marathi blog vishwa

Thursday 12 October 2023

माणसांची नाती..

#सुधा_म्हणे: माणसांची नाती..

12 ऑक्टोबर 23

जगातील इतक्या जीवांमधील एक जीव म्हणजे माणूस. प्राचीन भारतीय साहित्याच्या आधारे सांगायचे तर प्रत्येक जीवाला 84 लक्ष योनीतून प्रवास करावा लागतो म्हणजे इतके जीव जगात आहेत. सध्या विज्ञानाच्या सहाय्याने यांचा अचूक आकडा कदाचित शास्त्रज्ञाना कळला देखील असेल. थोडक्यात काय इतक्या करोडो जीवांमधील एक असा हा माणूस. माणसे आपले नातेसंबंध कसे जोडतात, कसे तोडतात, कसे निभावत राहतात हे सगळे फार अभ्यासण्यासारखे आहे.

मुळात दोन माणसे एकमेकांसारखी नसतात. त्यामुळे जिथे आपल्याला हव्या त्या विषयाशी गोडी समोरच्या व्यक्तीला आहे हे उमगले की मग माणसे एकमेकांच्या जवळ येतात. कित्येकदा आपल्यापासून खूप दूर, जणू जगाच्या दोन टोकांवर असणारी माणसे देखील अचानक एकत्र येतात. स्वतःला आवडणारे गाणे असो की छंद असो, ते दुसऱ्यालाही आवडते हे उमगले की मनात एक आनंदाची लहर फुलून येते. ती व्यक्ती आपली भासू लागते. समान आवडीनिवडीमुळे दोघे मित्र बनतात, जिवलग होतात. जीवनाच्या अखेरपर्यंत एकमेकाना साथ देऊ पाहतात.

त्याचवेळी अगदी रोज दिसणारी माणसे देखील मनाच्या गाठी न पडल्यामुळे परकी होऊन जातात. नियतीचे खेळ वेगळेच असतात आणि कुणाची कधी गाठ भेट होईल हे सांगता येत नाही हेही खरे. कधीतरी असेही घडते की जे आपल्याकडे नाही ते एखाद्याकडे असल्याचे पाहून त्याचे अतिशय आकर्षण वाटते आणि दोस्ती जुळते. मात्र अशी नाती दीर्घकाळ टिकतील की नाही हे त्या दोन व्यक्तींच्या समंजसपणावर अवलंबून असते. भाऊ बहीण, आई बाप आणि मुले, पती आणि पत्नी या सर्वमान्य नात्यांच्या पलीकडे जाऊन काही नाती अशी फुलतात की त्यांच्या जगण्याकडे आपण थक्क होऊन पाहत राहतो. दोन मित्रांच्या दोस्तीच्या मग कहाण्या होतात. तर कधी दोन भावांच्या वैरापायी अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होऊन जाते.

 

नात्यांची गंमत अशी की कोणतेच ठोकताळे आपण कायमस्वरूपी मानू शकत नाही. आपण दुसऱ्याला काय देतो आणि आपल्याला काय हवे यावर अनेक नाती अवलंबून असतात. समाजात जगताना तर पैसाअडका, जमीनजुमला, नोकरी, व्यवसाय, महत्वाकांक्षा,सत्तापिपासू वृत्ती यावर अनेक नात्यांचे ताणेबाणे ठरतात. लोकांचा हव्यास अनेकदा जाणवतो. जुनी पिढी नव्या पिढीला “आमच्यावेळी अशी नाती नव्हती..” असे म्हणत राहते. नात्यांच्या परिभाषा प्रत्येक पिढीत बदलत राहतात. कोण बरोबर कोण चूक हे ठरवण्यापेक्षा त्या त्या प्रसंगानुरूप, त्या त्या कालानुरूप नात्यांच्याकडे पाहायला हवे. स्वतःच्या सुखासाठी जेंव्हा माणसे दुसऱ्याचा बळी देऊ लागतात तेंव्हा मात्र मन अस्वस्थ होते. त्यामुळे प्रसंगी आपले सुख बाजूला ठेवून जेंव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याला सुखी करायला धडपडताना दिसते तेंव्हा मन प्रफुल्लित होते.

दुसऱ्याकडून कोणतीच अपेक्षा न ठेवता त्यांच्यावर सुख उधळणारी माणसे पाहिली की मग ओठावर गाणे येते;

आयुष्याला उधळीत जावे केवळ दुसऱ्यापायी

त्या त्यागाच्या संतोषाला जगी या उपमा नाही..

जन्म असावा देण्यासाठी एक मनाला ठावे...

सतत स्वार्थी विचार करत, स्वतःच्या गरजांपायी प्रसंगी जगाला वेठीस धरणाऱ्या लोकांपेक्षा निरपेक्ष प्रेमाने दुसऱ्याला सुखावत राहणाऱ्या माणसांची समाजाला अधिक गरज आहे असे मला वाटते.

-    सुधांशु नाईक(9833299791)

No comments:

Post a Comment