marathi blog vishwa

Thursday 5 October 2023

माणसांच्या सवयी...

#सुधा_म्हणे: माणसांच्या सवयी...

05 ऑक्टोबर 23

“माणूस हा सवयीचा गुलाम आहे..” असे म्हणतात. प्रत्येक माणसाची एखादी खास सवय किंवा लकब असते. कित्येकदा त्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही अशा तऱ्हेने ती सवय आपल्याला जाणवत असते. त्या सवयीची कारणे मात्र शोधणे गरजेचे असते. आमच्याशेजारी एक मुलगा राहायचा. त्याला सतत डोळे मिचकवण्याची सवय होती. सुरुवातीला दुर्लक्ष केले गेले पण नंतर जेव्हा डॉक्टरला दाखवले तेंव्हा लक्षात आले की त्याच्या बुबुळाच्या हालचालीत काही दोष होता. वेळीच दाखवल्यामुळे योग्य शस्त्रक्रिया कारून तो दोष दूर करता आला.

मात्र बहुतेकदा लहान मुले असोत किंवा मोठी माणसे, त्यांच्या विविध सवयींकडे दुर्लक्ष केले जाते. असे करता कामा नये. आमच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या कित्येक मुलाना  सतत तंबाखू खाण्याची सवय होती. त्या सवयीतून काहीजण बाहेर पडू शकले तर एकजण मात्र त्यापुढे जात गुटखा, मावा आणि मग गांजा आदि व्यसनाच्या गर्तेत सापडला. अनेक प्रकारे समजावून देखील त्याला त्यातून बाहेर पडता येत नव्हते. त्याचे आयुष्य अक्षरश: उद्ध्वस्त होऊन गेले. पुढे मग व्यसनमुक्ती संस्थेच्या माध्यमातून तो त्यातून बाहेर पडला पण तोवर त्याच्या आयुष्याची चाळीशी उलटून गेली. सहज सुरू झालेली एक सवय त्याच्या स्वप्नांची राख करून गेली.  कित्येक सवयी या शारीरिक समस्येमुळे असतात. योग्यवेळी त्यावर उपाय केले तर ती समस्या संपून जाते. मात्र मानसिक अस्वास्थ्य किंवा आजारामुळे आलेल्या समस्या जास्त गुंतागुंतीच्या असू शकतात.

सगळ्याच सवयी या व्यसन किंवा जास्त गंभीर असतात असे नव्हे पण त्यात समोरच्याला त्रासदायक नक्की वाटू शकतात. जेवायला एकत्र बसल्यानंतर तोंडाने मचमच आवाज करणारी माणसे, एखाद्या मीटिंगसाठी ऑफिसमध्ये किंवा घरातील दिवाणखान्यात सगळे बसलेले असताना उगीचच सतत पाय हलवणारी माणसे, सिनेमा-नाट्यगृहात किंवा एखाद्या मैफलीला गेल्यावर तिथे मोबाईल सायलेंट न करता बसणारी किंवा मोबाईलवर बोलणारी माणसे ही आपल्याला नक्कीच नकोशी वाटतात. अशा चुकीच्या सवयी शक्यतो आपल्याला नसाव्यात किंवा एखादी सवय असेल तर प्रयत्नपूर्वक ती सवय काढून टाकता यायला हवी.

नखे खाण्याची सवय, सतत हात धुण्याची सवय, उगीचच सारखे केस विंचरत बसण्याची सवय, अकारण खाकरण्याची सवय अशा सवयींच्या मागे काही अन्य कारणे असू शकतात. अशा गोष्टींचा अभ्यास मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून करणे क्रमप्राप्त ठरते. माणसाचे बालपण कसे गेले आहे, त्याचे संगोपन कसे झाले आहे, त्याच्या आयुष्यात आलेल्या विविध अडचणींच्या वेळी त्याने कशा पद्धतीने मार्ग काढला आहे किंवा त्याने कसा त्रास भोगला आहे या सगळ्याचा सूक्ष्म विचार करणे आवश्यक ठरते. तसेच अशी कोणती घटना घडली आहे की ज्यामुळे त्याला ही सवय लागली याचा विचार व्हायला हवा. जोवर एखादी सवय स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी हानीकारक ठरत नाही तोवर आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. मात्र कित्येकदा सुरू झालेल्या एखाद्या सवयीचे हळूहळू कधी व्यसनात रूपांतर होते हे आपल्यालाच कळत नाही.

सगळ्या सवयी फक्त वाईटच असतात असे नव्हे. मात्र नको त्या सवयी चटकन अंगी रुळतात तर चांगल्या सवयी या खूप चिकाटीने लावाव्या लागतात. खाणे,बोलणे, वागणे,झोपणे, प्रवास, ऑफिसमधील काम अशा सर्वच ठिकाणी अनेक चांगल्या सवयी अंगी बाणवणे गरजेचे असतेच. सकाळी वेळेवर उठणे, आपली कामे स्वतः आवरणे, घरातील विशिष्ट कामांची जबाबदारी घेणे, स्वच्छता आणि टापटीप अंगी बाणवणे, ऑफिसला किंवा एखाद्या भेटीसाठी ठरलेल्या ठिकाणी वेळेत पोचणे, कोणत्याही कामाचे नीट नियोजन करणे, आपल्या जिवलग व्यक्तींच्या आयुष्यातील महत्वाच्या क्षणी त्यांना न विसरता सोबत करणे अशा चांगल्या सवयी आपल्याला एक जबाबदार आणि समोरच्याला हवीहवीशी व्यक्ती बनवत असतात. 

आपल्याला सुखी आणि आनंदी आयुष्याची वाट चालायची असेल तर विविध चांगल्या सवयी आपण आपल्यात मुरवून घ्यायला हव्यात असे नक्कीच सांगावेसे वाटते.

-सुधांशु नाईक (9833299791)



No comments:

Post a Comment