marathi blog vishwa

Tuesday, 3 October 2023

माणसं..!

#सुधा_म्हणे: माणसं..!  

03 ऑक्टोबर 23

माणसं. होमो सेपियन्स असे शास्त्रीय भाषेतील नाव असलेली एक प्रजाती.  ही प्रजाती इतर प्राण्यांच्यापेक्षा फार वेगळी. जे कुणी खूप चांगले वागते त्यांना आपण देव माणूस म्हणतो तर कुणी वाईट वागले तर त्यांना दानव किंवा असुर म्हणतो. मात्र एकट्या मानवाने स्वतःच देवत्व किंवा दानवत्व नक्कीच दाखवून दिले आहे. त्यातही गंमत अशी की, बहुसंख्य वेळा एक माणूस हा कधीच पूर्णपणे देव नसतो आणि दानव देखील. तो कमी जास्त प्रमाणात दोन्हीही असतो हेच खरे.

किती प्रकारची असतात ना माणसे? उंच, बुटकी, आडव्या देहाची, उभट शिडशिडीत, जलद चालणारी, संथ चालणारी. त्यांची नजर देखील किती वेगळी. कुणी भिरभिरत्या नजरेची, तर कुणी उदासीन थंड नजरेची. कुणी खुनशी तर  कुणी स्वप्नील नजरेची. कुणी संशयी नजरेची तर कुणी वासनेने ओतप्रोत भरलेली. एखाद्या माणसाला नुसते बघितले तरी अपार जिव्हाळा, माया आपल्या मनभर दाटून येते. तर कुणाला बघितले की शिसारी येते.  कुणा कर्तबगार माणसाला पाहिले की थक्क व्हायला होते तर कुणा कमनशिबी व्यक्तीला बघताना मनात कणव दाटून येते. एखाद्या माणसाने अतिशय गरीबीतून पुढे येत आपले आयुष्य घडवलेले असते. तो आदरणीय ठरतो. एखादा माणूस कधी भल्या तर कधी बुऱ्या मार्गाने पटापट मोठ्या यशाच्या पायऱ्या चढताना दिसतो. तर कधी एखाद्या सुप्रसिद्ध किंवा श्रीमंत माणसाची आयुष्य जगताना अगदी वाताहत होऊन जाते. कुणी एखाद्या व्यसनात अडकतो तर कुणी सगळ्या आशा, अपेक्षा यांच्या पलीकडे जात साधू, संन्यासी बनून जातो. 

प्रत्येक माणसाची स्वतःची अशी एक कहाणी असतेच असते. कधी सुखद, तर कधी दुःखद अशी. कधी सुख किंवा दुःख यांच्या पलीकडे जाणारी. प्रत्येक कहाणीची आपली आपली ताकद असते. सगळ्यांच्याच कहाण्याना प्रसिद्धी मिळत नाही याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्याकडे काहीच नाहीये.

माणूस का आणि कसा घडतो याबाबत अथक संशोधन होते आहे. मानसशास्त्र, समाजशास्त्र यासारख्या शाखांतून याबाबत केवढा तरी अभ्यास होत आहे. वेगवेगळी माणसं कशी घडली हा प्रवास जाणून घेणे देखील फार सुरेख असते. समाजात असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे काही ना काही कर्तृत्व असतेच. त्याला चांगले किंवा वाईट असे लेबल न लावता त्याच्याकडे एका तटस्थ नजरेने आपल्याला पाहता यायला हवे. ही व्यक्ती अशी का घडली, याचे व्यक्तीविशेष काय आहेत हे जेंव्हा आपल्याला उमगेल तेंव्हा माणसाची माणसाकडे पाहायची नजर बदलून जाईल. विशिष्ट चष्म्यातून आपल्याला काही पाहण्याची गरज उरणार नाही. 

जगात सगळे चांगले असतेच असे नाही. मात्र वाईट कमी करून चांगले जास्त घडत राहावे यासाठी माणसेच एकमेकाना मदत करू शकतील हे नक्की.

 - सुधांशु नाईक (9833299791)

No comments:

Post a Comment