30 डिसेंबर 23
‘ पोटासाठी भटकत जरी... दूरदेशी फिरेन.. मी राजाच्या पदरी अथवा घोर रानी शिरेन.. नेवो नेते जड तनुस या दूर देशास दैव, राहे चित्ती प्रिय मम परी जन्मभूमी सदैव... “ अशी कविता मनाच्या एका उत्कट अवस्थेत वासुदेवशास्त्री खरे लिहून गेले. दूर वैराण प्रांतात जगताना मनातील हिरवेगार कोकण जपत राहिले.
आपण ज्या गावी जन्मलो, जिथं वाढलो किंवा जे गांव आपले कर्मभूमी बनले ती ती सारी गांवे आपल्या मनात एक खास अशी जागा निर्माण करतात. प्रत्येक गावाचे काहीतरी वैशिष्ट्य असतेच. माणसे, खाणे पिणे, निसर्ग, रूढी किंवा गांव परंपरा हे सारं काही त्या वातावरणाचा एक भाग बनून जातं. गावाची आठवण आली की सगळं सगळं नजरेसमोरून तरळत रहातं. प्रत्येक माणसाच्या मनात एक स्वप्नातले गांव असते. ते रम्यच असते. श्रेष्ठ कवी ग दि माडगूळकर अशाच एका स्वप्नातील गावाविषयी किती सुंदर लिहून गेलेत पहा ;
मजे आवडले हे गाव !
नदी वाहती घाट उतरते
तीरावरती गोधन चरते
हिरवी मळई जळा चुंबिते
इकडून तिकडे, तिकडून इकडे
खेपा करिते नाव
मज आवडले हे गाव !
चहु बाजूला निळसर डोंगर
मधे थिटुकले खेडे सुंदर
निंब, बाभळी, अंबा, उंबर
हलुनी डुलुनी सपर्ण फुलुनी
करिती शीतळ छांव
मज आवडले हे गाव !
घरे ठेंगणी, वळत्या वाटा
चावडीपुढचा रुंद चव्हाटा
राऊळ शिखरी उंच बावटा
भगव्या रंगे जगास सांगे
वंश कुळाचे नाव
मज आवडले हे गाव !
वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत “गाठ पाडली ठका ठका” या चित्रपटसाठी लतादीदीनी गायले होते. हे गीतच इतके चित्रदर्शी आहे की डोळ्यासमोर नदीकाठी असलेला तो चिमुकला गांव दृग्गोचर होऊन जातो. डोंगराच्या बेचक्यात असलेलं ते हिरवंगार गांव, तिथं असलेली वनराई, गावातील मंदिर, जवळच्या नदीकाठी कुरणात चरणारे गोधन, त्यांच्या गळ्यातील घंटेचा किणकिणाट हे सारं सारं नुसतं आठवलं, कल्पनेतून दिसलं तरी मनाला फार सुखावत राहते. एक हवीहवीशी शांतता देऊन जाते.
हल्लीच्या आपल्या प्रचंड धावपळीच्या जगात आपण शांतताच हरवून बसलो आहोत. दरवर्षी नवीन धोरणे, नवे उद्दिष्ट, नवीन स्पर्धा यात गुरफटून गेलो आहोत. आपल्या जगण्यामुळे गावांचे गावपण देखील हरवून गेले आहे. मात्र असं शान्त सुंदर गांव तुम्हाला मला सगळ्यांना कायमच हवं असतं. नवीन वर्षात आपापल्या स्वप्नांचे गांव सर्वांना मिळत राहोत अशी प्रार्थना करून आपण जुन्या वर्षाला आता निरोप देऊया असं मला वाटतं.
- सुधांशु नाईक (9833299791)🌿
No comments:
Post a Comment