15 डिसेंबर 23
बाळ कोल्हटकर हे मराठी नाट्यसृष्टीतील एक फार मोठे नाव. त्यांच्या प्रतिभेच्या, त्यांनी केलेल्या निर्मितीच्या अनेक गोष्टी सर्वाना ठाऊक आहेत. देव दीनाघरी धावला, वाहतो ही दुर्वाची जुडी, दुरितांचे तिमिर जाओ अशा नाटकांचे त्याकाळी सुमारे दीड दीड हजार प्रयोग त्यांनी केले. उठी उठी गोपाळा, ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, आई तुझी आठवण येते आदि त्यांनी लिहिलेल्या गीतांना अपार लोकप्रियता लाभली. दुर्वाची जुडी या शब्दांचे वापर करून त्यांनी त्या नाटकात केलेल्या चारोळीवजा रचना एकेकाळी अतिशय गाजल्या होत्या. मराठी प्रेक्षकांना नाटकात नेमके काय पाहायला हवे असते याचे त्यांनी बांधलेले आडाखे तेंव्हा अचूक ठरले होते. जरा जास्त भावनोत्कट असलेली त्यांची नाटके म्हणूनच गाजली होती.
पं. कुमार गंधर्व, भालचंद्र पेंढारकर यांच्याप्रमाणे त्यांनी पं. भीमसेन जोशी यांच्या रसिकप्रिय आवाजाचा आपल्या नाटकासाठी समावेश केला होता. इतकेच नव्हे तर नाटकाला संगीत देण्यामध्ये देखील त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले होते. आपण नेहमी विविध प्रार्थना म्हणत असतो. बाळ कोल्हटकर यांनी लिहिलेली ही प्रार्थनाच आहे जणू. भीमसेन जोशी यांच्या घनगंभीर आवाजात ऐकताना आपलेही मन विशाल व्हावे असे वाटू लागते. आयुष्यात आपल्याला आनंद हवा असतो. पण आनंद नेमका कशात असतो, तो फक्त पैशात थोडाच असतो ? आनंदाच्या प्रत्येकाच्या कल्पनाही भिन्न असतात. इथे आनंद कसा हवा हे सांगताना कोल्हटकर लिहितात,
अवघा आनंदी आनंद
मना घे हा छंद
नलगे धनसंपदा
शुद्ध बुद्धी देई सदा
नांदो जनात आनंद
सत्य सदा समतानंद..
समदृष्टी विश्व पहावे
दुसरा आपण होऊन जावे
जीव शिवाला भेटतो,
तेथे होतो नामानंद...
"आता विश्वात्मके देवे... "असं म्हणणारे ज्ञानोबा असोत किंवा अन्य संत, ते सगळे हेच तर सांगत असतात. “समदृष्टी विश्व पहावे, दुसरा आपण होऊन जावे..” ही भावनाच किती सुरेख आहे ना? प्रत्येक माणसाला आयुष्यात फक्त शुद्ध आनंद मिळत राहावा ही जाणीव प्रत्येकाला होणे म्हणजेच इथले जीवन सुखदायी होणे नव्हे का ?
-सुधांशु नाईक (9833299791)🌿
No comments:
Post a Comment