marathi blog vishwa

Saturday, 2 December 2023

अरुपास पाहे रूपी तोच भाग्यवंत...

#सुधा_म्हणे: अरुपास पाहे रूपी तोच भाग्यवंत..
02 डिसेंबर 23
काही गायक, काही गीतकार, काही संगीतकार एखाद्या क्षणी इतके प्रसिद्ध होतात की त्याक्षणी त्यांच्यासारखे दुसरे कुणीच नाही असे वाटत राहते. चंद्रशेखर गाडगीळ हे असेच एक नाव. ऑर्केस्ट्रामध्ये गाणारे गाडगीळ पाहता पहाता एकदम लोकप्रिय झाले. राम कदम यांनी त्यांना एका चित्रपटासाठी संधी दिली आणि त्यांचे गाणे अधिकाधिक लोकप्रिय होत गेले. पंचमदा यांच्यासाठीदेखील त्यांनी गाणी गायली.
“निसर्गराजा ऐक सांगतो..” हे गाणे जसे अफाट लोकप्रिय झाले तसेच “अरुपास पाहे रूपी..” हे गाणे देखील. मुळात देखणे शब्द ही ज्यांची खासियत अशा सुधीर मोघे यांचे शब्द घेऊन सजलेले हे गाणे. जगात भरून राहिलेला अनादि अनंत परमेश्वर बघू शकणारी ही प्रतिभा.

अरूपास पाहे रूपी तोच भाग्यवंत
निसर्गात भरूनी राहे अनादी अनंत..
कधी पावसाच्या धारा, भणाणता केव्हा वारा
पहाटेस होऊन तारा, हसे रूपवंत..

अग्नी, वारा, पाणी, धरती आणि आकाश आदि पंचमहाभूतांनी बनलेली ही सृष्टी. हेच तर ईश्वरस्वरूप असे सगळे. त्यांचे कोवळेपण आणि त्यांचे विक्राळरूप दोन्ही आपल्याला भुलावणारीच. सृष्टीचा निर्माताही तोच आणि विनाशकही तोच. हे सारे आपल्याला उमगत मात्र नाही. मनात शेकडो प्रश्न घेऊन फिरत राहतो आपण. मात्र जेंव्हा त्याचे अस्तित्व जाणवते, आकळते तेंव्हा मनातले संभ्रम संपून जातात. इथले तारे, वारे आणि इथले ऋतू हे सारे त्याचीच रुपे हे समजल्यावर एक प्रगाढ शांतता मनभर भरून राहते.
आणि मग त्याच्या कुशीत जायला, मुक्तीच्या मागे वळून न पाहणाऱ्या मार्गावर जायला मन सिद्ध होऊन जाते.

कुशीमध्ये त्याच्या जावे
मिठीमध्ये त्याला घ्यावे
शाश्वतात विरूनी जावे, सर्व नाशवंत
“ शाश्वतात विरुनी जावे सर्व नाशिवंत..” इतके समर्थ शब्द सुधीर मोघे कसे काय लिहू शकतात या विचाराने मन स्तीमित होऊन जाते. शब्दांची ती आभा आपल्याला निःशब्द करते. बाळ बर्वे यांनी या गीताला काहीशी वेगळी, निर्गुणी ढंगाची चाल दिली आहे. या गीताला राम फाटक यांनीदेखील वेगळी चाल लावलेली. श्रीकांत पारगावकर यांनी ते आकाशवाणीसाठी गायले होते. मात्र बाळ बर्वे यांनी या गीताचे स्वरूप अधिक भव्य आणि देखणे केले असे मला वाटते. त्यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत ऐकताना निसर्गाचा एक विस्तीर्ण पट माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला असे स्वतः सुधीर मोघे यांनीदेखील सांगितले होते. एखाद्या कवीला आपले गाणे अधिक भव्यपणे दिसू लागावे ही किमया फक्त निर्मळ असे सच्चे सूरच करू शकतात ना?
-सुधांशु नाईक(9833299791)🌿

No comments:

Post a Comment