इतिहास, साहित्य, संगीत, प्रवास, मानसिक स्वास्थ्य आणि माणसं यांच्याविषयी काही मनापासून सांगणारा हा माझा ब्लॉग...!! त्यासोबतच काही प्रासंगिक लेखनही. जरुर वाचत रहा. प्रतिक्रियाही कळवत रहा.
Sunday, 31 December 2023
जरा विसावू या वळणावर...
Saturday, 30 December 2023
मज आवडले हे गांव...
Friday, 29 December 2023
पंचतुंड नररुंड मालधर…
Thursday, 28 December 2023
मी मज हरपून बसले गं...
Wednesday, 27 December 2023
हम को मन की शक्ती दे ना…
Tuesday, 26 December 2023
हृदयी माझ्या नित्य विराजे....
Monday, 25 December 2023
जगी ज्यास कोणी नाही...
Friday, 22 December 2023
जिथे सागरा धरणी मिळते...
Thursday, 21 December 2023
मी ही सुंदर, तू ही सुंदर...
Wednesday, 20 December 2023
जग दोघांचे असे रचू की....
Tuesday, 19 December 2023
उषाताई आणि ससा तो ससा...
Monday, 18 December 2023
नमस्कार माझा हा ज्ञानमंदिरा...
Saturday, 16 December 2023
या लाडक्या मुलांनो...
#सुधा_म्हणे: या लाडक्या मुलांनो..
16 डिसेंबर 23
शाळेतील दिवस हे शक्यतो सर्वांसाठी न विसरता येणारेच असतात. मित्र, खेळ, वह्या पुस्तके, पीटीचा तास, प्रयोगशाळा, ते फॉर्मलीनचे वगैरे वास या सगळ्यासोबत न विसरणारी आठवण असते ती शाळेतील प्रार्थनेची. प्रत्येक शाळेची प्रार्थना ठरलेली असते. आपली शाळा संपून किती वर्षे झाली तरी शाळेतील ती प्रार्थना आठवतेच. शाळेची घंटा, त्यानंतर लाऊडस्पीकरवरुन दिलेल्या सूचना झाल्या की शाळेतील सुरेल मुलांच्या आवाजात प्रार्थना सुरू होई.
कित्येक शाळातून आता रेकॉर्डिंग ऐकवले जात असले तरी आपल्याच ओळखीच्या मुलांनी म्हटलेली प्रार्थना, ती विशिष्ट लय हे सगळे मनात अगदी फिट्ट बसून जात असे. प्रार्थनेपूर्वी शाळेत पोचायला हवे नाहीतर हातावर छडी बसेल ही भीती जसे असायची तसेच आज पुन्हा दोस्त नव्याने भेटतील, आज अमुक तासाला काहीतरी नवीन शिकवतील याचीही ओढ असायची. तो परीपाठाचा तास, एखादी प्रार्थना, मार्गदर्शन करणारे एखादे भाषण किंवा गाणे हे कायम लक्षात राहत असे.
मधुकर जोशी यांनी लिहिलेले हे गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात जेंव्हा आपण ऐकतो तेंव्हा कुणीतरी मायेने आपल्याला शिकवत आहे असेच वाटून जाते. लहानशी मुले देखील चटकन आकर्षित होतील अशी साधी सुरेख चाल त्याला दिली होती दशरथ पुजारी यांनी.
या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार
नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार..
आईस देव माना, वंदा गुरूजनांना
जगी भावनेहूनी त्या कर्तव्य थोर जाणा
गंगेपरी पवित्र ठेवा मनी विचार..
शिवबापरी जगात दिलदार शूर व्हावे
टिळकांपरी सदैव ध्येयास त्या पूजावे
जे चांगले जगी या त्याचा करा स्वीकार..
एखाद्या दूरच्या वस्तीमधून मुले दोन तीन किलोमीटरचे अंतर चालत एखाद्या गावी शाळेत येतात. कित्येकदा त्यांना उपाशीदेखील यावे लागत असेल. अशा मुलांना आपण का शिकायला हवे, शिक्षण घेतल्याने आयुष्यात काय फरक पडणार आहे आपले आदर्श कोण असायला हवेत हे सगळे अशा एखाद्या गीतातून जेंव्हा सहजपणे 2 मिनिटात त्यांना समजते तेंव्हा आपल्या भविष्यात आपण सुरेख काही करूया असा आत्मविश्वास त्यांच्यात वाढणारच.
एखादे मूल मोठे झाल्यावर पुढे जाऊन जेंव्हा
सांगते की, “अमुक एक गाणे ऐकले किंवा एखादे पुस्तक वाचले किंवा अमुक एक भाषण ऐकले आणि त्यामुळे मी बदलून
गेलो..” तेंव्हा त्या रचनाकर्त्या लोकांना किती समाधान होत असेल ना?
-सुधांशु नाईक (9833299791)
Friday, 15 December 2023
अवघा आनंदी आनंद...
Thursday, 14 December 2023
भक्तीवाचून मुक्तीची...
#सुधा_म्हणे: भक्तीवाचून मुक्तीची...
14 डिसेंबर 23
मनुष्य रोजच्या आयुष्यात आपापली कामे करतो आणि ईश्वराची भक्ती करतो ती बहुतेकदा कोणतातरी
हेतू मनात ठेऊन. ज्या माणसांना निरपेक्ष जगता येते ती संत माणसे. कित्येकदा अशी माणसे आसपास
दिसतात आणि त्यांच्याकडे पाहून एक शांत जाणीव आपल्या मनभर पसरून जाते. अशाच एका माणसाची
आठवण या गाण्यामुळे आठवणीत भरून राहिली आहे.
एकेकाळी रोज सकाळी लवकर उठून कामावर गेल्यावर तिथे एका टपरीवर आम्ही मित्रमंडळी चहा
प्यायचो. टपरी चालवणारे पांडूमामा वारकरी होते. सगळ्यांशी प्रसन्न हसत बोलायचे. ते नोकरीचे
सुरुवातीचे दिवस. खूप कमी पगार असायचा. कधी रोजच्या चहाला देखील पैसे नसायचे. त्यामुळे टपरीवर
आमची उधारी असायची. तिथे वही ठेवलेली असे. त्यात आपणच आपली नोंद करायची, महिन्याचा पगार
झाला की पैसे द्यायचे अशी पद्धत.
एकदिवस त्यांना विचारले की मामा कुणी काय नोंद केलीये हे तुम्ही बघत नाही. प्रत्येकाला आपला हिशोब
स्वतःच बघ सांगता आणि महिनाअखेरीला तो देईल ते पैसे घेता. पण तुम्हाला कुणी फसवले तर..?
ते फक्त हसले म्हणाले, अरे, दहापैकी एखादा असतो, कधी 10-20 रुपये कमी लिहितो वहीत. त्याचे
त्याला माहिती असते की आपण या मामाला फसवले आहे. त्याच्याशी माझी वागण्याची पद्धत बदलत
नाही. त्यामुळे माझ्या मनावर कसलेच टेन्शन नसते, त्याला मात्र आपण केलेल्या एका चुकीचे कायम
स्मरण राहते. त्याचे मन एकतर स्वतःला खात राहते किंवा तो अधिक मोठे गुन्हे करायला निर्ढावतो.
दोन्हीमध्ये नुकसान त्याचेच.
मी म्हटले, मामा तुम्ही तर संत माणूस आहात. मग हसले आणि म्हणाले, तसे नाहीये. माझीही कुठे
सुटका झालीये सगळ्यातून. पण कुठे जायचे आहे हे आता कळू लागलंय. आपण कायम आपल्या मस्तीत
जगतो. लहानपण,तरुणपण उलटून अगदी अंथरुणावर पडलो की मग देव आठवू लागतो. आपण फक्त
पोटासाठी, आपल्या घरच्यांच्यासाठी कामे करतो आणि आयुष्याच्या शेवटी काहीही न करता देवाने कृपा
करावी, मुक्ती द्यावी असे म्हणतो. देव कनवाळू आहे म्हणून तो नीट वागतो पण आपण खरे त्याचे
अपराधीच आहोत. त्याच्यातले कनवाळूपण आपल्यात आले तर जगण्याला खरा अर्थ आहे. त्यापुढे काही न
बोलता मग गाऊ लागले;
भक्ती वाचून मुक्तीची मज, जडली रे व्याधी
विठ्ठल मीच खरा अपराधी || धृ ||
ज्ञानेशाचे अमृत अनुभव, अनुकम्पेचे नेत्री आसव
स्वप्न तरल ते नकळे शैशव, विरले त्यांत कधी... विठ्ठला || १ ||
संत तुक्याची अभंगवाणी, इंद्रायणीचे निर्मळ पाणी
मीच बुडविला दृष्ट यौवनी, करुणेचा हा निधी.. विठ्ठला || २ ||
सरले शैशव स्वच्छंदीपण, नुरले यौवन नुरले मी पण
परी न रंगले प्रमत्त हे मन, तुझ्या चिंतनी कधी.. विठ्ठला || ३ ||
आज जवळपास तीस वर्षे उलटून गेली. रस्त्याच्या रुंदीकरणात कधीतरी ती टपरी पण गेली. त्या भागात
अनेक वर्षे गेलोदेखील नाही. आता मामा कदाचित या जगात नसतील देखील. रोजच्या धावपळीत कधीतरी
जेंव्हा जेंव्हा हा अभंग कानावर पडतो तेंव्हा त्यांची हमखास आठवण येते. अस्वस्थ असलेलं मन शांत
शांत होऊ लागते..!
-सुधांशु नाईक (9833299791)
Wednesday, 13 December 2023
पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला..
#सुधा_म्हणे: पान जागे फूल जागे,भाव नयनी जागला..
13 डिसेंबर 23
मराठी
भावगीतातील युगुल गीतांची परंपरा फार जुनी. त्यातही आशा भोसले आणि सुधीर फडके
यांची युगल गीते गेली कित्येक दशके लोकांना सदैव भुरळ घालतात. त्या गाण्याना
सामान्य माणसाच्या हृदयापर्यन्त पोचवण्यासाठी महत्वाचे ठरायचे ते त्या गीताचे सहजसुंदर
शब्द. ग दि माडगूळकर आणि त्यांच्या पाठोपाठ जगदीश खेबुडकर यांनी कायमच अत्यंत
सोप्या शब्दातील आशयसंपन्न गाणी लिहिली. प्रणयरम्य गीते लिहिताना देखील त्यांचा
तोल कधी ढळला नाही. उलट प्रेम, प्रीती आदि भावनाना त्यांनी एक सुरेख रुपडे दिले.
खेबुडकर यांनी लिहिलेले हेदेखील त्यातलेच एक अग्रणी गीत.
पान जागे फूल
जागे भाव नयनी जागला
चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला !
चांदण्यांचा गंध
आला पौर्णिमेच्या रात्रिला
चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला !
स्पर्श हा रेशमी
हा शहारा बोलतो
सूर हा ताल हा
जीव वेडा डोलतो
रातराणीच्या फुलांनी
देह माझा चुंबिला !
“चांदण्याचा
गंध आला.. पौर्णिमेच्या रात्रीला..” असे हळवे हळवे तरल बोल लिहिणे ही किती कठीण
गोष्ट. नाना सहजपणे जे अलवार लिहून जातात त्याची नजाकत ओळखून मग बाबूजी आणि
आशाताईनी या गाण्याला एक वेगळाच लाडीक स्वर लावलाय. ते शब्दांत सांगून थोडेच
कळणार? गाणे ऐकताना ते आपोआप मनात झिरपत जाते..उमगत जाते.
लाजरा बावरा हा
मुखाचा चंद्रमा
अंग का चोरिसी
दो जिवांच्या संगमा
आज प्रीतीने सुखाचा
मार्ग माझा शिंपिला !
मधुकंस
रागाच्या जवळपास जाणारी ही सुरावट इतकी मधाळ आहे की हे गाणे ऐकत ऐकत निःशब्द व्हावं. जिवलगाच्या जवळ
बसून बागेत फुललेल्या रातराणीचा धुंद गंध अनुभवत राहावं. तो चंद्र, ती पौर्णिमा,
तो सहवास आणि तो सुगंध यांचीच मग एक कविता बनून जाते..! आयुष्य सुंदर आहे यावरील
विश्वास अधिकाधिक दृढ होऊ लागतो.
-सुधांशु नाईक (9833299791)
Tuesday, 12 December 2023
कबिराचे विणतो शेले..
#सुधा_म्हणे: कबिराचे विणतो शेले..
08 डिसेंबर 23
मराठी भावगीते आणि भक्तिगीते यांच्या क्षेत्रात माणिक वर्मा यांचे स्थान फार वरचे. त्यांचा तो जरा ढाला तरीही मनात सहज उतरणारा सूर कानी पडला की आपली मनस्थिती पटकन बदलून जाते. अमृताहुनी गोड हे गाणे असू दे किंवा क्षणभर उघड नयन देवा हे गाणे असू दे, माणिकबाईंचा आवाज कानी पडला की एक प्रेमळ मायाळू व्यक्ती सोबत असल्यासारखे वाटू लागते. त्या जेंव्हा “घननिळा लडिवाळा...” गातात तेंव्हा तेही गाणे आपल्या हृदयापर्यन्त सहज पोचते. पु.ल. देशपांडे यांना तर त्यांचा आवाज कायमच आवडत असे आणि त्यांनी संगीतकार म्हणून काम करताना त्यांना महत्वाची गाणी दिली होती.
देव पावला या चित्रपटासाठी गदिमानी एक सहजसुंदर भक्तीगीत लिहिले आणि संगीतकार पुलंनी त्याला यमन रागाचे सुरेख रुपडे दिले. गदिमा लिहिताना इथे धनुर्धारी राम, बंधविमोचन राम आदि सुप्रसिद्ध उपमा न वापरता कौसल्येचा राम असे म्हणत त्याला लोभसवाणे मूल बनवून टाकतात. हा राम शूर वीर पराक्रमी नाही तर अगदी मायाळू आणि कनवाळू असा आहे. आणि अगदी हीच भावना माणिकबाईंच्या सुरातून पाझरत राहते. आपल्याला शांतवत राहते.
कबिराचे विणतो शेले, कौसल्येचा राम
भाबड्या या भक्तासाठी, देव करी काम !
कबीर. 16/17 व्या शतकात असलेले एक महान व्यक्तिमत्व. उत्तम कवी असलेले कबीर तितकेच फक्कड होते. रोखठोक व्यक्त होणारे कवी होते. समाजाने सुधारावे यासाठी तळमळणारे होते. अशा कबिरासाठी राबणारा राम या पुराणकथेवर अवलंबून असलेले हे गाणे. ईश्वर आपल्या भक्ताची खूप काळजी घेतो या भाबड्या भक्तीसाठी पूरक असलेले हे शब्द.
एक एकतारी हाती, भक्त गाई गीत
एक एक धागा जोडी, जानकिचा नाथ
राजा घनःश्याम !
दास रामनामी रंगे, राम होइ दास
एक एक धागा गुंते, रूप ये पटास
राजा घनःश्याम !
राजा असलेला राम, जानकीपती राम कबिरासाठी हे करत बसतो. जगाच्या दृष्टीने कबीर हा केवळ एक विणकर. समाजात अगदी खालच्या थरात असलेल्या एखाद्या भक्तासाठी ईश्वराचे हे रूप आपल्या स्वरातून माणिकबाई अगदी सगुण साकार करून दाखवतात.
विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होइ काम
ठायि ठायि शेल्यावरती, दिसे रामनाम
गुप्त होई राम !
कबिराचे ते सगळे काम पूर्ण केल्यावर राम तिथे अजिबात थांबून राहत नाही. आपण केलेल्या कामाचा डंका पिटत बसत नाही ही गोष्ट गदिमा सूचकपणे लिहून जातात. आज काही लहान मोठी कामे केली तरी स्वतःची पाठ थोपटून घेत फिरतो आपण. इथे राजा रामासारखा एक महान माणूस कबिरासारख्या छोट्या व्यक्तीसाठी निःस्वार्थीपणे कसे राबतो हे सांगून आपण देखील जगावे कसे हे गदिमा नकळत शिकवून जातात असे मला वाटते.
-सुधांशु नाईक (9833299791)
Monday, 11 December 2023
कुठे शोधीसी रामेश्वर...
Saturday, 9 December 2023
या बकुळीच्या झाडाखाली...
Friday, 8 December 2023
किलबिल किलबिल पक्षी बोलती...
#सुधा_म्हणे: किलबिल किलबिल पक्षी बोलती...
08 डिसेंबर 23
मराठी बालगीतांचे विश्व फारच
मनोहर आहे. अनेक लहान थोर साहित्यिकानी मोठ्या जिव्हाळ्याने बालगीते लिहिली. “उठा
उठा चिऊताई..” सारखे बालगीत कुसुमाग्रजांनी लिहिले आहे तर “घरात हसरे तारे असता मी
पाहू कशाला नभाकडे..” असे सुंदर गीत द. वि. केसकर लिहून जातात. “टप टप थेंब
वाजती.. गाणी गातो वारा.. असो किंवा सांग सांग भोलानाथ,पाऊस पडेल काय.. ” यासारखी कितीतरी बालगीते पाडगावकर लिहून
जातात. तर “एक कोल्हा बहू भुकेला..” असे छान बालगीत गदिमा लिहून जातात. विंदांनी
तर मुलांसाठी चांगली बालगीते कमी लिहिली जातात म्हणून “राणीचा बाग, सशाचे कान, परी
ग परी..” असे संग्रह काढून त्यात सुंदर सुंदर बालगीते लिहिली. त्यात शांता शेळके
यांचे नाव विसरून कसे चालेल ? श्रीनिवास
खळे यांच्यासारख्या दिग्गज संगीतकाराने जी अनेक सुरेख बालगीते आपल्या संगीताने
सजवली. त्यातलेच हेही एक गोड गाणे.
किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती,
पानोपानी फुले
बहरती, फूलपाखरे वर भिरभिरती,
स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई !
असे चित्रमय बालगीत जेंव्हा त्यांच्या हातून उतरते त्यावेळी अवघे दृश्य डोळ्यासमोर दिसू लागते. आपल्या आसपासचा प्रदेश सुंदर हिरवाईने नटलेला असो वा रुक्ष वाळवंटी, हे गीत ऐकले की डोळ्यासमोर किती सुंदर जग येते. लहान मुलांना सतत आपण हे करू नको, तिकडे जाऊ नको असे सांगत असतो किंवा काकांचे ऐकायचे, बाबांचे किंवा दादाचे ऐकायचे असे सांगतो. मात्र जे गांव शांताबाई मुलांना दाखवतात तिथे सगळीकडे फक्त मुलेच मुले. छान आनंदाने नाचणारी, गाणारी.
त्या गावाची गंमत
न्यारी, तिथे नांदती मुलेच
सारी
कुणी न मोठे कुणी
धाकटे, कुणी न बसते तिथे
एकटे
सारे हसती, गाति नाचती, कोणी रडके नाही
असे
गांव मुलांना आवडतेच आणि त्यात पुन्हा तिथे पुस्तकं-वह्या, शाळा, अभ्यास काही
नाही. भरपूर खेळायचे आणि मनमुराद हुंदडायचे. तिथे पऱ्यांचे राज्य आणि ऐकायला
आनंदगाणी. जे जे मुलांना हवे ते ते देणारे हे गाव. कोणत्या मुलांना असा गाव नकोसा
वाटेल ?
नाही पुस्तक, नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा
तिथल्या वेली
गाणी गाती, पऱ्या हसऱ्या
येती जाती
झाडावरती चेंडु
लटकती, शेतामधुनी बॅटी
म्हणाल ते ते
सारे होते, उणे न कोठे काही..
सतत मुलांना उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा असे सुंदर स्वप्न रंजन मुलांना मिळायला हवे. ही गाणी टीव्हीवर, यू ट्यूबवर पाहण्यापेक्षा लहान मुलांनी ऐकायला हवीत. स्वर्गीय सुंदर गांव त्यांच्या नजरेसमोर साकार व्हायला हवं. जेंव्हा मुलांना असे गाव डोळ्यासमोर दिसते, तेंव्हा त्यांच्या चहऱ्यावरील निर्मळ निरागस हसू फुलते. त्यांचा तो आनंदी चेहरा पाहत राहणे किती मोहक असते ना?
-सुधांशु नाईक (9833299791)