marathi blog vishwa

Friday, 13 October 2023

माणसे : इच्छा आणि अपेक्षा...

#सुधा_म्हणे: माणसे : इच्छा आणि अपेक्षा...

13 ऑक्टोबर 23

आपण माणसे नेमके कशासाठी जगतो असा प्रश्न तुम्हाला पण कधी पडलाय ना? जन्माला येणे आपल्या हाती नसते आणि जग सोडून जाणे देखील. जन्माला आल्यापासून आपण विकासाच्या विविध टप्प्यातून आपण मार्गक्रमण करत राहतो. हे जे शरीर मिळाले आहे, त्याच्या हवा-पाणी-अन्न, वस्त्र, सुरक्षित आयुष्य आणि मैथुनादि गरजा आहेत. त्यांची पूर्तता करण्यासाठी तर आपल्याला जगावेच लागते. त्यासाठी हातपाय हलवावे लागतात. अगदी एखादे नवजात बाळ देखील वेळेवर किंवा पुरेसे दूध मिळाले नाही तर आकांडतांडव सुरू करते. पोट भरले की गालातल्या गालात स्मितहास्य करत झोपून जाते. आपल्याला जिच्या कुशीत विश्वास वाटतो ती आई सोबत नसेल तर आक्रंदन करू लागते. वय वाढत गेले की मग त्याच्या गरजा देखील वाढू लागतात आणि अपेक्षा देखील.

लहानपणापासून शरीराच्या प्राथमिक गरजा जर भागवता आल्या नाहीत तर त्याचे परिणाम मनावर होऊ लागतात असे मानसशास्त्र सांगते. इच्छा आणि अपेक्षांचे ओझे मग आपण जन्मभर सोबत घेऊन फिरत राहतो. त्या अपेक्षांना आपले ध्येय बनवतो. प्रत्येक इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा आपल्याला एका चक्रात फिरवत राहतात. आपण त्यामागे धावत राहतो.

त्यासाठी स्वतःला अधिकाधिक सिद्ध करणे, नवनवीन गोष्टी शिकून घेणे, स्वतःची कार्यक्षमता वाढवणे हे असंख्य लोक करत राहतात. आपापल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आटापिटा करतात. ठरवलेली उद्दिष्टे साध्य झाली की पुन्हा अधिक इच्छा.. पुन्हा अधिक श्रम. हे चक्र सुरूच राहते. मात्र माणूस तेवढ्यावर थांबत नाही. आपल्या अपेक्षा किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी अथक कष्ट करणे आपण समजू शकतो.

त्याचवेळी अशी ही काही माणसे असतात की दुसऱ्याला त्रास देऊन, दुसऱ्याकडील वस्तू असो की दुसऱ्याचे राज्य असो, ते ते आपल्याला मिळावे अशी इच्छा बाळगतात. त्यासाठी बळजबरी करत राहतात. इच्छा असणे वाईट नव्हे पण आपल्या इच्छेचा दुसऱ्याला त्रास होता कामा नये. आपली इच्छा त्यांना आनंद देणारी असावी हे त्यांना उमगत नाही. आपल्या अपेक्षांच्या जागी हव्यास निर्माण झाला की मग इतरांचे जगणं अवघड होऊन जाते. अमुक एक गोष्ट मिळवण्याच्या नादात, त्या नशेत बेबंद झालेली, हातात शस्त्रे घेऊन दुर्जन बनलेली अशी माणसे जणू भस्मासूर बनतात. जे जे दिसेल ते ते जबरदस्तीने आपलेसे करू पाहतात. आणि अवघे विश्व त्यांच्या कृतीने गुदमरून जाते. अस्वस्थ होऊन जाते.आपले आयुष्य असे असता कामा नये. “जे जे उत्तम उदात्त सुंदर, महन्मंगल ते ते..” आपल्याला मिळावे ही अपेक्षा प्रत्येकाने अवश्य बाळगावी. मात्र आपल्या अपेक्षांमुळे इतराना सुख आणि आनंद देता यावा अशी भावना त्यामागे असावी.

या जगात जन्माला आलो तर इथले जगणे सुंदर व्हावे ही अपेक्षा असावी. कारण रोज आपल्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी धावताना एका टप्प्यावर कळते की ठराविक इच्छांसाठी आपण किती गोष्टी गमावल्या आहेत. आणि मग शांत, निवांत जगण्याची इच्छा मनाचा ताबा घेते. इतराना देखील सुख द्यावेसे वाटते. स्वतः कष्ट करून आपल्या अपेक्षा पूर्ण करणारी आणि मग पुन्हा इतरांच्या आयुष्यात आनंद फुलवण्यासाठी धडपडणारी माणसे मग आदर्शवत बनून जातात. अशी माणसे आपली जिवलग असणे यासारखे सुख नाही.

-    सुधांशु नाईक(9833299791)







No comments:

Post a Comment