25 डिसेंबर 23
शास्त्रीय संगीताचे विश्व म्हणजे जणू महासागर. दुरून एखाद्याला त्याचं अथांगपण उमगत नाही. त्यात हळूहळू शिरत गेलं की मग खूप काही जाणवत राहतं. सगळं व्याकरण कळायलाच हवं असं नव्हे. पण एखाद्या रागातील हा स्वर किती मधुर आहे, एखादा स्वर किती कारुण्य निर्माण करतोय, एखाद्या आलापामुळे किती शान्त भाव मनात निर्माण होतायत, एखादी बोलतान, एखादी ठुमरी आपल्या चित्तवृत्ती कशा उल्हासित करते आहे हे सगळं जेंव्हा आपोआप अनुभवता येते तेंव्हा रोजचा दिवसदेखील नवीन भासू लागतो. तो सूर्योदय, ते पक्षांचे किलबिलणे, फुलणारा तो प्राजक्त हे सगळं नव्याने आपल्याला मोहवू लागतं. मग एकेका रागाचे आकृतिबंध दिसू लागतात. मनाला मिळणारे चैतन्य कधी बिहाग बनून येते तर कधी भैरव.
या भैरव रागाचे तर किती प्रकार. पं. कुमार गंधर्व यांनी तर भैरव के प्रकार या नावाने प्रात:कालीन मैफिली सादर करून रसिकांना भैरव चे विविध प्रकारे दर्शन घडवले. तरीही त्याहून तो अजूनही काही वेगळा उरतोच. बैरागी भैरव हा असाच एक सुंदर अनुभव. सकाळच्या प्रसन्न वेळी हे सूर एका गूढ विश्वात घेऊन जातात जिथं असते केवळ भक्ती आणि समर्पण.
मधुकर जोशी यांनी एक सुंदर गीत लिहिले. ते वाचल्यावर संगीतकार दशरथ पुजारी यांच्या मनात बैरागी भैरव चे स्वर घुमू लागले. सुमन कल्याणपूर मग ते शब्द आणि हे सूर घेऊन येतात,
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे
निराधार आभाळाचा तोच भार साहे….
अत्यंत लडीवाळ असे ते स्वर जेंव्हा कानी पडतात तेंव्हा खूप आश्वस्त वाटू लागते. सदैव अनेक अडचणी सोसतांना स्वतःला आपण एकटे समजू लागतो पण कुणीच जगात एकटं नसतं. ज्या क्षणी आपल्याला ईश्वराची सोबत हवीशी वाटते तेंव्हा तो कोणत्या तरी रूपात शेजारी असतोच. हे सारं मधुकर जोशी विविध पौराणिक कथाचे संदर्भ देत छोट्याश्या ओळीतून लिहून जातात.
बाळ सोडुनी ते दिधले कुंतीने जळात
घरी रधिकेच्या परि ते वाढले सुखात
कर्णराज म्हणुनी त्याचे नाव अमर आहे..
भक्त बाळ प्रल्हादाला छळीले पित्याने
नारसिंह रूपे त्याला रक्षिले प्रभूने
अलौकिक त्याची महती अजुनी विश्व गाये...
साधुसंत कबिराला त्या छळिति लोक सारे
पांडुरंग रक्षी त्याला प्राशुनी निखारे
आसवेच त्यांची झाली दुःखरूप दोहे…
कर्ण असो, प्रल्हाद असो, संत कबीर असो की ज्ञानेश्वर अशा प्रत्येकासाठी ऐन संकटात असताना ईश्वर पाठीशी उभा राहतो.जीव वाचवतो. आपल्याला देखील तो अशीच सोबत करत असतो. एकदा ते उमगलं की जगण्याविषयी असलेली असुरक्षितता संपून जाते. अवघे जीवन सुंदर, सुखद भासू लागते. बैरागी भैरवच्या त्या मध्यम पंचमसारखे !
- सुधांशु नाईक (9833299791)🌿
No comments:
Post a Comment