marathi blog vishwa

Wednesday, 4 October 2023

माणसं आणि कला..!

#सुधा_म्हणे: माणसं आणि कला..!  

04 ऑक्टोबर 23

जन्माला आलेल्या प्रत्येक माणसासाठी अन्नपाणी, वस्त्र, निवारा, शरीरसुख आदि प्राथमिक गरजा असतातच. त्याची पूर्तता तो आपापल्या परीने करत राहतो. अनेकदा यांच्यातच तो कायमचा गुंतून राहतो. तरीही प्रत्येक माणसात कोणती ना कोणती कलाविषयक जाणीव ही असतेच. “जगण्यासाठी कला की कलेसाठी जीवन” यावर अनेक दशके घनघोर चर्चा होत असली तरी जगण्याच्या प्राथमिक गरजा भागल्याशिवाय कलेसाठी जगणे खूप कमी जणांना शक्य होते. मात्र कला ही जणू आकाशीची वीज असते. आपल्या अंगी कोणती कला आहे याची जाणीव बरेचदा बालवयात किंवा पौगंडावस्थेत स्वतःला किंवा आपल्या पालक/शिक्षकांना होते. आणि आयुष्यात एक वेगळाच रंग निर्माण झाल्याची निर्मळ भावना जीवन उजळून टाकू लागते. आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टी वेगळ्या नजरेने दिसू लागतात. त्या गोष्टी मग चित्र, शिल्प,शब्द,सूर आदि माध्यमातून व्यक्त करण्यासाठी आपले तनमन अधीर होऊन जाते.

मनात ज्या क्षणी जाणीव उमटते तो क्षण म्हणजे जणू एखाद्या वीजेचा कल्लोळ स्वतःमध्ये उतरावा तसा असतो. नेमकी ही जाणीव, तो विचार, ती कल्पना कशी सुचली हे सांगणे अवघडच. मात्र मनात लख्खकन चमकून उठलेली ती कल्पना प्रत्यक्षात साकार करता येणे इथे कलाकारांचे कसब कामी येते. कलाकार स्वयंभू असावेत किंवा असतात असे कितीही म्हटले तरी जन्माला आलेली ही कल्पना किंवा तो विचार हा जणू नग्न असतो. त्याला विविध शब्द/सूर/रंग/आकार यांच्या सहाय्याने घडवत असताना कलाकाराच्या प्रतिभेचा जणू कस लागतो आणि तिथेच रियाजदेखील कामी येतो. नुसतीच प्रतिभा असून पुरत नाही तर त्या प्रतिभेला घासून पुसून अधिक टोकदार करण्यासाठी अथक रियाजाची आवश्यकता असते. रियाजामुळे ज्यांची कला अधिक झळाळून उठते ती मग कालातीत होऊन जाते.

गायक, लेखक, कवी किंवा चित्रकार आपल्या मनात जन्मलेल्या विचाराला, कल्पनेला असे काही मूर्तरूप देतात की त्यासाठी आपण अगदी वेडावून जातो. मग ती आरती प्रभू यांनी लिहिलेली “ये रे घना..” सारखी एखादी कविता असो किंवा कुमार गंधर्वांनी रंगवलेली “नयन में जल भर आये..” सारखी बंदिश असो, हे सारे कलाविष्कार आपले जिवलग बनून जातात. कायम मनाच्या कुपीत दरवळत राहतात आणि कायमच आपल्याला आपले भान विसरायला लावतात अशा गोष्टी..!

मात्र जगण्यासाठी धडपड करताना अनेकदा कला बाजूला राहते आणि एखादा कलाकार योग्य संधीची वाट पहात पहात संपून जातो. तर एखाद्या कलाकाराच्या बाबतीत कुणाच्या तरी रूपाने संधी दार ठोठावते आणि तो कलाकार कुठल्याकुठे निघून जातो. बस मध्ये कंडक्टरची नोकरी करणारा रजनीकांत असो, हसरत जयपुरी असो की जॉनी वॉकर, या कलाकारांच्या अंगी असलेल्या प्रतिभेची जाणीव कुणाला तरी झाली म्हणून त्यांचे आयुष्य बदलले. त्यामुळे आपल्या आसपास असणाऱ्या कलाकारांना आपण ओळखायला हवे. त्यांना त्यांची कला फुलवायला बळ द्यायला हवे. 

फुलून आलेला, समृद्ध कलाविष्कार भरभरून देणारा एक कलाकार मग हजारो- लाखों लोकाना जगण्याची प्रेरणा देत राहतो. म्हणून कलाकार जगले पाहिजेत, वाढले पाहिजेत, समाजाने त्यांच्यासाठी सहकार्याचा हात सदैव पुढे करत राहायला हवे. त्यांच्या कलेमुळे तर रोजचे आयुष्य अधिक रंगतदार करणे, नजाकतीने फुलवणे आपल्याला शक्य झाले आहे असं मला वाटते. तुम्हाला काय वाटतं ?

-सुधांशु नाईक (9833299791)



No comments:

Post a Comment