marathi blog vishwa

Saturday, 16 December 2023

या लाडक्या मुलांनो...

#सुधा_म्हणे: या लाडक्या मुलांनो..

16 डिसेंबर 23

शाळेतील दिवस हे शक्यतो सर्वांसाठी न विसरता येणारेच असतात. मित्र, खेळ, वह्या पुस्तके, पीटीचा तास, प्रयोगशाळा, ते फॉर्मलीनचे वगैरे वास या सगळ्यासोबत न विसरणारी आठवण असते ती शाळेतील प्रार्थनेची. प्रत्येक शाळेची प्रार्थना ठरलेली असते. आपली शाळा संपून किती वर्षे झाली तरी शाळेतील ती प्रार्थना आठवतेच. शाळेची घंटा, त्यानंतर लाऊडस्पीकरवरुन दिलेल्या सूचना झाल्या की शाळेतील सुरेल मुलांच्या आवाजात प्रार्थना सुरू होई. 

कित्येक शाळातून आता रेकॉर्डिंग ऐकवले जात असले तरी आपल्याच ओळखीच्या मुलांनी म्हटलेली प्रार्थना, ती विशिष्ट लय हे सगळे मनात अगदी फिट्ट बसून जात असे. प्रार्थनेपूर्वी शाळेत पोचायला हवे नाहीतर हातावर छडी बसेल ही भीती जसे असायची तसेच आज पुन्हा दोस्त नव्याने भेटतील, आज अमुक तासाला काहीतरी नवीन शिकवतील याचीही ओढ असायची. तो परीपाठाचा तास, एखादी प्रार्थना, मार्गदर्शन करणारे एखादे भाषण किंवा गाणे  हे कायम लक्षात राहत असे. 

मधुकर जोशी यांनी लिहिलेले हे गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात जेंव्हा आपण ऐकतो तेंव्हा कुणीतरी मायेने आपल्याला शिकवत आहे असेच वाटून जाते. लहानशी मुले देखील चटकन आकर्षित होतील अशी साधी सुरेख चाल त्याला दिली होती दशरथ पुजारी यांनी.

या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार

नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार..

आईस देव माना, वंदा गुरूजनांना

जगी भावनेहूनी त्या कर्तव्य थोर जाणा

गंगेपरी पवित्र ठेवा मनी विचार..

शिवबापरी जगात दिलदार शूर व्हावे

टिळकांपरी सदैव ध्येयास त्या पूजावे

जे चांगले जगी या त्याचा करा स्वीकार..

एखाद्या दूरच्या वस्तीमधून मुले दोन तीन किलोमीटरचे अंतर चालत एखाद्या गावी शाळेत येतात. कित्येकदा त्यांना उपाशीदेखील यावे लागत असेल. अशा मुलांना आपण का शिकायला हवे, शिक्षण घेतल्याने आयुष्यात काय फरक पडणार आहे आपले आदर्श कोण असायला हवेत हे सगळे अशा एखाद्या गीतातून जेंव्हा सहजपणे 2 मिनिटात त्यांना समजते तेंव्हा आपल्या भविष्यात आपण सुरेख काही करूया असा आत्मविश्वास त्यांच्यात वाढणारच. 

एखादे मूल मोठे झाल्यावर पुढे जाऊन जेंव्हा सांगते की, “अमुक एक गाणे ऐकले किंवा एखादे पुस्तक वाचले किंवा  अमुक एक भाषण ऐकले आणि त्यामुळे मी बदलून गेलो..” तेंव्हा त्या रचनाकर्त्या लोकांना किती समाधान होत असेल ना?

-सुधांशु नाईक (9833299791)

No comments:

Post a Comment