#सुधा_म्हणे: या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता ।
21 ऑक्टोबर 23
जन्माला आलेल्या प्रत्येकाचे आयुष्य अनेक चढ उतारातून जात
असते. कष्ट, दुःख, वेदना तर आयुष्याचा एक घटक आहेच. त्या सगळ्यापार जात त्यांच्या
आयुष्यात सुख, शांती, समृद्धी असावी हे महत्वाचे. आपण कितीही काही परिश्रम घेतले
तरी शेवटी नशिबाचा भाग उरतोच आणि म्हणूनच आपण ईश्वरी शक्तीला शरण जातो.
शांती लाभणे ही मात्र फार महत्वाची गोष्ट. एखाद्याकडे
कोणतीही गोष्ट नसतानादेखील तो शांत राहू शकतो तर एखाद्याकडे सर्व काही असूनही तो
अस्वस्थ असू शकतो. जन्मल्यापासून मरेपर्यंत मनुष्यास कोणत्या ना कोणत्या इच्छा,
अपेक्षा असतात. प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याच्या नादात आपण धावत राहतो. किती
धावतोय, कुठे धावतोय हे कळेनासे होते आणि मग आयुष्यातील शांती नष्ट होऊन जाते.
इतकेच नव्हे तर वाढत्या महत्वाकांक्षा, अपेक्षा, हव्यास यामुळे माणसे मग दुसऱ्याला
त्रास देऊ लागतात. जात, पंथ, धर्म, प्रांत, देश अशा प्रत्येक गोष्टीवरून मग वाद,
ईर्ष्या, चढाओढ, स्पर्धा हे सारे सुरू होते. आणि संगळ्यांचीच शांती भंग होते.
आपल्या पौराणिक कथा, पुराणे वाचली तर असे लक्षात येते की जेंव्हा जेंव्हा असुरांमुळे त्रिलोकाची शांती भंग होऊ लागली तेंव्हा सर्वजण आदिमायेला शरण गेले. तिच्या सल्ल्याने कधी शंकर, कधी विष्णू यांनी विविध अवतार घेऊन त्या दैत्यांचे पारिपत्य केले. जेंव्हा सर्व देवसुद्धा हतबल ठरले तेंव्हा देवीने अवतार घेऊन महिषासुरसारख्या दैत्यांचे निर्दालन केले. प्रत्येक गोष्ट असावी पण ती प्रमाणात असावी असे आपला धर्म मानतो. जेंव्हा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होतो तेंव्हा मग आपली मानसिक, शारीरिक शांती भंग होते. लोकांचे हव्यास वाढले की इतराना त्रास दिला जातो आणि मग अशांतीच्या वादळात अवघे विश्व हेलकावत राहते.
सध्या आपल्याला जगभर सुरू असणारी लहानमोठी युद्धे, अंतर्गत
कलह हे सगळे ठाऊक आहे. या सगळ्याचा बारकाईने विचार केला तर सगळीकडे पुरुषी
आक्रमकता, पुरुष नेतेच सर्व ठिकाणी दिसतात. हिजबूल्ला , आयसिस, हमाससारख्या अत्यंत
घातक अशा दहशतवादी संघटनेमुळे जे युद्ध सर्वत्र सुरू आहे त्या सारख्या संघटनेत तर
स्त्रियांना केवळ भोगवस्तू म्हणूनच वापरले जाते. हे माणुसकीला काळीमा फासणारेच
आहे. जिथे स्त्रीला माणूस स्त्रीला एखादा निर्णय घेण्यात सहभागी करून घेणे ही तर
त्यामुळे दूरची गोष्ट. घरातील स्त्री ही घरातील सर्वांचा विचार करते. सर्वांच्या
सुखा-समाधानासाठी राबत असते. त्यामुळे जर जगभरातील स्त्रियांना जर सन्मानाने
वागवले गेले, विविध निर्णयात त्यांना सक्रिय सहभाग घेऊ दिला तर विश्वहिताच्या
निर्णयात नक्कीच वाढ होईल असे मला वाटते. जगभरातील दुष्ट प्रवृत्तीना नष्ट करून
सर्वत्र शांती आणि सुख देणारी अशी देवता गावोगावी स्त्रीच्या रूपात मानली जायला
हवी. पूर्वी गौरी, दुर्गा आदि रूपात देवीने विश्वशांती निर्माण केली होती.
तसे दिवस पुन्हा यावेत मग आपण सर्वजण अतीव
आनंदाने नक्कीच असे म्हणू शकू,
या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।
आपल्या घरापासून जगभरात सर्वत्र शांतता निर्माण व्हावी यासाठी जगन्मातेला मनोभावे वंदन करूया..!
-सुधांशु नाईक(9833299791)
No comments:
Post a Comment