12 डिसेंबर 23
विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर यांच्यासारखेच मराठी काव्यसृष्टीवर आपला सुरेख ठसा उमटवणारे कवी म्हणजे वसंत बापट. “गौरीशंकर उभ्या जगाचा मनात पूजीन रायगडा..” उत्तुंग आमुचि उत्तरसीमा इंच इंच लढवू, जय महाराष्ट्र प्रियतम देश महान.. अशी स्फूर्तिदायक गीते लिहिणारे वसंत बापट हे अत्यंत प्रतिभावंत असे कवी. त्यांची कविता एक अंगभूत अशी लय घेऊन येणारी. त्यामुळे संगीतकारांना देखील त्याला सुरांची अंगडी-टोपडी चढवणे सहज सोपे वाटत असावे.
अनेक नामवंत संगीतकरांनी त्यांच्या भावगीताना सुरेल संगीत देत अविस्मरणीय अशी गाणी बनवली. संगीतकार म्हणून भानुकान्त लुकतुके हे नाव खूप कमी जणांनी ऐकले असेल. त्यांनी वसंत बापट यांचे हे गीत निवडले त्याचे शब्दच पहा ना किती मुलायम आणि हळुवार आहेत.
जेंव्हा एखादी प्रौढा आपल्या माहेरी जाते, तिथल्या घराच्या दारातील बकुळीजवळ बसते, तिथली फुले ओंजळीत घेऊन तो गंध उरात भरून घेते तेंव्हा अवघा जीवनपट तिच्या नजरेसमोर दिसू लागतो. या भावगीताचे नुसते शब्द वाचताना देखील आपल्या मनात बकुळीचा गंध दरवळू लागतो;
*या बकुळीच्या झाडाखाली
आठवणींची लाख फुले
इथेच माझ्या स्वप्नासाठी
एक रेशमी झुला झुले...
इथेच माझी बाळ पाऊले
दवांत भिजली बाळपणी
दूर देशीच्या युवराजाने
इथेच मजला फूल दिले...
तिने आसवे पुसली माझी
हृदयामधला गंध दिला,
चांदण्यातले सोनकवडसे
माझ्यासाठी अंथरले...
बकुळी माझी सखी जीवाची,
जन्मान्तरीचे प्रेम जुने,
तिला पाहता खुलते मीही,
मला पाहता तीही खुले...
प्रत्येक माहेरवाशिणीचे आपल्या माहेरातील माणसे, तिथली झाडे, फुले यांच्याशी एक अबोध मुग्ध असे नाते असते. त्यातले नाजूकपण शब्दात उतरवणे किती अवघड. पण या कवितेत तिच्या नाजूक भावना भावना वसंत बापट अतिशय समर्थपणे व्यक्त करतात. बालपण ते पुढील आयुष्य सगळे 5-7 ओळीत इतक्या नजाकतीने रंगवतात की त्या शब्दांची मोहिनी कितीवेळ तरी मनात भरून राहते. आयुष्य असे गंधभारलेले असणे किती सुखाचे आहे ना?
-सुधांशु नाईक (9833299791)🌿
No comments:
Post a Comment