#सुधा_म्हणे: माणसाचे सुख आणि दुःख
06 ऑक्टोबर 23
सुख आणि दुःख ही तर
मानवाच्या आयुष्यातील सतत सोबत असणारी गोष्ट. “सुख पाहता जवाएवढे, दुःख
पर्वताएवढे..” असे तुकोबा म्हणतात तर शब्दप्रभू गदिमा “ एक धागा सुखाचा.. शंभर
धागे दुःखाचे..” असे म्हणून जातात. जन्माला येणे आणि एकदिवस मरून जाणे या दोन
अपरिहार्य गोष्टीच्या मध्ये अख्खे आयुष्य असते. आपल्या प्राक्तनात असणारी सगळी
सुखे-दुःखे भोगल्याविना इथून सुटका नसते. सुखाचे भरपूर दिवस सदैव आयुष्यात असावेत यासाठी आपापल्या आयुष्यात
आपण सगळेच प्रयत्न करतो. नवनवीन गोष्टी शिकतो. अधिकाधिक मेहनत करतो. कधी भल्या तर
कधी वाईट मार्गाने धनसंपत्ती, प्रॉपर्टी आदि गोष्टी मिळवतो. भौतिक सुखाच्या सर्व
गोष्टी मिळवायचा अट्टहास करत राहतो. उत्तमोत्तम वस्तूंचा संग्रह, कांचन आणि कामिनी
यातून मिळणाऱ्या सुखासाठी केलेली धडपड हे सगळ्यांच्याच आयुष्यात कमी अधिक फरकाने
असतेच असते. काहीजणाना पारलौकिक सुखाची ओढ लागते. ते योगाभ्यास, गुरुपदेश आदि
मार्गाने त्यातील सुख शोधत राहतात. कधी मिळवतात तर कधी तळमळत राहतात.
या सगळ्या प्रवासात कायम सोबत मात्र दुःखाची असते. शारीरिक वेदना, योजलेल्या कार्यात अपयशी होणे, अपेक्षाभंग, फसवणूक, मानहानी आदि अनेक प्रकारे दुःख सोबत येत राहते. तरीही सुखाची ओढ त्या सगळ्या दुःखावर मात करायचे बळ देत राहते. कित्येक माणसे दुःखाच्या या अडथळ्याना पार करून सुख मिळवतात तर काहीजण दुःखापुढे कोलमडून जातात, उद्ध्वस्त होतात. आपल्या आयुष्यात सुख शोधणारी माणसे आपण जगभर पहातोच. मात्र जे दुसऱ्याला सुख मिळावे यासाठी प्रयत्नशील राहतात तीच माणसे देवमाणसे म्हणून गौरविली जातात.
दुसऱ्याच्या सुखापायी स्वतः दुःख सोसणारी ही माणसे माणुसकीचे एक अपार लोभस असे दर्शन घडवतात. अशी माणसे विरळा असली तरी त्यांचे आदर्श आपल्याला आयुष्यकडे सकारात्मक नजरेने पाहायला उद्युक्त करतात. माणसाने आदर्शवत कसे जगावे यासाठी समर्थ रामदासांनी कायमच लोकाना मार्गदर्शन केले. सुख-दुःखाबाबत बोलताना ते म्हणतात की आपल्या सुख-दुःखापलीकडे जाऊन इतरांसाठी जगायला हवे. दासबोधात ते लिहितात,
दुसर्याच्या
दुःखें दुःखवावें । परसंतोषें सुखी व्हावें ।
प्राणीमात्रास मेळऊन घ्यावें । बर्या शब्दें ॥
सोप्या भाषेतील किती
परिणामकारक शब्द आहेत हे. दुसऱ्याला सुख देता यायला हवे. भुकेलेल्याना अन्न,
तहानलेल्याला पाणी आणि ज्याला सहकार्याचा, मैत्रीचा, हात हवा तो त्याला द्यायला
हवा. हे आपण देऊ शकलो की त्या चेहेऱ्यावर जे स्मित उमटते त्याची किंमत खरंच अनमोल
आहे. सुखाचे हे क्षणच मग दुःखाच्या हजारो
क्षणापेक्षा लक्षात राहतात. जगायला पुनःपुन्हा बळ देतात. बरोबर ना ?
सुधांशु नाईक(9833299791)
No comments:
Post a Comment