marathi blog vishwa

Monday, 16 October 2023

माणसे आणि कृतज्ञता

#सुधा_म्हणे: माणसे आणि कृतज्ञता

16 ऑक्टोबर 23

प्रत्येक माणूस वेगळा आणि त्याचे कार्य वेगळे. आपल्याला जन्म देणारी आणि काही ना काही कार्य आपल्याकडून करवून घेणारी ती जगन्माता. नवरात्र सुरू असताना जगन्मातेची आठवण येणे ही साहजिकच. तिच्याप्रती श्रद्धा आणि कृतज्ञता असणे जितके आवश्यक तितकेच आयुष्यात आलेल्या प्रत्येक बऱ्या वाईट क्षणाप्रती देखील आपण कृतज्ञ असायला हवेच ना ?

आयुष्य आपल्याला रोज नवनवीन काही देत असते. आपण रोज म्हणतो की तेच तेच काम, तेच तेच रुटीन आणि त्याच त्याच जबाबदाऱ्या आहेत. तरीही भेटणारी माणसे वेगवेगळी असतात. घडलेले प्रसंग वेगवेगळे असतात. कधी आपण अडचणीत असतो, कसल्यातरी चिंतेत असतो तर कधी समोरची व्यक्ती. अशा वेळी कुणीतरी कुणाला तरी धीर देते. जमेल तशी मदत करते. अगदीच काही करता येत नसेल तर भावनिक, मानसिक आधार देता येतो. 

माणसांना आपल्या समस्या कळतात. त्यावरील उत्तरे कित्येकदा माहितीदेखील असतात. मात्र निर्णय घेण्याचे कधी धाडस होत नाही तर कधी संकोच असतो. अशा वेळी एखादा कुटुंबीय, मित्र, सहकारी किंवा आपला शिक्षक यातील कुणीतरी आपल्या पाठीशी उभे राहतात. अशी माणसे असोत किंवा एखाद्या मंदिरात वा विशाल वटवृक्षाखाली शांत एकटेच बसल्यावर मिळालेली स्थिरता आपल्याला निर्णय घ्यायला बळ देतात. त्या क्षणी आपल्याला जो आधार मिळतो त्यामुळे आपण त्यातून पुढे निघतो. पुढला प्रवास, तिथली आव्हाने यांना अधिक आत्मविश्वासाने सामोरे जातो. प्रसंगी धडपडतो पण यशस्वी होतो. या सर्व प्रवासाला आपली मेहनत आणि बुद्धी यांची जोड दिलेली असतेच मात्र ज्यांनी त्या एका अवघड क्षणी आपल्याला आधार दिला त्यांच्याप्रती कृतज्ञ राहणेही गरजेचेच.

आयुष्यात अनेक क्षण येतात, कधी सुखाचे, आनंदाचे, अपमानाचे, दुःखाचे, विजयाचे किंवा पराभवाचेदेखील. त्या प्रत्येक क्षणाने आपल्याला काहीतरी दिलेले असते. जेंव्हा समाधान मिळते तेंव्हा आपण त्याबाबत एखाद्या व्यक्ती किंवा समूहाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्यासाठी कधी भेटवस्तू देतो किंवा आयुष्यभर ऋणी राहतो.

 

सगळेच क्षण चांगले नसतात. किंबहुना दुःख, ताण तणाव किंवा फसवणुकीचे क्षण जास्त येतात आयुष्यात. नवीन कधी धडा मिळतो. शांत बसून मग विचार केला की लक्षात येते की ही कामे करताना आपण भावनेच्या भरात किंवा कुणाच्या तरी दबावाखाली एखादा निर्णय घेतला होता ज्यामुळे हे सगळे भोगावे लागले. घडलेली चूक मग सुधारावी कशी याचा विचार सुरू होतो. आपल्याला काय करावे हे उमगले नाही तर  लढत राहतो किंवा हताश होऊन जातो. हे सगळे क्षण नकोसे वाटतात. मात्र तेच क्षण आपल्याला नवीन धडा किंवा नवीन अनुभव शिकवतात. एका अर्थी तेच आपले गुरु बनतात. जेंव्हा आपण हे क्षण, तो त्रास भोगतो त्यावेळी आपल्याला ते क्षण नकोसे वाटतातच. मात्र काही वर्षानंतर जेंव्हा आपण सिंहावलोकन करतो त्यावेळी जाणवते की तो विशिष्ट क्षण आयुष्यात आला म्हणूनच काहीतरी वेगळे आपण करू शकलो. नव्या वाटा शोधू शकलो. म्हणून त्या क्षणाप्रती, घालवलेल्या त्या अवघड दिवसांप्रति आपण कृतज्ञ असायला हवे. 

जगात अनेक माणसे आपल्याला भेटतात. कित्येकांच्या साठी आपणही काहीतरी करत असतो. सगळीच माणसे कृतज्ञ असतातच असे नाही. कित्येकदा तर कृतघ्नपणाचे अनुभव येतात. असे घडले तरी आपण आपली मानसिक शांती न गमावणे हेच इष्ट. कारण पुन्हा एकदा असे कृतघ्नपणाचे अनुभव आपल्यालाच शहाणे करतात म्हणून त्यांच्याप्रती देखील कृतज्ञ राहायला हवे. आपल्या आयुष्यात अनेकजण अप्रत्यक्षरीत्या देखील आपले होऊन जातात. लता-आशा- सुधीर फडके-अमिताभ- यांच्यासारख्या असंख्य कलाकारांनी आपल्याला प्रसंगी आपापल्या कलेतून आनंदांचे क्षण दिलेले असतात. अनेक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्ते यांचे आपल्यावर असलेले ऋण देखील फेडता न येणारे.

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आज आपापल्या घरी,गावी आपण सुखेनैव राहतो, खातो-पितो-गातो-मौज करतो ती सीमेवर आपले जवान कार्यरत असतात म्हणूनच. प्रसंगी आपल्या जीवांचे बलिदान करणाऱ्या या जवानांसाठी आपण कृतज्ञ राहायला हवे. येत्या महिन्याभरात दसरा दिवाळीसारखे सण आपण साजरे करताना त्याना आठवणे आणि त्यांच्यासाठी लहानमोठे कार्य करणे हे आपले कर्तव्य आहे असे मला वाटते.

-    सुधांशु नाईक(9833299791)

No comments:

Post a Comment