29 डिसेंबर 23
आज 100व्या मराठी नाट्यसंमेलनाची सांगलीत सुरुवात होत आहे. एकेकाळी विष्णुदास भावे यांनी इथंच पहिले नाटक सादर केले होते. त्यानिमित्ताने मराठी संगीत नाटक आणि नांदीविषयी आजचं मनोगत....
अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेल्या “पंचतुंड नररुंड...” या नांदीने मराठी संगीत नाटक परंपरेची एक वैभवशाली सुरुवात झाली. हे विश्वच वेगळे होते. आम्ही वयात येईपर्यंत मराठी संगीत नाटकें बहुतांशी बंद होत गेली. शिलेदार कंपनीची काही नाटकें आणि प्रसाद सावकार यांची नाटकें वगळता आमच्या पिढीने मुख्यत: संगीत नाटक हे ध्वनीफिती आणि विविध पुस्तकातून मिळणाऱ्या दर्शनातून अनुभवलं.
किर्लोस्कर, खाडिलकर, देवगंधर्व भास्करबुवा बखले, पं. रामकृष्णबुवा वझे, गोविंदराव टेंबे, देवल, गडकरी, बालगंधर्व, मा. दीनानाथ, केशवराव भोसले, ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मा यांच्यासारख्या अनेकांनी नाट्यसंगीताला सोनेरी दिवस दाखवले.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची परंपरा फार फार जुनीच. मात्र नाट्यसंगीतात झालेल्या राग संगीताच्या वापराने सर्वसामान्य जनतेसाठी राग संगीत सुलभ झालं. नाथ हा माझा... म्हणजे यमन राग, सुजन कसा मन चोरी... म्हणजे भूप राग, नमन नटवरा म्हणजे हमीर आणि प्रभू अजि गमला म्हणजे भैरवी... हे असे आडाखे बांधले जाऊ लागले. त्यातूनच मग रागसंगीताशी जवळीक वाढली. भव्य अशा त्या महासागराची भीती कमी झाली. विविध राग, त्यातील बारकावे समजून घेण्याकडे, शिकण्याकडे कल वाढला. महाराष्ट्रातील कित्येक पिढ्याना नाट्यसंगीताने भुलावलं.
फक्त संगीत इतकंच नव्हतं तर नाटक पाहायला जाणे हा एक हृदयंगम सोहळा बनला. नाटक असलं की त्याची तयारी सकाळपासून होऊ लागली. स्त्री पुरुषांनी एकत्रित जाऊन नाटक पाहणे ही त्याकाळी जणू एक सामाजिक क्रांतीच ठरली.! बालगंधर्वांच्या काळात तर ते जशी साडी नेसत त्याप्रकारच्या साड्यांची फॅशन आली. नाटकाच्या पडद्यावरील कलाकुसरीला मुख्य पडदा उघडताच कडकडून टाळ्यांची दाद मिळू लागली.
गंधर्व नाटक मंडळी, ललितकलादर्श,बळवन्त आदि नाटक कम्पनी महाराष्ट्र नव्हे तर आसपासच्या इतर राज्यात देखील नाटकें घेऊन जात. तिथेही मराठी संगीत नाटक आणि नाटकातील पदे यांना उदंड लोकप्रियता मिळाली. एकेका पदाला सहा सात वन्समोअर मिळणे ही बाब फार गौरवाची वाटे. त्याकाळी गायकांना शिकवायला, दिवसभरात भरपूर रियाज करवून घ्यायला गानगुरू असायचे. नांदी, दिंड्या, साकी आदि गानप्रकार सहजतेने नाटकात सामील होऊन गेले. मराठी संगीत नाटकातील फक्त "नांदीचे सादरीकरण" असंही एखादा प्रयोग जाणकार गायक वादक करू शकतील इतकी याची लोकप्रियता अजूनही आहे.
आजही कानावर पंचतुंड सारखी नांदी ऐकू आली की उदा- धूपाचा वास जाणवू लागतो. तिसरी घंटा कानी वाजू लागते आणि मखमली पडदा उघडून कोणत्याही क्षणी समोर देखणं भव्य नाटक दिसू लागेल असं वाटत राहतं. नव्या वर्षात या मराठी संगीत रंगभूमीला पुन्हा नव्याने झळाळी मिळायला हवी असं वाटतं. तुम्हालाही असंच वाटतं का?
- सुधांशु नाईक(9833299791)🌿
पुढील लिंकवर प्रथमेश आणि मुग्धाच्या आवाजात अवश्य ऐका ही नांदी.
https://youtu.be/pImx6xq6vok?si=YMgr1mGXU9iTZPyQ
No comments:
Post a Comment