#सुधा_म्हणे: सोन्यासारखे रहा..!
24 ऑक्टोबर 23
आज विजयादशमी. वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींनी मिळवलेल्या विजयाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस. प्रतीकात्मक सोने म्हणून आपण एकमेकाना आपट्याची पाने देतो. शुभेच्छा देताना म्हणतो, “सोने घ्या आणि सोन्यासारखे रहा..!” किती छान ओळ आहे ना ही..?
सोन्यासारखे रहाणे म्हणजे नुसतेच चमकत राहणे नव्हे. किंबहुना “चमकते ते सारे सोने नसते..” ही म्हण देखील आपल्याला माहिती असतेच. सोन्यासारखे राहणे म्हणजे शुद्ध राहणे. गुणवंत होणे. सोने हा धातू हवा, पाणी, वायू यांच्या संपर्कात कधी खराब होत नाही. तो शुद्ध राहतो. अन्य धातूंची संयुगे बनतात पण सोने बावनकशी शुद्ध राहते. उष्णता, थंडी यांच्यामुळे देखील सोन्याला विशेष फरक पडत नाही. त्याचे काठिन्यदेखील वेगळे आणि त्याची तन्यताही वेगळीच. प्रचंड उष्णतेत, भट्टीत तापवल्याविना सोने झळाळून उठत नाही. बाह्य परिस्थितीच्या परिणामाने विचलित न होणारे असते तेच सोने बनते. ही प्रक्रिया अजिबात सोपी नसते. उलट जीवघेणी असतेच. मात्र ध्येयनिश्चिती असेल तर येणाऱ्या सर्व अडचणीतून शांत चित्ताने मार्ग काढता येतो.
आपल्या भारतीय इतिहासात इतकी थोर थोर माणसे सर्व क्षेत्रात होऊन गेली, ती देखील लहानपणापासून अनेक संकटांना तोंड देत मोठी होत गेली आहेत. विविध आपत्ती, कष्ट, वंचना, वेदना सहन करताना विचलित होत नाहीत म्हणून तर अशा झळाळून उठलेल्या माणसांचे तेज आपल्याला दिपवून टाकते. त्यांचा आदर्श घ्यावा असे वाटते. आपले आयुष्य त्यांच्यासारखे हवे असे वाटत राहते. त्यासाठी गरज असते ती आपल्या चौकटी, आपले “कम्फर्ट झोन” सोडून बाहेर पडायची. आव्हाने अंगावर घेण्याची.!
विजयादशमीचा सण, हा दिवस सीमोल्लंघनाचादेखील. तसे सीमा
ओलंडण्याचे क्षण आयुष्यात अनेकदा येतच असतात. हा क्षण वेगळाच असतो. आपल्याला त्रास
देणारी गोष्ट, मग तो शत्रू असेल किंवा एखादी समस्या. त्याला तोंड देण्यासाठी,
त्याच्यावर मात करण्यासाठी केलेल्या सज्जतेची परीक्षा पाहणारा. आपल्या चौकटी भेदून
आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी नव्याने पाऊल टाकायला भाग पाडणारा.
मनात एकीकडे उत्साह, एकीकडे हुरहूर, एकीकडे विजयाची आस
आणि एकीकडे पराभवाची चिंता हे सगळे असतेच मनात. अर्थात नुसतीच चिंता किंवा विचार
करत बसून कार्य घडत नाही. त्यासाठी कृती करावी लागते. पाऊल उचलावेच लागते. आज ना
उद्या येणाऱ्या त्या क्षणासाठी तर हा मुहूर्त. शूर योद्ध्यांचे हात या दिवशी
शिवशिवू लागतात. नवी क्षितिजे, नवी आव्हाने त्यांना खुणावू लागतात. त्यासाठी
केलेल्या प्रयत्नामुळे आत्मविश्वास वाढलेला असतो. आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने काहीतरी
साध्य करण्यासाठी अशा अधिकाधिक लोकांची सीमोल्लंघने समाजासाठी आवश्यक असतातच. म्हणूनच
दुष्ट शक्तीवर मात करून सुष्ट शक्तींच्या विजय होण्यासाठी जगातील सर्वाना बळ मिळो.
माणसे अधिकाधिक सोन्यासारखी तेजस्वी होत राहोत यासाठी आपण ही म्हणूया, “सोने घ्या,
सोन्यासारखे रहा.”
-सुधांशु नाईक (9833299791)
No comments:
Post a Comment