marathi blog vishwa

Friday, 8 December 2023

किलबिल किलबिल पक्षी बोलती...

#सुधा_म्हणे: किलबिल किलबिल पक्षी बोलती...

08 डिसेंबर 23

मराठी बालगीतांचे विश्व फारच मनोहर आहे. अनेक लहान थोर साहित्यिकानी मोठ्या जिव्हाळ्याने बालगीते लिहिली. “उठा उठा चिऊताई..” सारखे बालगीत कुसुमाग्रजांनी लिहिले आहे तर “घरात हसरे तारे असता मी पाहू कशाला नभाकडे..” असे सुंदर गीत द. वि. केसकर लिहून जातात. “टप टप थेंब वाजती.. गाणी गातो वारा.. असो किंवा सांग सांग भोलानाथ,पाऊस पडेल काय..  ” यासारखी कितीतरी बालगीते पाडगावकर लिहून जातात. तर “एक कोल्हा बहू भुकेला..” असे छान बालगीत गदिमा लिहून जातात. विंदांनी तर मुलांसाठी चांगली बालगीते कमी लिहिली जातात म्हणून “राणीचा बाग, सशाचे कान, परी ग परी..” असे संग्रह काढून त्यात सुंदर सुंदर बालगीते लिहिली. त्यात शांता शेळके यांचे नाव विसरून कसे चालेल ? श्रीनिवास खळे यांच्यासारख्या दिग्गज संगीतकाराने जी अनेक सुरेख बालगीते आपल्या संगीताने सजवली. त्यातलेच हेही एक गोड गाणे.

किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती,

पानोपानी फुले बहरती, फूलपाखरे वर भिरभिरती,

स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई !


असे चित्रमय बालगीत जेंव्हा त्यांच्या हातून उतरते त्यावेळी अवघे दृश्य डोळ्यासमोर दिसू लागते. आपल्या आसपासचा प्रदेश सुंदर हिरवाईने नटलेला असो वा रुक्ष वाळवंटी, हे गीत ऐकले की डोळ्यासमोर किती सुंदर जग येते. लहान मुलांना सतत आपण हे करू नको, तिकडे जाऊ नको असे सांगत असतो किंवा काकांचे ऐकायचे, बाबांचे किंवा दादाचे ऐकायचे असे सांगतो. मात्र जे गांव शांताबाई मुलांना दाखवतात तिथे सगळीकडे फक्त मुलेच मुले. छान आनंदाने नाचणारी, गाणारी.

त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारी

कुणी न मोठे कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे

सारे हसती, गाति नाचती, कोणी रडके नाही

असे गांव मुलांना आवडतेच आणि त्यात पुन्हा तिथे पुस्तकं-वह्या, शाळा, अभ्यास काही नाही. भरपूर खेळायचे आणि मनमुराद हुंदडायचे. तिथे पऱ्यांचे राज्य आणि ऐकायला आनंदगाणी. जे जे मुलांना हवे ते ते देणारे हे गाव. कोणत्या मुलांना असा गाव नकोसा वाटेल ?

नाही पुस्तक, नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा

तिथल्या वेली गाणी गाती, पऱ्या हसऱ्या येती जाती

झाडावरती चेंडु लटकती, शेतामधुनी बॅटी

म्हणाल ते ते सारे होते, उणे न कोठे काही..

सतत मुलांना उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा असे सुंदर स्वप्न रंजन मुलांना मिळायला हवे. ही गाणी टीव्हीवर, यू ट्यूबवर पाहण्यापेक्षा लहान मुलांनी ऐकायला हवीत. स्वर्गीय सुंदर गांव त्यांच्या नजरेसमोर साकार व्हायला हवं. जेंव्हा मुलांना असे गाव डोळ्यासमोर दिसते, तेंव्हा त्यांच्या चहऱ्यावरील निर्मळ निरागस हसू फुलते. त्यांचा तो आनंदी चेहरा पाहत राहणे किती मोहक असते ना?

-सुधांशु नाईक (9833299791)


1 comment:

  1. ग.दि.माडगूळकरांची बालगीते हे एक मराठी वाङ्मयातील एक लोभसवाणी स्वप्ननगरी होती.

    ReplyDelete