11 डिसेंबर 23
ईश्वराविषयी आपल्याला कायमच कुतूहल. अगदी आदिमानव टप्प्यापासून प्रत्येक टप्प्यावर माणसाने कुणाला तरी देवत्व दिले आहे. अग्नी, वारा, नदी,समुद्र, पाऊस,सूर्य, चंद्र आदि निसर्गाची रुपे असोत किंवा अनेक ऋषि, महान माणसे असोत या सगळ्याना देवत्व द्यायची आपल्याला फार घाई असते.
आपल्याला कितीही काही मिळाले तरी मागण्या मात्र संपत नाहीत. त्यासाठी मग या देवाचे देऊळ, त्या संतांची समाधी, हे तीर्थक्षेत्र असे लोक भटकत राहतात. कित्येकदा देवाची कृपा व्हावी यासाठी फिरणारी ही माणसे आसपासच्या लोकांशी मात्र अजिबात माणुसकीने वागत नाहीत.
त्यांच्यावर सणसणीत चाबूक ओढताना मग मंगेश पाडगावकर म्हणतात;
कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी..
ईश्वर काय फक्त मंदिरात असलेल्या दगडांच्या, धातूच्या मूर्तीत असतो का? जगायला उपयुक्त असे सगळे जिथून मिळते त्याला ईश्वर मानायला काय हरकत आहे? ही माणसे या सगळ्याकडे का देव समजून बघत नाहीत. त्यातही झाडे, नदी, पाऊस हे सगळे किती निःस्वार्थी असतात. जे आपल्याकडे आहे ते सारे मुक्तपणे इतराना वाटून टाकतात. माणसे मात्र अशी वागत नाहीत.
हे सोप्या भाषेत पाडगावकर सांगत राहतात;
झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहिले डोळे उघडुन
वर्षाकाळी पाउसधारा, तुला न दिसला त्यात इषारा
काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी..
सुधीर फडके यांच्या आवाजात मुळातच एक नैसर्गिक गोडवा. हे गीत त्यामानाने परखड. कठोर ताशेरे ओढणारे. तरीही या गीतातील तो भाव अगदी चटकन त्या सुरांतून आपल्या हृदयापर्यन्त पोचतो ही त्यांची जादू. आपला पोषाख, वर्तणूक यामधून जे विसंगत वर्तन विविध बुवा, महाराज करत राहतात ते देखील त्यांच्या नजरेतून अजिबात सुटत नाही.
रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा
कधी न घेउन नांगर हाती, पिकविलेस मातीतुनि मोती
हाय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासुन जाशी..
ईश्वर कुठे आहे हे कितीदा सांगितले तरी लोकाना उमगत नाही. त्यामुळे त्यांना ते कळावे यासाठी पोटतिडकीने स्पष्टपणे सांगत बाबूजी गात राहतात;
देव बोलतो बाळमुखातुन, देव डोलतो उंच पिकांतुन
कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी
अवती भवती असुन दिसेना, शोधितोस आकाशी..
ज्याना या झाडा-फुला-पानात-शेतात आणि दीनदुबळ्या लोकांमध्ये ईश्वर दिसतो तीच खरी देवमाणसे. समाजातील असुरप्रवृत्ती नष्ट होऊन देवप्रवृत्तीची वाढ व्हावी यासाठी पथदर्शक असणारे हे गीत आपल्या सर्वानाच आवडते. ते नुसते न आवडता आपल्या आचरणात उतरावे याची आता अधिकाधिक गरज आहे असे मला वाटते.
-सुधांशु नाईक (9833299791)🌿
No comments:
Post a Comment