#सुधा_म्हणे: माणसे आणि भूतदया
28 ऑक्टोबर 23
गावात घुसलेल्या गव्याला हुसकावून लावणाऱ्या जमावाची चित्रफीत पाहताना एक मित्र तावातावाने म्हणत होता, “अरे, माणसे माणसाशी नीट वागत नाहीत तर प्राण्याशी कशी नीट वागतील?” त्याचदिवशी संध्याकाळी बातमी आली की एका मोठ्या कंपनीच्या अधिकाऱ्याचा भटक्या कुत्र्यानी चावल्यामुळे अचानक मृत्यू झाला. आणि सर्वत्र सोशल मिडियात चर्चा रंगली की समस्त भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करायला हवा आहे वगैरे. आपल्या आसपास एखादा अपघात घडतो, एखादी गाडी आपल्याला धडक देऊन जाते म्हणून लगेच आपण सगळ्या गाड्यांवर बंदी आणतो का? मग हे फक्त कुत्र्यांच्या बाबतीतच का? ते बोलू शकत नाहीत म्हणून ?
जग हे परस्पर सहकार्य आणि
सामंजस्यावर चालते. शक्यतो जंगलातील प्राणी आपणहून कुणावर आक्रमण करत नाहीत. ते
आपल्या वाटेने जात असतात. आपल्या परिघात राहतात. माणसे अशी वागत नाहीत. खूपशी
माणसे शांत रहातात. आपल्या आखलेल्या वाटेवरून इतराना इजा न करता चालत राहतात. मात्र
अनेकांना सतत हव्यास असतो अधिक जमीन हवी, अधिक
पैसा हवा, अधिक चैन – मौज मस्ती हवी. आणि मग ही माणसे इतरांकडून त्या गोष्टी
ओरबाडून घेऊ लागतात. अशाच माणसांनी मग जंगलावर अतिक्रमण केले. नदीवर, समुद्रावर,
तलावांवर अतिक्रमण केले. प्रत्येक गोष्ट आपल्या फायद्यासाठी हवी म्हणून अनेक
प्राण्याना गुलाम बनवले. प्रत्येक प्राणी केवळ आपल्याला काय देईल याचाच विचार केला.
दूध, कातडी, मांस तर आपण त्यांच्याकडून घेतोच पण शारीरिक कष्टदेखील करायला लावतो. इतकेच
नव्हे तर त्यांना करमणुकीसाठी देखील वापरुन घेतो. एकेकाळी आपण सर्कस पहायचो. त्यात
विविध वन्यप्राण्याना माणसाला हवे आहे तसे प्रशिक्षित होण्यासाठी किती वेदना सहन
करायला लागायच्या. हे किती अमानुष आहे. सुदैवाने आता त्यावर बंदी आली आहे.
तशीच गोष्ट शिकारीची. माणसे
स्वत:च्या करमणुकीसाठी शिकार करत होती. अनेक प्राण्यांचे जीव घेतले गेले. वाघ,
चित्ते, सिंह यांच्यासारख्या देखण्या प्राण्यांना, कित्येक दुर्मिळ प्रजातीच्या
पक्ष्यांना आपण नष्ट केले. जे जीव उरले त्यांच्यासाठी कित्येक जंगलात पुरेशी जागाच
उरली नाही. जंगले मोठ्या वेगाने संपत गेली. कित्येक प्रजाती आता अस्तित्वात नाहीत
त्याला मोठ्या प्रमाणात माणूस कारणीभूत आहे.
समाजातील महत्वाचा घटक म्हणून
आपण इतराना भूतदया दाखवायला हवी. त्यांना मुक्त असे त्यांचे अधिवास द्यायला हवेत असे
मला वाटते.
-सुधांशु नाईक (9833299791)
No comments:
Post a Comment