marathi blog vishwa

Monday 30 October 2023

माणसे आणि प्रेम...

#सुधा_म्हणे: माणसे आणि प्रेम.. 

30 ऑक्टोबर 23 

माणसे जन्माला येतात तीच मुळी उरात प्रेमभावना घेऊन. आईच्या उदरात असताना तिच्या श्वासाशी, तिच्या शरीराशी आपण एकरूप झालेलो असतो. गर्भातील त्या वातावरणाशी आपली शब्दश: नाळ जुळलेली असते. तिथून बाहेर आल्यावर त्या आईविषयी प्रेम असते ते अधिक स्पष्ट जाणवते. मग आसपासचे जग दिसू लागते. डोळ्याना माणसे, वस्तू, झाडे, पाने, फुले, घरे, नदी, समुद्र असे सगळे सगळे दिसू लागते. काही गोष्टींबाबत फार प्रेम वाटते तर काही गोष्टींबद्दल कधी भीती, कधी तिरस्कार, कधी क्रोध, कधी मत्सर वाटत राहतो. कित्येकदा असे होते की कालांतराने आपल्या भावना बदलूही शकतात किंवा आहे तशाच कायम राहतात. कित्येक माणसे आपल्याला सुरुवातीला अजिबात आवडत नाहीत किंवा काहीजण प्रथम भेटीत आवडून जातात. कुणीतरी त्यांच्याविषयी काही खरे-खोटे बोललेले असते. तेच आपण मनाशी ठरवून ठेवतो. मात्र कालांतराने त्यांच्या संपर्कात आल्यावर मग आपल्याला ती व्यक्ती नक्की कशी आहे हे तपासून पाहता येते. सुरुवातीला आपल्या डोळ्यांवर जणू एक पडदा असतो. चांगल्या किंवा वाईट विचारांचा. त्याच नजरेने आपण पाहत बसतो. जेंव्हा आपण एखाद्याला त्याच्या गुण आणि अवगुणासकट स्वीकारतो तेंव्हा जी प्रेमभावना मनात राहते तीच खरी असे म्हणायला हवे.


जेंव्हा एखाद्या व्यक्तीविषयी तुम्हाला प्रेम वाटते तेंव्हा तुम्ही त्याचा एखादा न आवडणारा स्वभावगुण वा लकब, त्याची विशिष्ट वर्तनशैली स्वीकारू शकता का हाच मुख्य प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. आपण त्याला हे दोष, किंवा हे अवगुण दाखवून दिल्याने तो दुखावेल का असा विचार करून जर त्याबाबत बोलणे टाळले तर ते योग्य नव्हे. त्याला ते न्यून दूर करण्याची मग संधीच मिळणार नाही. अर्थात जेंव्हा आपले एखाद्या व्यक्तीवर प्रेम असते तेंव्हा त्याच्यामधील हे अवगुण कमी व्हावेत, संपून जावेत म्हणूनदेखील आपण प्रयत्न करायला हवेत.

आधी प्रेम या शब्दाकडे आपण मुळात नीट पाहायला हवे. कारण प्रेम हा शब्द आपण फार वरवर किंवा उथळपणे वापरतो असे मला वाटते. प्रेम म्हटले की सर्वसामान्य लोकांना फक्त “प्रियकर प्रेयसी” चे प्रेम आठवते. मजेची गोष्ट म्हणजे त्याकडे देखील आपण निर्व्याज नजरेने पाहत नाही. “दुसऱ्याने केले तर ते लफडे..” असाच सर्वसाधारण लोकांचा समज. निसर्गाच्या नियमानुसार भिन्नलिंगी व्यक्तिमध्ये जिव्हाळा निर्माण होतोच. त्या प्रेमाचे किती स्तर असतात. मानसशास्त्राच्या अभ्यास करताना बहुसंख्य वेळा आई-मुलगा, बाप-मुलगी, भाऊ-बहीण, नवरा-बायको, मित्र-मैत्रीण, सासरा-सून आदि भिन्नलिंगी नात्यात जास्त जिव्हाळा किंवा जवळीक असल्याचे जाणवते जितकी जवळीक बाप-मुलगा, सासू-सून, बहिणी-बहिणी यांच्यात नसतेच. त्याची अनेक कारणेदेखील असतात. शारीरिक आणि मानसिक पातळीवर आपल्या मेंदूत / विचारात अनेक लोचे होत असतात ज्यामुळे अशा प्रेमभावना निर्माण होतात. भरपूर वाढतात किंवा संपून जातात. आपल्याला त्याकडे स्थिरपणे पाहता यायला हवे.

प्रेम नीट फुलवले तर ते आनंद देते. जसे एखाद्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत हळुवार रंगत गेलेले गायन असते तसे. तिथे कुणी गायक/वादक एखादा राग उभा करतो, रंगवतो. प्रेमाचे नाते तसेच. जसे त्या रागाचे सगळे स्वर तेच असले तरी प्रत्येक कलाकाराची मैफल वेगळी भासते. त्याचे कारण त्याने केलेली उपज. ठरवलेले, शिकलेले इतकेच जर त्याने गायले तर काही मैफिली झाल्यावर मग त्याच्या गाण्यात मजा आहे असे वाटत नाही. मात्र एखादा गायक नवनवीन स्वरावल्याची निर्मिती म्हणजे “उपज” करत राहतो. आपले गाणे अधिक सर्जनशील करत राहतो. स्वतःही आनंद घेतो आणि दुसऱ्यालाही आनंद देतो. प्रेमाचे नाते असेच असते. तिथे एकमेकाना जपण्यासाठी नवनवीन कृतींची उपज हवी. आपण केलेल्या अशा छोट्या छोट्या कृतींमुळे नाते फुलते. प्रेम वाढत राहते. ही वाढत राहणारी प्रेमभावना आपल्यातील न्यून कमी करून गुण वाढवायला मदत करते. कृतिशील बनवते. नवनवीन काहीतरी करायला प्रेरणा देत राहते. असे प्रेम करणारे जिवलग आपल्याजवळ असणे यासारखी दुसरी आनंदी गोष्ट नाही असे मला वाटते.

-सुधांशु नाईक(9833299791)

No comments:

Post a Comment