27 डिसेंबर 23
संगीत हे शब्दातीत असतं असं म्हटलं जातं. स्वर स्वयंभू असतात. शान्तपणे कुणी स्वर साधना करत असेल तर जे गारुड वातावरणात निर्माण होतं ते फार अलौकिक भासते हे खरेच. पण म्हणून शब्दांचे महत्व कमी होत नाही. जेंव्हा अलौकिक स्वरांना शब्दांच्या सामर्थ्याची जोड लाभते तेंव्हा ते संगीत सामान्य माणसांना जास्त भुरळ घालते. त्यातही दिग्गज गीतकार जेंव्हा ईश्वर प्रार्थनेसाठी गीत लिहितात त्यावेळी त्याला एक वेगळाच आयाम मिळून जातो.
आता हेच पहा ना, एखाद्याला आपण 'राग केदार ऐकूया' असं सांगितल्याने कदाचित सामान्य लोकांना नेमकं काय ऐकतोय हे कळणार नाही पण कोकिळा गा... हे गाणं किंवा जिवलगा कधी रे येशील तू… हे गाणं किंवा हिंदीतला गाजलेला चित्रपट गुड्डी मधले " हम को मन की शक्ती देना…" हे गाणं ऐकायला त्यांना नक्कीच आवडते. ती गाणी केदार रागावरच आधारलेली.
हम को मन की शक्ती देना यासाठी दिग्दर्शक हृषीदा यांनी गुड्डी चित्रपटात किती सुंदर जागा तयार केली. गुलजार यांनी लिहिलेले गाण्याचे बोल देखील अतिशय सुंदर आणि ज्येष्ठ संगीतकार वसंत देसाई यांचे संगीत देखील. वाणी जयराम यांच्या आवाजातील हे गाणं अनेक पिढ्यामध्ये उत्तम प्रार्थना म्हणून गाजलं नसतं तरच नवल होतं.
हम को मन की शक्ति देना, मन विजय करें
दूसरोंकी जय से पहले, खुदकी जय करें
हम को मन की शक्ति देना ...
भेद-भाव अपने दिलसे, साफ़ कर सकें
दूसरोंसे भूल हो तो, माफ़ कर सकें
झूठ से बचे रहें, सचका दम भरें
दूसरोंकी जयसे पहले, खुदकी जय करें
हम को मन की शक्ति देना ...
सतत अनेक प्रकारे आपण भेदभाव करत असतो. उच्च नीच जाती किंवा धर्माच्या आधारावर, गरिबी किंवा श्रीमंतीच्या जोरावर एक दुसऱ्याला हिणवत रहातो. आपल्या मनातील ही सारी जळमटे आता स्वच्छ व्हायला हवीत, क्षमाशील वृत्ती आपल्यात वाढायला हवी. भांडणे, दुस्वास, मत्सर हे सारे दोष आपल्या मनातून दूर जावेत ही प्रार्थनाच किती विशाल हृदयाचे दर्शन घडवते. आता 4,5 दिवसात नवे वर्ष नवीन स्वप्ने, नवीन उमेद घेऊन येईल. त्यावेळी आपल्याला असं प्रसन्न आणि निकोप मनानं त्याचं स्वागत करता आलं तर किती छान असेल ना?
- सुधांशु नाईक (9833299791)🌿
No comments:
Post a Comment