marathi blog vishwa

Monday 9 October 2023

माणसे आणि मनोविकार

#सुधा_म्हणे: माणसे आणि मनोविकार

09 ऑक्टोबर 23

माणसे. हाडामांसाची बनलेली. सगळे अवयव तेच असले तरीही प्रत्येकाची ठेवण वेगळी आणि मनस्थिती वेगळी. उत्तम निरोगी देहामध्ये तितकेच निरोगी मन असतेच असे नाही आणि शरीराचे त्रास सहन करणाऱ्याकडे फार मोठे मन देखील असू शकते. देव आणि दानव कुणी वेगळे नसतात. ते आपल्यातच दडलेले असतात. मनातील विकारांचे प्राबल्य झाले की आपण इतरांसाठी दानव बनतो आणि विकारांवर योग्य नियंत्रण प्राप्त करून चांगले जगू लागलो की इतरांसाठी आपण जणू देव बनतो. शरीराचे आजार किंवा विकार लगेच लक्षात येतात मात्र मनोविकार लगेच उमगतीलच असे नाही.

कित्येकदा आपल्याला उमगले तरी ते स्वीकारण्याची मनस्थिती नसते. पूर्वी तर मनोविकार म्हणजे वेडेपण असेच मानले जाई. शक्यतो ते लपवण्याकडेच कल जास्त दिसून येत असे. आता मात्र समाजात काही प्रमाणात बदल होत आहे. आपल्या मनाला ओळखणे, आपल्यातील विकारांना ओळखणे हे नेहमीच आवश्यक असते कारण तरच त्याचा अभ्यास करता येतो आणि योग्य ती कृती करणे शक्य होते.


कामवासना, राग, लोभ, मोह, मत्सर आदि सगळ्या भावना आपल्यामध्ये असतातच. जगण्यासाठी काही प्रमाणात त्या आवश्यकदेखील आहेत. मात्र अनेकदा त्यांच्यावर आपल्याला नियंत्रण ठेवता येत नाही. हे विकार आपला ताबा घेतात आणि आपल्या आयुष्याला घुसळून टाकतात. मग ते रागीटपण असो वा चांगुलपण. सुख दुःखे सहन करत माणूस पुढे जात असतोच. मात्र जेंव्हा जेंव्हा दुःख होते तेंव्हा तेंव्हा त्याचे कारण दुसऱ्या कुणाकडे ढकलण्याची माणसाची सामान्य प्रवृत्ती असते. सुख किंवा आनंद मिळाला तर तो स्वतःमुळे आणि दुःख मिळाले तर त्याला दुसरे कुणीतरी कारणीभूत आहे असे म्हणणे सर्वत्र पाहायला मिळते. आपल्या समस्येपासून दूर जाण्यासाठी वापरलेला एक प्रकारचा पलायनवाद असतो हा. आणि माणसे जेंव्हा आपल्या समस्येच्या मुळाशी जाऊन ती दूर करण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून अशी स्वतःचीच समजूत काढू पाहतात तेंव्हा मनोविकार जास्त प्रमाणात उफाळून येत असावेत.

एखाद्याला अचानक आपण रागाने काहीतरी बोलतो, प्रत्येकवेळी तो राग त्याच माणसाविषयी असतोच असे नाही. काहीतरी मनात साचून राहिलेले एखादे निमित्त मिळाल्यावर अचानक उफाळून येते. आणि त्यामुळे आपलीच हानी होऊ शकते. म्हणूनच तर जनांकरिता मनाचे श्लोक लिहिणारे समर्थ रामदास लिहितात की,

नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु ॥६॥

मनाची ताकद इतकी मोठी की भले भक्कम आणि बलवान देह असलेली माणसेदेखील मानसिक ताणामुळे गलितगात्र होऊन जातात. त्यामुळे मनाची ताकद ओळखणे, मनातील विकार जाणून त्याला योग्य रीतीने हाताळणे आवश्यक होऊन जाते. मानसशास्त्रासारख्या शाखेच्या माध्यमातून मनाच्या अवस्थेची, विचारांची, विकारांची योग्य चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्याकडे आता आपण अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आपल्या सहवासातील लोकांमध्ये देखील मनोविकार आढळू शकतात. त्यांना आपण समजून घेतले पाहिजे. त्यांचे बारकाईने निरीक्षण करत राहिले, त्यांच्याशी प्रेमाने – विश्वासाने बोलत राहिले की त्यांना त्या विकारांशी झुंजायला आपण बळ देऊ शकतो.

आपल्या मनातील वाईट विचार किंवा आपल्या चुकीच्या कृती ओळखणे, मग ते टप्प्या टप्प्याने कमी करत आपल्यातून काढून टाकणे ही एक फार मोठी प्रक्रिया आहे. आपल्या विकासासाठी ही प्रक्रिया घडत राहिल्यामुळे आपल्यातील वाईटपण कमी कमी होईल आणि सज्जनत्व वाढत जाईल. कुकर्मे घडण्याऐवजी हातून सत्कर्म घडत राहील आणि ज्ञानोबा म्हणतात तसे “तया सत्कर्मी रती वाढो.. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे..” अशी सुंदर अवस्था माणसे अनुभवू शकतील. मनोविकारांच्या गुंत्यात अडकून पडण्यापेक्षा असे सुंदर जीवन जगणे सर्वाना नेहमीच हवेहवेसे असेल ना ?

-    - सुधांशु नाईक(9833299791)

No comments:

Post a Comment