळीच माणसे
स्त्रीकडे सन्मानाने का पाहू शकत नाहीत असा प्रश्न मात्र मला अस्वस्थ करतो.
पैशाशिवाय जगात काही चालत नाही असे आपण म्हणतो आणि म्हणूनच
लक्ष्मीचे महत्व अधिक. एका संस्कृत सुभाषितात म्हटले आहे की, “आलसस्य कुतो
विद्या अविद्यस्य कुतो धनम्..” म्हणजेच जी माणसे आळशी असतात त्यांना ना विद्या
मिळते ना धन. त्यामुळे विविध प्रकारचे शिक्षण घेऊन स्वतःची बुद्धिमत्ता वाढवणे आणि
मग प्रामाणिक प्रयत्न करून धन कमावणे हा
तर प्रत्येक माणसाच्या संसाराचा जणू पायाच असायला हवा. प्रत्येक जण आपापल्या परीने
काही ना काही करत राहतो. राबतो, पैसे कमवतो. पैसे जपत राहतो. सतत कार्यरत
असण्याऱ्या, इतरांचे भले व्हावे असा विचार करणाऱ्या व्यक्तीवर लक्ष्मी प्रसन्न
होते असे मानले जाते.
लक्ष्मीस्तुतीसाठी ऋग्वेदकाळात जे श्रीसूक्त रचले गेले त्यात देखील ही अलक्ष्मी नोंदली गेली आहे. तिथे असे म्हटले आहे की जेंव्हा आदित्यवर्णी, हिरण्मयी अशी लक्ष्मी घरी येते तेंव्हा ही अलक्ष्मी घरात थांबत नाही. त्यामुळे लक्ष्मीची आराधना केली तर अज्ञान, अंध:कार दूर होतात आणि ही अलक्ष्मी बाहेर पडते.
आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः
तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायश्च बाह्या अलक्ष्मीः||
वेदात असे लिहिलेले असले तरी घरात येऊ शकणारी अलक्ष्मी दूर ठेवायचे काम घरची लक्ष्मीच करू शकते. आपले वडील, भाऊ, पती किंवा मुलगा जर कोणतेही गैर काम करत असतील, अन्यायाने किंवा वाममार्गाने पैसे कमवत असतील तर त्यांच्या समोर रोखठोकपणे सांगायचे धाडस स्त्री दाखवू शकते. ज्या घरातील स्त्री असा ठाम पवित्रा घेते तिथे घरात येणारा पैसा हा फक्त कष्टाचाच असतो. ज्या घरात आर्थिक कमाईबाबत अशा गोष्टीवर चर्चा करताना स्त्रीला किंमत नसते, तिची मुस्कटदाबी केली जाते किंवा तिच्या योग्य सल्ल्याला डावलले जाते तिथे अलक्ष्मीचा वास असतो. अनेकांना ही गोष्ट एखादी अंधश्रद्धा वाटू शकते मात्र जर घरातील आई-बहीण-पत्नी किंवा मुलीने अवैध मार्गाने घरात येणाऱ्या संपत्तीबाबत जर कडक धोरण स्वीकारले तर समाजातील गैरकृत्ये काही प्रमाणात नक्की कमी होतील. मात्र असे घडत नाही. स्त्रीला कायम डावलले जाते.
मला एका गोष्टीचे कायम आश्चर्य वाटते की, माणूस धन संपत्ती मिळवायला इतकी धडपड करतो पण संसारातील आर्थिक घडामोडीत मात्र स्त्रीला दुय्यम स्थान देतो. आज सर्व क्षेत्रात स्त्री हिरीरीने कामे करत आहे. तरीही देशातील किमान 60 टक्के घरातील स्त्रियांना बँक / विमा किंवा प्रॉपर्टीचे व्यवहार माहिती नसतात. कित्येकदा “तुला यातले काय कळते?” हा प्रश्न जसा असतो तसेच स्त्रीने “तुम्ही / तू बघितले आहे ना मग ठीक आहे..” असे म्हणून फक्त सही करणे किंवा आर्थिक व्यवहाराकडे दुर्लक्ष करणे अत्यंत चुकीचे आहे. मुळात स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त हुशार / चतुर असते. तिला फक्त संधी मिळायला हवी. ती सर्वसमावेशक विचार करू शकते. घरातील सर्वांचा विचार करू शकते. रिस्क मॅनेजमेंट असो किंवा बचत या गोष्टी ती जास्त समर्थपणे हाताळू शकते. त्यामुळे आर्थिक निर्णय घेताना घरातील / व्यवसायातील स्त्री सहकाऱ्याला वगळून अजिबात घेतले जाऊ नयेत. घरातील सर्व कामे करणारी स्त्री आर्थिक व्यवहार, आर्थिक घडामोडी यामध्ये सक्षम असते. तिला सामील करून घ्यायला हवे.
प्राचीन काळापासून स्त्रीने आर्थिक जबाबदाऱ्या समर्थपणे
पेलल्या आहेत. आणि त्यामुळे घरातील धनसंपत्तीची वृद्धी होते. घराचे
आर्थिक व्यवहार ती प्रामाणिकपणे करते यात शंका नाही. म्हणूनच घरोघरीची लक्ष्मी
अधिकाधिक सक्षम व्हावी आणि आपणा सर्वांवर माता लक्ष्मीने वरदहस्त ठेवावा यासाठी,
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥
असे म्हणून आपण वंदन करूया.
(सोबतचे रेखाचित्र आमची कतारमधील स्नेही रूपालक्ष्मी हिने काढलेले आहे.)
-सुधांशु नाईक(9833299791)
No comments:
Post a Comment