#सुधा_म्हणे: कबिराचे विणतो शेले..
08 डिसेंबर 23
मराठी भावगीते आणि भक्तिगीते यांच्या क्षेत्रात माणिक वर्मा यांचे स्थान फार वरचे. त्यांचा तो जरा ढाला तरीही मनात सहज उतरणारा सूर कानी पडला की आपली मनस्थिती पटकन बदलून जाते. अमृताहुनी गोड हे गाणे असू दे किंवा क्षणभर उघड नयन देवा हे गाणे असू दे, माणिकबाईंचा आवाज कानी पडला की एक प्रेमळ मायाळू व्यक्ती सोबत असल्यासारखे वाटू लागते. त्या जेंव्हा “घननिळा लडिवाळा...” गातात तेंव्हा तेही गाणे आपल्या हृदयापर्यन्त सहज पोचते. पु.ल. देशपांडे यांना तर त्यांचा आवाज कायमच आवडत असे आणि त्यांनी संगीतकार म्हणून काम करताना त्यांना महत्वाची गाणी दिली होती.
देव पावला या चित्रपटासाठी गदिमानी एक सहजसुंदर भक्तीगीत लिहिले आणि संगीतकार पुलंनी त्याला यमन रागाचे सुरेख रुपडे दिले. गदिमा लिहिताना इथे धनुर्धारी राम, बंधविमोचन राम आदि सुप्रसिद्ध उपमा न वापरता कौसल्येचा राम असे म्हणत त्याला लोभसवाणे मूल बनवून टाकतात. हा राम शूर वीर पराक्रमी नाही तर अगदी मायाळू आणि कनवाळू असा आहे. आणि अगदी हीच भावना माणिकबाईंच्या सुरातून पाझरत राहते. आपल्याला शांतवत राहते.
कबिराचे विणतो शेले, कौसल्येचा राम
भाबड्या या भक्तासाठी, देव करी काम !
कबीर. 16/17 व्या शतकात असलेले एक महान व्यक्तिमत्व. उत्तम कवी असलेले कबीर तितकेच फक्कड होते. रोखठोक व्यक्त होणारे कवी होते. समाजाने सुधारावे यासाठी तळमळणारे होते. अशा कबिरासाठी राबणारा राम या पुराणकथेवर अवलंबून असलेले हे गाणे. ईश्वर आपल्या भक्ताची खूप काळजी घेतो या भाबड्या भक्तीसाठी पूरक असलेले हे शब्द.
एक एकतारी हाती, भक्त गाई गीत
एक एक धागा जोडी, जानकिचा नाथ
राजा घनःश्याम !
दास रामनामी रंगे, राम होइ दास
एक एक धागा गुंते, रूप ये पटास
राजा घनःश्याम !
राजा असलेला राम, जानकीपती राम कबिरासाठी हे करत बसतो. जगाच्या दृष्टीने कबीर हा केवळ एक विणकर. समाजात अगदी खालच्या थरात असलेल्या एखाद्या भक्तासाठी ईश्वराचे हे रूप आपल्या स्वरातून माणिकबाई अगदी सगुण साकार करून दाखवतात.
विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होइ काम
ठायि ठायि शेल्यावरती, दिसे रामनाम
गुप्त होई राम !
कबिराचे ते सगळे काम पूर्ण केल्यावर राम तिथे अजिबात थांबून राहत नाही. आपण केलेल्या कामाचा डंका पिटत बसत नाही ही गोष्ट गदिमा सूचकपणे लिहून जातात. आज काही लहान मोठी कामे केली तरी स्वतःची पाठ थोपटून घेत फिरतो आपण. इथे राजा रामासारखा एक महान माणूस कबिरासारख्या छोट्या व्यक्तीसाठी निःस्वार्थीपणे कसे राबतो हे सांगून आपण देखील जगावे कसे हे गदिमा नकळत शिकवून जातात असे मला वाटते.
-सुधांशु नाईक (9833299791)
No comments:
Post a Comment