20 डिसेंबर 23
आयुष्यात आपल्याला काय हवे असते? उत्तम शिक्षण, आपले आयुष्य सुरळीत सुरू राहावे यासाठी उत्तम आर्थिक तरतूद आणि हवीहवीशी साथसंगत. माणसे आयुष्यात शिक्षण, नोकरी/व्यवसाय हे सगळे आपल्या पायावर धडाडीने उभे करू शकतात. जेंव्हा आपल्याला हवी तशी सोबत लाभते तेंव्हा मग आयुष्याला दृष्ट लागू नये असे वाटू लागते.
एखाद्या चित्रपटासाठी गीत लिहिताना देखील ते किती सुंदर लिहिता येते हे आपल्याला मराठीत गदिमा, जगदीश खेबुडकर, शांता शेळके, सुधीर मोघे आदि प्रतिभावान गीतकारांमुळे कळले. सिनेमासाठी गीत लिहायचे असले तरी ते सुंदरच असायचे. “माझं घर माझा संसार” या चित्रपटातील हे गाणे तुलनेने कमी ऐकले जाते पण त्यातील भावना आणि गोडवा नक्कीच कुठे उणावत नाही.
एखादी उत्तम कविता असावी असे हे गीत आणि त्याला अरुण पौडवाल यांनी दिलेली छान चाल. अरुण पौडवाल एक गुणी संगीतकार होते. अनिल मोहिले आणि अरुणजी यांनी अनेक चित्रपटांसाठी सुरेख रचना दिल्या. सुधीर मोघे यांचे हे गीत सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल नेहमीच्याच सुबकतेने गातात पण गाणे ऐकून संपले तरी यातील शब्द आपली पाठ सोडत नाहीत.
दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !
एकमेकांचे झालेले दोघेजण नवा संसार सुरू करतात. त्यासाठी कितीतरी स्वप्ने पाहतात. ती फक्त स्वप्ने नसतात तर त्या स्वप्नाना पूर्ण करायला दोघे सिद्ध होतात. त्यांना खूप मोठ्या ऐषोरामाची ओढ नाहीये. आपले घर असे हवे की जिथे दोघांची स्वप्ने साकार होतील. आपल्या दोघांचे जग इतके सुंदर असावे की तिथे जगातील सारी सुखे फिकी पडावीत. तिथे असावा आनंद आणि समाधान.
स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे
दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे
आनंदाची अन् तृप्तीची शांत सावली इथे मिळे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !
मुळात आपल्याला हवे तसे नाते जन्म-जन्मातून कधीतरी लाभते. आपल्याला एकमेकाना जपायचे आहे हे त्या दोघांना जितके उमगलेले असते तेवढे अन्य कुणाला समजणार? तिथे ईर्षा नसते तर आपल्या जिवलगाचे गुण फुलवत नेण्यासाठी दिलेला आधार असतो. त्याने उत्तम आयुष्य आनंदात घालवावे यासाठी दिलेली सोबत असते.
जुळलेले नाते अतुट घडे जन्मजन्मांची भेट
घेऊनिया प्रीतिची आण एकरूप होतील प्राण
सहवासाचा सुगंध येथे आणि सुगंधा रूप दिसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !
एकमेकांच्या प्रेमाचा, सहवासाचा सुगंध लाभलेली अशी नाती असताना मग स्वर्ग देखील इथेच निर्माण होतो, वेगळ्या स्वर्गाची आसक्ती उरतच नाही हेच खरे. जगभर सर्वत्र असे लोक सुखाने जगत राहिले तर अवघे जगच किती सुंदर होईल ना ?
-सुधांशु नाईक (9833299791)🌿
No comments:
Post a Comment