01 डिसेंबर 23
रसिक मित्र हो, सुरेश भट यांच्या कविता हे एक वेगळेच जग आहे. तिथली विरहवेदना, तिथला आक्रोश, तिथले उत्कट प्रेम, तिथली मादकता आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठलेले तिथले बंडखोर देखणे उद्दामपण हे सारे अतिशय संमोहित करणारे असेच. भट यांची कविता नुसती कानावर पडत नाही तर थेट काळजात घुसते.
आपल्या प्रिय व्यक्तीसाठी आतुरलेला जीव कसा असतो हे सांगण्यासाठी किती किती गीते सर्व भाषेत युगानुयुगे लिहिली गेली. तिच्या सहवासाला आतुरलेल्या मनातील भाव कसे असतील याबद्दल हळवे हळवे लिहिताना सुरेश भट म्हणतात,
गीत आसावले तुझ्यासाठी,
सूर खोळंबले तुझ्यासाठी..
तू मला अर्थ दे अजून तरी,
शब्द ओलांडले तुझ्यासाठी...
ही तुझी रात, हे तुझे तारे ,
श्वास घेती फुले तुझ्यासाठी...
आयुष्याला तेव्हाच अर्थ येतो जेंव्हा कुणासाठी तरी आपण सगळी बंधने झुगारून पुढे निघून जातो. जिच्यासाठी अवघे विश्व जणू थांबले आहे ती व्यक्ती आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे असे वाटणेच किती लोभस असते ना. ? हळूहळू तारकामधून तेजाळत गेलेली रात्र आणि फुललेल्या सुगंधी फुलांनाही तिचीच ओढ वाटणे हे फार अलवार असेच आहे.
जगात जगण्यासाठी रोज धडपडताना आपण आपल्या मनाचे कोवळेपण जणू विसरून जातो. असंख्य गोष्टी सोसलेल्या, भोगलेल्या सुरेश भटांची प्रतिभा मात्र तरीही तरलपणे पुढे सांगत रहाते, अरुण दाते यांच्या आवाजात ही रचना अजूनच हळूवार होऊन जाते.;
दूर येथून दूर-दूर तिथे
चांदणे थांबले तुझ्यासाठी...
का तुला सोडवे न गाव तुझे?
मी मला सोडले तुझ्यासाठी..
एखाद्यासाठी अवघे जग बाजूला ठेऊन एकाने निघून येणे आणि दुसऱ्याची वाट पाहणे किती वेगळे. त्यात प्रत्येकाच्या भोवती असलेले विविध पाश, ती बंधने.... सगळ्याना कुठे हे सारे सहज दूर करता येते.? ज्याना हे सगळे पाश भेदून त्या पलीकडे जाऊन आपल्या जिवलगाला भेटता येते हे किती सुखद. तीव्र विरहव्यथा कुणाला भोगाव्या लागू नयेत असे आपल्याला वाटत असले तरी विरहव्यथा घेऊन येणारी अशी गाणीच आपल्याला जास्त भुरळ घालतात हे कसे विसरता येईल ? “है सबसे मधुर वो गीत जिन्हे हम दर्द के सूर में गाते है..” असे शैलेन्द्र म्हणतो ते खरेच आहे.
मित्र हो, “सुधा म्हणे..” लेखमाला यंदा सुरू झाली आणि हा आता शेवटचा महिना. काही छान गाण्यावर मोजकेच लिहावे त्यामुळे तुमच्या मनात ती गाणी निनादत राहतील, काही आठवणी येतील, वर्षाचा हा शेवटचा महिना प्रसन्न व्हावा अशीच इच्छा आहे. विविध गाण्यांवरील हे छोटेसे लेख वाचून तुम्हाला काय वाटते ते अवश्य कळवाल ना.?
-सुधांशु नाईक(9833299791)🌿
No comments:
Post a Comment