marathi blog vishwa

Tuesday 26 December 2023

हृदयी माझ्या नित्य विराजे....

#सुधा_म्हणे: दत्त दिगंबर दैवत माझे..हृदयी माझ्या नित्य विराजे...
26 डिसेंबर 23
“जय करुणाघन, निजजनजीवन अनसूया नंदन..” अशी करुणात्रिपदी म्हणत बाबा घरात शतपावली घालत असायचे. घरातील पिवळ्या बल्बचा मंद प्रकाश आणि त्या स्वरातील जाणवत राहणारी आर्तता ही अगदी बालपणातील एक सुरेख अशी आठवण आहे. अगदी 3-5 वर्षांचा असेन मी पण आजही ते सूर जसेच्या तसे आठवत राहतात. लहानपणापासून भगवान दत्ताचे चित्र पाहिल्यावर ती गाय, ते कुत्रे यांच्यासोबत सहज उभी असलेली ती प्रसन्न स्मितहास्य करत असलेली मूर्ती पहात राहणे फार आवडायचे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एस टी स्टॅन्ड किंवा डेपोच्या आवारात दत्त मंदिर असायचे. डेपोतील मंदिरात संगमरवरातील प्रसन्न दत्त मूर्ती आपल्याला आनंद द्यायची. तिथे दत्त गीते सुरु असायची. आणि स्टॅण्डवर असायचे नवनाथ रसवंती गृह. घुंगरू वाजत तो उसाचा चरका सुरु असायचा आणि समोर दत्तगुरूंचे आशीर्वाद घेणारी नाथाची तसबीर असायची. लहानपण सम्पून गेले तरी ते मंदिर, ते नवनाथ रसवंती गृह आणि कवी सुधांशु यांची दत्त गीते हे मनात रुजलेलं समीकरण आहे.
आज दत्तजयंती. दत्त म्हटले की कवी सुधांशु यांची दत्तभक्तीगीते आठवणे आपल्यासाठी साहजिकच आहे ना? गेली सुमारे 30,35 वर्षे आकाशवाणीच्या माध्यमातून ही दत्तगीते आपल्याला शान्त शान्त अनुभूती देताहेत. किती सोपे शब्द आणि त्यातून घडणारे लोभस असे दत्त दर्शन.
दत्त दिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे
असं जेंव्हा पराडकर यांच्या आवाजात कानावर पडते तेंव्हा आपल्या मनातील अन्य विचार किती चटकन बाजूला होतात ना. गीतातून दिसणारे रूप नजरेसमोर जणू सगुण साकार होऊन जाते.
अनुसूयेचे सत्त्व आगळे,
तिन्ही देवही झाली बाळे
त्रईमूर्ती अवतार मनोहर,
दीनोद्धारक त्रिभुवनी गाजे
दत्त दिगंबर दैवत माझे
पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती,
आनंदाचे आसू झरती
सारे सात्विक भाव उमलती,
हळूहळू सरते मीपण माझे
दत्त दिगंबर दैवत माझे
डोळ्यासमोर साकार झालेली ती प्रेममय गुरु मूर्ती पाहून अगदी असेच वाटू लागते. मनातील तामसी भाव, त्रागा, शोक, अहंकार आदि सगळे सहज मावळून जाते. माझे मीपण संपून जाते. स्वामी स्वरूपानंद म्हणतात तसं, “ मी तू पण जगन्नाथा.. होवो एकची तत्वता.. “ ही जाणीव आत्म्यापर्यंत स्निग्धपणे पसरत जाते. प्रगाढ शान्ततेने मन भरून जाते.
सुधांशु नाईक (9833299791)🌿

No comments:

Post a Comment