marathi blog vishwa

Monday, 18 December 2023

नमस्कार माझा हा ज्ञानमंदिरा...

#सुधा_म्हणे: नमस्कार माझा हा ज्ञानमंदिरा...
18 डिसेंबर 23
शाळा. आपल्या आयुष्याला खरा अर्थ देणारी जागा. जरासे कळू लागते आणि आपल्याला शाळेत नेऊन सोडले जाते. घरातील मायेच्या माणसांमधून आपण एकदम मोकळ्या जगात येतो. विविध परिस्थितीत जगणारी कित्येक मुले आजूबाजूला असतात. सगळ्यांशी जुळवून घ्यावे लागते. शिकवणाऱ्या शिक्षकांशी देखील आपले नाते जुळते. कित्येकदा असे होते की घरात आई-बाबांनी सांगितलेली एखादी गोष्ट कदाचित मूल ऐकत नाही. पण शाळेतील बाईनी सांगितले तर हमखास ऐकते.
बाई,ताई,मॅडम असे तुम्ही त्यांना काही म्हणा, बालवाडी आणि प्राथमिक शाळेत असणाऱ्या या शिक्षिका मुलांना फार मायेने सांभाळतात. विविध बडबडगीते शिकवताना उत्तम अशी गाणी, प्रार्थना हे देखील मुलांना सहज शिकवतात. भावगर्भ आशय असलेल्या कविता, त्या प्रार्थना मुलांच्या मनात खास असा ठसा उमटवून जातात. पुढील आयुष्यात जेंव्हा कधी एखाद्या वेळी एखादी प्रार्थना किंवा गीत आठवते तेंव्हा शाळेतील त्या प्रसन्न दिवसांची आठवण मनात दरवळू लागते. मन प्रसन्न होऊन जाते. सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या मधुर स्वरात सजलेली ही प्रार्थना देखील अशीच.. शाळेला वंदन करणारी..!

नमस्कार माझा हा ज्ञानमंदिरा ।
सत्यम शिवम सुंदरा ।। धृ ।।
शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे ।
प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा ।
ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा ।। १ ।।

आयुष्यात आपल्याला काय हवे असते ? शक्ति, भक्ती, युक्ती, नीती आणि प्रगती. हे सगळे इतक्या छोट्याशा प्रार्थनेत बसवताना खेबुडकर किती सुंदर शब्द वापरुन जातात. आपले आयुष्य घडवायला पैसा लागतो ही जाणीव खूप उशिरा येते. तोवर शाळा आपल्याला अभ्यास शिकवते, वागावे कसे, बोलावे कसे हे शिकवते. आपल्यात जन्मजात एखादे कला गुण असल्यास त्याला प्रोत्साहन देते.

विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास ।
नाव नेई पैलतीरी दयासागरा ।
ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा ।। २ ।।
होऊ आम्ही नितीमंत, कला गुणी, बुद्धीमंत ।
कीर्तीचा कळस जाई, उंच अंबरा ।
ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा ।। ३ ।।

जेंव्हा एखादे मूल उत्तम शिक्षण घेऊन, आपले कलागुण विकसित करून मोठे होते, नावलौकिक कमावते तेंव्हा त्याच्या घरातील सदस्याइतकेच त्याला शाळेतील शिक्षक देखील सहाय्यक ठरलेले असतात.
आपण मोठे झाल्यावर जेंव्हा कधी आपल्या शाळेतील बाईंना, सरांना भेटतो, त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करतो तेंव्हा पाठीवरून फिरणारा त्यांचा हात हा ईश्वराचा आशीर्वाद असतो. कोणतीच मागणी नसते त्यांची आपल्याकडे. अशा शिक्षकांमुळे तर ती शाळा ज्ञानमंदिर होऊन जाते. असे ज्ञानमंदिर आपल्याला लाभले, तसेच पुढल्या पिढ्यांना देखील मिळायला हवे ना?
-सुधांशु नाईक (9833299791)🌿

No comments:

Post a Comment