22 डिसेंबर 23
रेडिओवरून कायम ऐकू येणारी मराठी भावगीते आणि चित्रपटातील भावगीते हा मराठी जनांसाठी एक अनमोल असा ठेवा आहे. सी. रामचंद्र, सुधीर फडके, वसंत पवार, राम कदम आदि गुणवान संगीत दिग्दर्शकांमध्ये वसंत प्रभू यांचे नाव देखील अग्रगण्य आहेच. अतिशय मधुर अशा त्यांच्या कितीतरी रचना सहज आपल्या ओठावर रुळत राहतात. हे गीत असेच. शब्दातून भाव-भावनांचे प्रत्ययकारी चित्रण करणाऱ्या जनकवी पी. सावळाराम यांनी लिहिलेले हे गाणे. काल 21 डिसेंबर त्यांचा स्मृतिदिन होता. त्यांच्यासारख्या कलाकाराला आपण विसरणे अशक्य!
पुत्र व्हावा ऐसा.. या चित्रपटातील सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील हे गाणे ऐकले की कुठेही असलात तरी आपले पाय क्षणभर थबकतात. गाणे ऐकताना मनात जणू आनंदाची कारंजी थुई थुई उडू लागतात. एका अनोख्या तरल भावनेने आपले मन प्रफुल्लित होऊन जाते. ही किमया असते त्या सुरांची,लयीची आणि आवडत्या जिवलग व्यक्तीच्या प्रतिक्षेची.
नदी आणि समुद्र हे असेच जिवलग. तो तिच्यासाठी उसळत राहतो, गर्जत राहतो. पुकारत राहतो. ती डोंगर उतरून भन्नाट वेगाने त्याच्याकडे धावू लागते. वाटेतील डोंगर, दऱ्या, गावे यांना वळसा घेत, प्रसंगी काळे कभिन्न कठीण कातळ फोडून त्यातून वाहत राहते. कधी अडखळते,ठेचकाळते, कधी मनसोक्त उचंबळत राहते.
त्याची भेट दृष्टिक्षेपात येताच शांत शांत होऊन जाते. अलगद त्याच्या कुशीत शिरते.
अशा जागी मी तुला भेटायला येऊन थांबते ही कल्पनाच किती रम्य आहे. मनोहर आहे. अनेक वर्षे आवडत असणारे हे गीत कधीही ऐकत राहावे असेच आहे.
जिथे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट पाहते
डोंगर-दरिचे सोडून घर ते, पल्लव-पाचूचे तोडून नाते
हर्षाचा जल्लोष करुनी जेथे प्रीत नदीची एकरुपते..
वेचित वाळूत शंख-शिंपले, रम्य बाल्य ते जिथे खेळले
खेळाचा उल्हास रंगात येउनी धुंदीत यौवन जिथे डोलते
बघुनी नभींची कोर ती,सागर हृदयी ऊर्मी उठती
सुखदुःखाची जेथे सारखी प्रीतजीवना ओढ लागते..
बालपणी याच समुद्राकाठी लहान मुले खेळत राहतात तर याच संगमी दोन प्रेमी जीव एकमेकांच्या कुशीत विसावा शोधतात. चंद्राला पाहून सागराला भरती येते हा रुक्ष वैज्ञानिक वाक्यासाठी “बघूनी नभीची चंद्रकोर ती.. सागर हृदयी उर्मी उठती..” इतके लोभस, हळूवार पी. सावळाराम लिहून जातात तेंव्हा अक्षरश: सलाम करावासा वाटतो त्यांच्या प्रतिभेला.
तिच्या कपाळावरील नाजूक चंद्रकोर पाहून प्रत्यक्ष चंद्राच्याही मनी प्रेमाचे भरते येत असेल ना? असे विचार मनी येत रहातात. हे गोड गाणे आपल्या हृदयी जो हर्षोल्हास निर्माण करते ते ते सगळे शब्दात कसे मांडायचे? सगळे काही शब्दांच्या पलिकडले आहे..!
-सुधांशु नाईक (9833299791)
No comments:
Post a Comment