marathi blog vishwa

Tuesday, 19 December 2023

उषाताई आणि ससा तो ससा...

#सुधा_म्हणे: उषाताई आणि ससा तो ससा..
19 डिसेंबर 23
उषा मंगेशकर. नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा झालाय. लता आणि आशा या दोन दिग्गज बहीणींच्या नंतर असलेले तितकेच गुणी व्यक्तिमत्व. उषा मंगेशकर उत्तम चित्रकला जाणतात, फोटोग्राफी जाणतात आणि गाणे तर ईश्वरानेच या सर्वांच्या गळी उतरवले आहे.
आपल्या घरात असलेल्या दोन दिग्गज बहीणींच्या विषयी त्यांना कधीच असूया नव्हती आणि त्यांचे जगणे त्या अतीव आनंदात जगत राहिल्या. त्यांच्या वाट्याला आलेल्या गाण्यांचा कॅनव्हास किती मोठा आहे. किती व्हर्साटाइल आहेत त्याही. जाऊ देवाचीया गावा, रचिल्या ऋषिमुनिनी आदि भक्तिगीते / अभंग गाणे असो किंवा छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, मला लागली कुणाची उचकी.. सारख्या धुंद मादक लावण्या असोत उषाताईनी प्रत्येक गीत मोठ्या झोक्यात सादर केले. किती सुंदर शोभून दिसतो त्यांचा गळा विविध गाण्यांना. असे वाटते की दुसऱ्या कुणाला हे गाणे इतके छान जमलेच नसते.
“जे तुझ्याचसाठी होते केवळ फुलले, वाटेत तुझ्या मी फूल ठेवूनी आले..” असे गाणे जेंव्हा त्या गातात तेंव्हा त्या हळव्या कातर भावनेला समजून घेताना मन भरून येते. केळीचे सुकले बाग सारखे गाणे असो किंवा जय जय संतोषी मा असो किंवा मुंगळा मुंगळा.. सारखे तडकभडक गाणे असो, उषाताईनी आपली जी स्वरमुद्रा त्यावर उमटवली आहे ती फार सुरेल आहे. अविस्मरणीय आहे.

त्यांनी गायलेली बालगीते हे पुन्हा एक वेगळे दालन. आपल्यासारख्या असंख्य मुलांना, किमान 5-10 पिढ्यांना त्यांच्या या बाळगीतांनी आजवर अपार आनंद दिलाय. आई आणि बाबा यातून, कोण आवडे अधिक तुला.. एक कोल्हा बहु भुकेला, गोड गोजिरी लाजलाजरी होणार ताई तू नवरी.. अशी लहान मुलांची गाणी गाताना उषाताईंचा आवाज इतका गोड, मधाळ होतो की कोणतेही लहान मूल त्याच्याकडे पटकन आकर्षित होऊन जाते.
ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट ही किती दशके प्रत्येक पिढी ऐकते आहे आणि त्या गोष्टीचा आनंद घेते आहे. त्याच गोष्टीचे एक सुंदर बालगीत बनवले शांताराम नांदगावकर यांनी आणि लहान मुलांच्या ओठावर पटकन रुळेल अशी भन्नाट चाल दिली अरुण पौडवाल यांनी. हे गाणे इतके गाजले कारण त्याला उषाताईंचा लोभस हवाहवासा आवाज लाभला होता...
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली..
वेगेवेगे धाऊ आणि डोंगरावर जाऊ
चल शर्यत रे आपुली..
हे गाणे आजही अनेकांना तोंडपाठ असेल. मॅनेजमेंट स्टडीज करताना या कथेची किती नवीन रुपे ऐकली पण मूळ गाणे आजही तसेच आहे. अजरामर आहे. आपल्यानंतर देखील ते अनेक चिल्ल्या-पिल्ल्याना मोहवत रहाणार आहे. आपण फक्त ते पुढील पिढ्यांना आपल्याकडून ऐकवत राहूया.
-सुधांशु नाईक (9833299791)🌿

No comments:

Post a Comment