marathi blog vishwa

Thursday 28 December 2023

मी मज हरपून बसले गं...

#सुधा_म्हणे: मी मज हरपून बसले गं...
28 डिसेंबर 23
सुरेश भट यांच्या हातून ज्या काही लोभस रचना निर्माण झाल्या त्यातील ही मला आवडणारी एक अग्रगण्य रचना. हृदयनाथ मंगेशकर यांनी त्याला यमन कल्याण रागाचे रुपडं आणि आशाबाईंच्या स्वरांचे लखलखते कोंदण दिले.
मी मज हरपून बसले गं...
आज पहाटे श्रीरंगाने
मजला पुरते लुटले गं,
साखरझोपेत मध्येच अलगद
प्राजक्तासम टिपले गं...
भल्या पहाटे घडून गेलेल्या मोहक शृंगाराचे धाडसी वर्णन करणारे हे गीत. त्याला संगीत देताना हृदयनाथ यांना संध्याकाळचा यमनकल्याण हाच राग का निवडावासा वाटला असेल बरं? आपल्याला याचं उत्तर माहिती नसतं. मुळात सर्जनाचा तो क्षण असाच असतो. तिथं कसलेच कारण आपल्याला देता येत नाही.
सर्जनाचा हा सुंदर क्षण एखाद्या कवितेच्या निर्मितीचा असतो, एखाद्या शिल्पकाराच्या नजरेसमोर साकार झालेल्या मूर्तीचा असतो किंवा एखाद्या नात्याची सुरुवात होणारा देखील हाच क्षण असतो.का, कधी, कसं असे कोणतेच प्रश्न तिथवर पोचू न शकणारा असा हा स्वयंभू देखणा क्षण.

या गीतातील त्या दोन जीवांच्या मिलनाचा क्षणही असाच. प्रकृती आणि पुरुषाच्या मिलनातून तर सृष्टी निर्माण झाली. हा क्षण वाईट कसा असेल. मात्र अनेक मुखवटे पांघरून जगणाऱ्या समाजाने नात्यातील हळवेपण कप्पेबंद करून टाकले. एकेकाळी जिथं मंदिरावर देखील मीलनशिल्पे कोरली गेली होती तिथं या विषयाचा एकदम टॅबू केला जाऊ लागला. अनेक बंधने घातली गेली. ही बंधने इतकी कडक की साधा शब्दोच्चार देखील करणे अवघड होऊन बसलेले.
सुरेश भट या सगळ्यांना जणू भिरकावून देत गाणं लिहून जातात. मात्र त्यांचे भान जराही सुटत नाही. या शृंगाराचे धाडसी वर्णन करतानाही त्यांची लेखणी मृदू मुलायम होऊन जाते.
 त्या श्वासांनी दीपकळीगत
पळभर मी थरथरले गं
त्या स्पर्शाच्या हिंदोळ्यावर
लाजत उमलत झुलले गं...
ही ओळ त्यांच्यासारख्या पुरुषाने लिहून देखील एखाद्या युवतीच्या मनातील ते अलवार तरंग हळुवार टिपत जाते असं मला वाटते. प्रतिकात्मक म्हणून तिथं कदाचित कृष्ण राधा असावेत पण गीतातून जन्मलेली ही कहाणी तुमची, माझी सर्वांची असते. त्यासोबत आपल्या जिवलगाची याद वेलीसारखी बिलगून येते म्हणून तर वर्षानुवर्षे हे गाणं आपल्याला तितकंच ताजे तरुण भासत रहाते. पुन्हापुन्हा ऐकावेसे वाटते. बरोबर ना?
- सुधांशु नाईक (9833299791)🌿

No comments:

Post a Comment