marathi blog vishwa

Tuesday 10 October 2023

माणसे अशी का वागतात ?

#सुधा_म्हणे: माणसे अशी का वागतात ?

10 ऑक्टोबर 23

गेले काही दिवस आपण युद्धाच्या बातम्या ऐकतो आहोत. युद्धे मानवाला नवीन नाहीत. एखादी शिकार फक्त आपल्याला मिळावी यासाठी कदाचित आदिमानवाने पाहिले युद्ध केले असेल. सत्ता, संपत्ती आणि सोबती यासाठी कायमच संघर्ष घडत राहिला. स्त्रीप्रधान असलेली समाजरचना बदलून ती पुरुषप्रधान होऊन गेली त्यानंतर तर हे सारे संघर्ष अधिक तीव्र झाले. “मी..  माझे .. मला.. आणि फक्त माझ्यासाठी..” अशा भावनांमधून स्वार्थ वाढत राहिला. माणसाने स्वतः अधिक कष्ट करावेत, स्वतः काही कर्तृत्व दाखवावे आणि हवे ते साध्य करावे याला कुणाचीच आडकाठी नसते. मात्र जेंव्हा दुसऱ्याकडे असलेले सारे हिसकावून घेण्याचा हव्यास वाढतो तेंव्हा मग संघर्ष उभे राहतात.

प्राचीन काळापासून इतकी युद्धे झाली तरी माणूस अजून शहाणा होत नाही.

गेल्या काही वर्षात जगभर दहशतवादाने थैमान घातले आहे. माणसांच्या क्रौर्याचे इतके नमुने समोर येतात की मन अस्वस्थ होऊन जाते. महाभारतात देखील द्रौपदीची झालेली विटंबना असो की अभिमन्युच्या मृत्यूचे क्रौर्य अंगावर शहारा उमटवते. प्रत्येक देशाच्या इतिहासात घडलेल्या मानवाच्या असल्या  कृती पाहिल्या की “माणसे अशी का वागतात” हा प्रश्न मनाला छळत राहतो. तलवारीच्या जोरावर देशभर नंगानाच घालून धर्म विस्तार करत जाणारे, विविध प्रांताना, देशाना आपल्या अंमलाखाली आणावे म्हणून जेंव्हा हजारो लोक जेव्हा अत्यंत हिडीस असा नंगानाच घालत राहतात त्यावेळी अशा प्रवृत्ती माणसाच्या मनात निर्माणच कशा होतात असे वाटत राहते. धर्माच्या, जातीच्या, लिंगभेदाच्या जोरावर जेंव्हा असे घृणास्पद कृत्य जेंव्हा जेंव्हा घडते तेंव्हा आपण माणूस म्हणून जगत असल्याची शरम वाटते.

ही सृष्टी ईश्वराने निर्मिली असे मानले जाते. जर ईश्वर सत्य आहे, सुंदर आहे तर मग तो अशा नीच प्रवृत्ती, हे क्रौर्य निर्माणच का करतो असे वाटत राहते. एकदा एका विद्वान गृहस्थाना मी हाच प्रश्न केला होता. त्यावर ते म्हणाले की, वाईट म्हणजे काय हे तुम्हाला कळल्याशिवाय चांगल्याची किंमत कळणार नाही म्हणून ईश्वराने दुःख, दैन्य, क्रौर्य आदि वाईट गोष्टींची निर्मिती केली आहे. ते ते तुम्ही भोगल्यावर मग तुम्हाला कळेल की सुख,शांती,समाधान काय असते. मला ही गोष्ट पटली नाही. मुळात जगभर दुःख कशाला निर्माण करायला हवे, सगळ्यानी गुण्यागोविंदाने, सुखाने, आनंदाने राहणे, एकमेकाना सदैव उदंड प्रेम देत राहणे हे जास्त गरजेचे असल्याने अशा वाईट गोष्टी निर्माणच व्हायला नको होत्या. सर्वेपि सुखिन: संतु.. असे का घडू शकत नाही. जर ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली तर तो नक्कीच सगळे सुंदर घडवू शकला असता. वाईट प्रेरणा, वाईट वासना, वाईट विचार आपल्या मनात निर्माणच झाले नसते तर किती बरे झाले असते ना ?

जग निर्माण करण्यामागे त्या निर्मात्याने हे असे सगळे काही घडवले आणि त्याच्यात आपले जीवन होरपळते आहे. “जे खळांची व्यंकटी सांडो..” असे ज्ञानोबा आर्तपणे ईश्वराला विनवून गेले तरी समाजातील खलप्रवृत्ती काही संपता संपत नाहीत आणि माणसे अशी क्रौर्याने का वागतात हा प्रश्न आपली पाठ सोडत नाही हेच खरे.

-    सुधांशु नाईक(9833299791)

1 comment:

  1. खूप छान आहे लेख

    ReplyDelete