21 डिसेंबर 23
देवा तुझे किती सुंदर आकाश.. असे गीत लहानपणी आपण म्हणत होतो. ईश्वराने हे सर्व विश्व सुंदर घडवले आहे हे खरेच. पण आपण त्याकडे कसे पाहतो हेही महत्वाचे असते. महाभारताचा संदर्भ घेऊन एक कथा सांगितली जाते. एकदा युधिष्ठिर आणि दुर्योधन दोघेही कृष्णाकडे येतात. हे जग कसे आहे त्याबद्दल त्याला विचारतात. कृष्ण म्हणतो तुम्हीच सांगा पाहू आधी, तुम्हाला हे जग कसे वाटते?
दुर्योधन म्हणाला, “सगळे लोक खूप वाकड्या स्वभावाचे आहेत. संशयी आहेत. सतत दुसऱ्याला त्रास देण्याचा विचार करतात. त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवायला नको. त्यांना कडक नियम आणि कडक शिक्षा देऊन कायम टाचेखाली ठेवायला हवे.” मग कृष्णाने युधिष्ठिरला विचारले, बाबा रे, तुला काय वाटते?
युधिष्ठिर म्हणाला, “लोक तर खूप चांगले आहेत. किती कष्ट करतात. शेतात राबतात, युद्धात शौर्य गाजवतात, एकमेकांशी प्रेमाने वागतात. एखाद्याच्या अडचणीत मदतीला धावून जातात.त्यांना अजून मोकळेपण द्यायला हवे म्हणजे त्यांच्या गुणांना अधिक वाव मिळेल.”
कृष्ण म्हणाला, पाहिलेत तुम्ही.. आपण जसे असतो तसे आपल्याला जग दिसते..! तुम्ही सुंदर, निर्मळ, प्रसन्न आणि दुसऱ्यावर विश्वास ठेवून जगत असाल तर तुम्हाला हे जग छान दिसतेच.
अशावेळी मग ओठावर ही सुंदर कविता येते,
मीही सुंदर, तूही सुंदर,
आज भासते सारे सुंदर
जग हे सुंदर, नभ हे सुंदर
जे जे दिसते, ते ते सुंदर ..
प्र. के. अत्रे आपल्याला घणाघाती भाषणे, अग्रलेख यांच्यासाठी माहिती असतातच. त्यांनी लिहिलेल्या लोकप्रिय नाटकासाठी माहिती असतात. मात्र ही सुंदर सोपी कविता त्यांची आहे हे आपल्याला माहिती नसते. त्यांनी ही कविता लिहिली ज्याला दत्ता डावजेकर यांनी संगीत दिलेले आणि गायले होते पं. उदयराज गोडबोले यांनी.
निळेभोर हे आभाळ मोकळे,
रविकिरणांचे मळे उमलले
स्वर्गाचे बघ दार उघडले,
अमृतरसांचे सांडती पाझर..
सुंदरतेचा पहा उसळला
जिकडे तिकडे अथांग सागर..
आधी माणसांनी स्वतःवर प्रेम करायला हवे. आणि मग अवघ्या चराचरावर. आपोआप अवघी सृष्टी सुंदर दिसू लागते. रोज सूर्योदय, सूर्यास्त, चंद्र, तारे, नदी, वारे, समुद्र, झाडे, पाने,फुले असे सारे काही दिसत असते. आपण त्याकडे प्रेमाने पाहतो का? रोज नव्याने अवघी सृष्टी ताजीतवानी होत असते. आपण स्वतः तसे रोज नव्याने जागे होतो का?
स्वच्छ निर्मळ नजरेने आपण विश्वाकडे पहात राहिलो तर सर्वत्र सुंदरतेचा अथांग सागर पसरलेला दिसेलच. आपल्या मनातील शंका, संशय, दुसऱ्याविषयीचा अविश्वास हे सारे कायमचे नष्ट झाले तर या विश्वात फक्त आनंद भरून राहील असे मला वाटते.
-सुधांशु नाईक(9833299791)🌿
No comments:
Post a Comment