marathi blog vishwa

Thursday, 14 December 2023

भक्तीवाचून मुक्तीची...

#सुधा_म्हणे: भक्तीवाचून मुक्तीची...

14 डिसेंबर 23

मनुष्य रोजच्या आयुष्यात आपापली कामे करतो आणि ईश्वराची भक्ती करतो ती बहुतेकदा कोणतातरी

हेतू मनात ठेऊन. ज्या माणसांना निरपेक्ष जगता येते ती संत माणसे. कित्येकदा अशी माणसे आसपास

दिसतात आणि त्यांच्याकडे पाहून एक शांत जाणीव आपल्या मनभर पसरून जाते. अशाच एका माणसाची

आठवण या गाण्यामुळे आठवणीत भरून राहिली आहे.

एकेकाळी रोज सकाळी लवकर उठून कामावर गेल्यावर तिथे एका टपरीवर आम्ही मित्रमंडळी चहा

प्यायचो. टपरी चालवणारे पांडूमामा वारकरी होते. सगळ्यांशी प्रसन्न हसत बोलायचे. ते नोकरीचे

सुरुवातीचे दिवस. खूप कमी पगार असायचा. कधी रोजच्या चहाला देखील पैसे नसायचे. त्यामुळे टपरीवर

आमची उधारी असायची. तिथे वही ठेवलेली असे. त्यात आपणच आपली नोंद करायची, महिन्याचा पगार

झाला की पैसे द्यायचे अशी पद्धत.

एकदिवस त्यांना विचारले की मामा कुणी काय नोंद केलीये हे तुम्ही बघत नाही. प्रत्येकाला आपला हिशोब

स्वतःच बघ सांगता आणि महिनाअखेरीला तो देईल ते पैसे घेता. पण तुम्हाला कुणी फसवले तर..?

ते फक्त हसले म्हणाले, अरे, दहापैकी एखादा असतो, कधी 10-20 रुपये कमी लिहितो वहीत. त्याचे

त्याला माहिती असते की आपण या मामाला फसवले आहे. त्याच्याशी माझी वागण्याची पद्धत बदलत

नाही. त्यामुळे माझ्या मनावर कसलेच टेन्शन नसते, त्याला मात्र आपण केलेल्या एका चुकीचे कायम

स्मरण राहते. त्याचे मन एकतर स्वतःला खात राहते किंवा तो अधिक मोठे गुन्हे करायला निर्ढावतो.

दोन्हीमध्ये नुकसान त्याचेच.


मी म्हटले, मामा तुम्ही तर संत माणूस आहात. मग हसले आणि म्हणाले, तसे नाहीये. माझीही कुठे

सुटका झालीये सगळ्यातून. पण कुठे जायचे आहे हे आता कळू लागलंय. आपण कायम आपल्या मस्तीत

जगतो. लहानपण,तरुणपण उलटून अगदी अंथरुणावर पडलो की मग देव आठवू लागतो. आपण फक्त

पोटासाठी, आपल्या घरच्यांच्यासाठी कामे करतो आणि आयुष्याच्या शेवटी काहीही न करता देवाने कृपा

करावी, मुक्ती द्यावी असे म्हणतो. देव कनवाळू आहे म्हणून तो नीट वागतो पण आपण खरे त्याचे

अपराधीच आहोत. त्याच्यातले कनवाळूपण आपल्यात आले तर जगण्याला खरा अर्थ आहे. त्यापुढे काही न

बोलता मग गाऊ लागले;

भक्ती वाचून मुक्तीची मज, जडली रे व्याधी

विठ्ठल मीच खरा अपराधी || धृ ||

ज्ञानेशाचे अमृत अनुभव, अनुकम्पेचे नेत्री आसव

स्वप्न तरल ते नकळे शैशव, विरले त्यांत कधी... विठ्ठला || १ ||

संत तुक्याची अभंगवाणी, इंद्रायणीचे निर्मळ पाणी

मीच बुडविला दृष्ट यौवनी, करुणेचा हा निधी.. विठ्ठला || २ ||

सरले शैशव स्वच्छंदीपण, नुरले यौवन नुरले मी पण

परी न रंगले प्रमत्त हे मन, तुझ्या चिंतनी कधी.. विठ्ठला || ३ ||

आज जवळपास तीस वर्षे उलटून गेली. रस्त्याच्या रुंदीकरणात कधीतरी ती टपरी पण गेली. त्या भागात

अनेक वर्षे गेलोदेखील नाही. आता मामा कदाचित या जगात नसतील देखील. रोजच्या धावपळीत कधीतरी

जेंव्हा जेंव्हा हा अभंग कानावर पडतो तेंव्हा त्यांची हमखास आठवण येते. अस्वस्थ असलेलं मन शांत

शांत होऊ लागते..!

-सुधांशु नाईक (9833299791)

No comments:

Post a Comment