marathi blog vishwa

Wednesday 11 October 2023

माणसांच्या भावभावना..

 #सुधा_म्हणे: माणसांच्या भावभावना..

11 ऑक्टोबर 23

ईश्वराने ही सृष्टी निर्मिली. आसपास वावरणाऱ्या माणसांचे वैविध्य पाहिल्यावर असे वाटते की प्रत्येकासाठी त्याने नवनवीन साचे बनवले असतील. एक माणूस जन्मल्यावर त्याने तो साचा जणू मोडून टाकला असावा. आपण रोज पाहतो ती शेकडो हजारो माणसे.. सगळी किती वेगवेगळी. प्रत्येकाचे देह तर वेगवेगळे असतातच पण मानसिकता आणि भावभावनांचे प्रकटीकरण देखील वेगळे असते.

माया, ममता, जिव्हाळा, वात्सल्य, बंधुभाव, प्रेम, वासना, मोह, लोभ, राग, मत्सर, अहंकार आदि सगळ्या भावनांचे उत्कट आविष्कार आपल्याला आपल्या सभोवती पाहायला मिळतात. प्रत्येक क्षणी माणूस वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत राहतो. परिस्थिती तशीच असली तरी माणसानुसार त्याच्या वागण्याची पद्धत बदलते. भावना बदलतात. समजा घरी मुलाच्या हातून कपबशी पडून जर फुटली तर आई बाप लगेच ओरडतात, “डोळे फुटले का रे तुझे. एक काम धड करता येत. साधी कपबशी नीट हातात धरता येत नाही..”. मात्र ज्यावेळी सासू सासरे किंवा बॉसच्या हातून कपबशी पडली तर याच व्यक्ती  “राहू द्या हो.. असू दे..” असे म्हणत ओशाळवाणे हसून दाखवतात.

 

अनेकदा आपली नाती ही वैयक्तिक गरजा, दुसऱ्याकडून अधिकाधिक अपेक्षा किंवा मग विविध माणसे किंवा समूहाशी असलेले व्यवहार यावर अवलंबलेली असतात. मॅस्लोच्या मानसशास्त्रीय संकल्पनेनुसार आपल्या ऐहिक गरजा भागवण्याकडे आपला अधिकाधिक कल असतो. आणि त्यांची पूर्तता झाल्याखेरीज आपण व्यक्तिमत्व विकासाच्या पुढील पायऱ्याकडे शक्यतो वळत नाही. त्यामुळे जेंव्हा एखादी व्यक्ती निरपेक्षपणे वागते त्यावेळी त्या व्यक्तीकडे अधिक गौरवाने पाहायला हवे. आपल्या स्वतःच्या इच्छा, अपेक्षा यांना मुरड घालून इतरांच्या भावना जपण्याकडे अशा लोकांचा कल असतो. विविध भावनांचे मनोव्यापार निरीक्षण करताना आपल्याला प्रत्येक व्यक्ती नव्याने उमगत जाते. एखाद्या क्षणी ती कोणत्या प्रकारची भावना व्यक्त करते, कशा प्रकारे व्यक्त करते हे सारे आपण शांतपणे पाहत राहिलो की समोरचा माणूस मग अधिकाधिक उलगडत राहतो.

वरती नमूद केलेल्या विविध भावना आपण विशिष्ट नात्यांशी जोडायची देखील फार घाई करतो त्यामुळे वात्सल्य हे फक्त आई आणि मूल या नात्यातच असते असे मानतो. खरतर या सर्व मानवी भावभावना विविध प्रसंगी, विविध व्यक्ती एकमेकांसाठी व्यक्त करू शकतात. एखादी व्यक्ती किती उत्कटपणे आपले आयुष्य जागते, आपल्या भावभावना कशा पद्धतीने हाताळते यातून त्या व्यक्तीचे भावनिक / मानसिक स्वास्थ आपल्याला समजू शकते. आजकाल म्हणूनच अनेक ठिकाणी एखाद्याचे व्यक्तिमत्व विश्लेषण करताना आयक्यू (इंटेलिजन्स कोशंट) इतकेच किंवा त्यापेक्षा जास्त ईक्यू (इमोशनल कोशंट) चा विचार केला जातो. त्याची चाचणी केली जाते. 

ज्या व्यक्ती आपल्या आणि दुसऱ्यांच्या भावना नीट जपतात, बुद्धीपेक्षा अनेकदा भावनेने विचार करून सर्वांच्या भल्यासाठी निर्णय घेतात त्यांचे जगणेच वेगळे असते असे मला वाटते. बरोबर ना?

-    सुधांशु नाईक(9833299791)

No comments:

Post a Comment