marathi blog vishwa

Wednesday, 13 December 2023

पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला..

#सुधा_म्हणे: पान जागे फूल जागे,भाव नयनी जागला..

13 डिसेंबर 23

मराठी भावगीतातील युगुल गीतांची परंपरा फार जुनी. त्यातही आशा भोसले आणि सुधीर फडके यांची युगल गीते गेली कित्येक दशके लोकांना सदैव भुरळ घालतात. त्या गाण्याना सामान्य माणसाच्या हृदयापर्यन्त पोचवण्यासाठी महत्वाचे ठरायचे ते त्या गीताचे सहजसुंदर शब्द. ग दि माडगूळकर आणि त्यांच्या पाठोपाठ जगदीश खेबुडकर यांनी कायमच अत्यंत सोप्या शब्दातील आशयसंपन्न गाणी लिहिली. प्रणयरम्य गीते लिहिताना देखील त्यांचा तोल कधी ढळला नाही. उलट प्रेम, प्रीती आदि भावनाना त्यांनी एक सुरेख रुपडे दिले. खेबुडकर यांनी लिहिलेले हेदेखील त्यातलेच एक अग्रणी गीत.

चंद्र,चांदण्या, वारे, फुले आदि प्रतीके तर कायमच सगळीकडे वापरली जातात. मात्र त्यांचा सुयोग्य क्रम साधत खेबुडकर लिहितात तेंव्हा ते शब्द प्रत्येकाला आपलेसे वाटतात. मुळात नाना उर्फ जगदीश खेबुडकरांची शब्दरचना अतिशय सोपी. कोल्हापूर जवळच्या गावातला त्यांचा जन्म. पुढे नानानी शिक्षणसंस्थेत अनेक वर्षे उत्तम नोकरी केली. लहान मुलांपासून अनेकांशी त्यांचा वैयक्तिक संपर्क. प्रत्येकाला समजेल उमजेल अशी भाषा त्यातूनच फुलत गेली असावी. त्यामुळे सामान्य लोकांना त्यांचे गाणे आपले गाणे वाटू लागते. आशाताई आणि बाबूजींचा आवाजात जेंव्हा हे प्रणयरम्य गीत ऐकू येते तेंव्हा भर दुपारी देखील चांदण्यांची शीतलता अनुभवत आहोत असे भासू लागले नाही तरच नवल...

पान जागे फूल जागे भाव नयनी जागला

चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला !

चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रिला

चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला !

स्पर्श हा रेशमी हा शहारा बोलतो

सूर हा ताल हा जीव वेडा डोलतो

रातराणीच्या फुलांनी देह माझा चुंबिला !

“चांदण्याचा गंध आला.. पौर्णिमेच्या रात्रीला..” असे हळवे हळवे तरल बोल लिहिणे ही किती कठीण गोष्ट. नाना सहजपणे जे अलवार लिहून जातात त्याची नजाकत ओळखून मग बाबूजी आणि आशाताईनी या गाण्याला एक वेगळाच लाडीक स्वर लावलाय. ते शब्दांत सांगून थोडेच कळणार? गाणे ऐकताना ते आपोआप मनात झिरपत जाते..उमगत जाते.

लाजरा बावरा हा मुखाचा चंद्रमा

अंग का चोरिसी दो जिवांच्या संगमा

आज प्रीतीने सुखाचा मार्ग माझा शिंपिला !

मधुकंस रागाच्या जवळपास जाणारी ही सुरावट इतकी मधाळ आहे की  हे गाणे ऐकत ऐकत निःशब्द व्हावं. जिवलगाच्या जवळ बसून बागेत फुललेल्या रातराणीचा धुंद गंध अनुभवत राहावं. तो चंद्र, ती पौर्णिमा, तो सहवास आणि तो सुगंध यांचीच मग एक कविता बनून जाते..! आयुष्य सुंदर आहे यावरील विश्वास अधिकाधिक दृढ होऊ लागतो.

-सुधांशु नाईक (9833299791)

No comments:

Post a Comment