marathi blog vishwa

Friday, 6 October 2023

माणसाचे चालणे... बोलणे...

#सुधा_म्हणे: माणसाचे चालणे... बोलणे...  

06 ऑक्टोबर 23

शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे..” असे समर्थ रामदासांनी छत्रपती शंभूराजेना पाठवलेल्या पत्रात लिहितात. आपले असणे, दिसणे हे आपल्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग असते. त्यामुळे ते अधिकाधिक प्रसन्न, आत्मविश्वासपूर्ण असणे म्हणूनच आवश्यक ठरते. छत्रपती शंभुराजांना देखील आपले व्यक्तिमत्व अधिकाधिक उत्तम करण्यासाठी समर्थ इथे चार शब्द सांगतात त्याचवेळी नेमकेपणाने काय करायला हवे हेही सुचवतात. 

प्रत्येकाचे बोलणे, चालणे हे वेगवेगळे असते. प्रत्येक माणसाची वागण्या-बोलण्याची एक पद्धत असते. ज्याला हल्ली आपण behavioral skills असे म्हणतो. बरेचदा आपण कसे वागतो हे मुख्यत्वे  अनुकरणातून घडते किंवा आपले पालक / शिक्षक काय सांगतात त्यानुसार घडते. आपल्याला जे भावते त्याचे आपण अनुकरण करतो. त्यामुळे जे जे उत्तम आहे ते ते आपण अंगी बाणवणे आवश्यक असे समर्थांच्या सारख्या लोकहित पाहणाऱ्या व्यक्तीला वाटणे साहजिक आहे.

मानसशास्त्रीय अभ्यासात एखाद्या व्यक्तीचे बारकाईने निरीक्षण करणे गरजेचे असते ज्यामध्ये त्या व्यक्तीचे चालणे, बोलणे, समोरच्या किंवा इतर व्यक्तीशी असलेली वर्तणूक यांचा मोठा वाटा असतो. आपण आपल्या नकळत आपल्या चालण्या-बोलण्यातून आपले व्यक्तिमत्व, आपली विचारसरणी, आपली जीवनमूल्ये हे सारे दाखवून देत असतो. 


ताठ मानेने शांत पाऊले टाकत चालणारी व्यक्ती, चपळ आणि वेगवान चालणारी व्यक्ती, मान खाली घालून पाठीला कुबड काढून चालणारी व्यक्ती, पायाचे किंवा चपलांचे आवाज करत चालणारी व्यक्ती, धांदरटपणे चालताना सतत ठेचकळणारी व्यक्ती, सतत घाबरलेल्या मनस्थितीत गोंधळून चालत असलेली व्यक्ती, इतरांना न्याहाळत जाणारी व्यक्ती अशा अनेक माणसांना आपण कायम पाहत असतो. त्या त्या व्यक्तीला पाहिल्यावर आपल्या मनात त्याच्याविषयी एक मत लगेच तयार होते. कित्येकदा “दिसते तसे नसते” या उक्तीचा प्रत्यय येत असला तरी प्रथमदर्शनी मनावर उमटणारा ठसा देखील महत्वाचा ठरतोच. म्हणूनच आपल्या चालण्याविषयी, वागण्याविषयी जाणीवपूर्वक विचार करणे अत्यावश्यक ठरते.

आपले वागणे, बोलणे, चालणे हे अधिकाधिक आत्मविश्वासपूर्ण असावे. आपल्या वागण्यातून समोरच्या व्यक्तीला आपण सन्मानाने वागवत आहोत हे जाणवायला हवे. आपले वागणे असे असावे की समोरच्या व्यक्तीला आपल्याविषयी विश्वास आणि जिव्हाळा वाटायला हवा. आपल्या बोलण्यात अर्वाच्च शब्द नसावेत, आपल्या बोलण्याचा स्वर स्थिर आणि शांत असावा. उगीचच ओरडून मोठ्याने बोलणे, समोरच्याला लागेल असे कुत्सित किंवा खुनशी बोलणे टाळायला हवे. रोजच्या आयुष्यात आपण घराच्या आसपास, कामाच्या ठिकाणी, प्रवासात शेकडो लोकांना भेटत असतो. कित्येकाना पाहत असतो. त्यातूनच काही मोजक्या लोकांशी आपले नाते जुळते कारण आपल्याला त्यांचे वागणे बोलणे आवडलेले असते. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात काहीतरी समस्येचा, अडचणींचा सामना करत असतेच. आपले वागणे जर छान सुंदर असेल तर इतरांना आपल्याशी बोलावेसे वाटेल. इतरांशी आपला सुसंवाद निर्माण होईल. 

या जगात सगळीच माणसे सर्वगुणसंपन्न असू शकत नाहीत. मात्र ती एकमेकांशी प्रेमाने, आनंदाने बोलत राहिली तरी पुरेसे असते. “माणसाने माणसाशी माणसासम बोलणे” इतके जरी सर्वत्र नियमित घडत राहिले तरी समाजातील निम्मे प्रश्न सहज सुटू शकतील असे मला वाटते.

-सुधांशु नाईक (9833299791)


No comments:

Post a Comment