marathi blog vishwa

Friday, 3 November 2023

आकाशी झेप घे रे पाखरा...

#सुधा_म्हणे:  आकाशी झेप घे रे पाखरा..

01 नोव्हेंबर 23

वर्षभर “सुधा म्हणे..” या लेखमालेतून आपण विविध विषयांवरील चिंतन, मनातील स्पंदने अनुभवली. आता वर्षअखेर केवळ दोन महिन्यांवर आली. इथून पुढील काही दिवस आपण आपल्याला आवडणारी गाणी, त्यातून गीतकारांनी मांडलेले विचार, त्यांचे मनोगत, दिसणारे जीवन दर्शन याबाबत बोलावेसे वाटते. आवडेल ना तुम्हाला ?

आज निवडलेले हे पाहिले गाणे आहे जगदीश खेबुडकर यांचे. कोल्हापुरातील मंडळी आणि त्यांच्या जवळच्या परिवारातील लोक त्यांना नाना म्हणत. एका शाळेत शिक्षक असलेल्या नानांनी शाळेतील मुलांना तर मनापासून शिकवलेच. पण आपल्या लेखणीतून झरलेल्या गीतांनी लोकांना नुसतेच रिझवले नाही तर प्रसंगी प्रोत्साहनपर बोल देखील ऐकवले. एकेकाळी मेळयात गीते लिहिणाऱ्या नानांनी हजारो गीते लिहिली जी आजतागायत प्रसिद्ध आहेत. 1960 पासून मराठी चित्रपटसंगीतात आपला अमीट ठसा उमटवणाऱ्या जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेले हे गीत प्रत्येकासाठी किती प्रेरणादायी आहे. आपण सगळेच आपल्या कम्फर्ट झोन मध्ये असतो. आपल्याला आपली स्वप्ने खुणावत असली, नवे क्षितिज दिसत असले तरी आपण तिकडे चटकन जात नाही. कित्येकदा आळस जास्त असतो अंगात तर कित्येकदा अपयशाची भीती. आहे त्या परिस्थितीत निवांत बसून राहणे बरे वाटतेच माणसांना...!


अंगी प्रचंड सामर्थ्य असूनही स्वतः एका कोषात बंदिस्त झालेल्या अशा गरुडाना ते म्हणतात,

आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा..

किती परिणामकारक शब्द. अवघ्या 6-7 शब्दांचा हा मुखडा. एकदम मनावर असा काही परिणाम करतो की आपण बाकीचे विचार बाजूला ठेवून हे गाणे ऐकू लागतो.

घर कसले ही तर कारा, विषसमान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा, तुज आडवितो हा कैसा उंबरा

तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने
दरीडोंगर हिरवी राने, जा ओलांडुनी या सरिता-सागरा..

कष्टाविण फळ ना मिळते, तुज कळते परि ना वळते

हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा..


ज्याच्या अंगी सामर्थ्य आहे, ज्याला भरारी मारण्यासाठी देवाने भव्य पंख दिले आहेत त्याने कारागृहासारख्या घरात का बंदी व्हावे, त्याने तर दरी डोंगर, राने, समुद्र यांच्या पलीकडे जायला हवे. कष्टेवीन फळ नाही, कष्टेवीन राज्य  नाही असे समर्थ रामदास म्हणतात तसेच या गीतात देखील म्हटले आहे. समाजात प्रत्येकाला देवाने काहीतरी वरदान दिलेले तर आहेच. आपण आपल्या अंगी असलेल्या त्या प्रतिभेचे देणे ओळखावे आणि आकाशी भरारत राहावे. सर्व माणसे असे उत्तम आणि उत्कट जगत राहिली तर आपोआप सगळे जगणे सुंदर होऊन जाईल ना ?

-सुधांशु नाईक(9833299791)

No comments:

Post a Comment