#सुधा_म्हणे: आयुष्य हे चुलीवरल्या..
29 नोव्हेंबर 23
मित्रहो, तुळशीचे लग्न लागले आणि आता सर्वत्र लग्नसराई सुरू झाली. आपल्या देशात लग्नसराई ही गोष्ट केवळ दोन जीवांचे मिलन यापुरतीच मर्यादित नसते तर त्यात विविध कुटुंबे, व्यावसायिक आदि शेकडो लोक कळत नकळत सहभागी होऊन जातात.
वयात आलेल्या दोन जीवांना एकमेकांची ओढ वाटणे ही नैसर्गिक गोष्ट.
त्याभोवती आपल्या समाजाने इतक्या प्रकारची फोडणी देऊन ठेवली आहे की लग्न ही गोष्ट मग दोन माणसांच्या हातात उरतच नाही त्यात अनेक कुटुंबे एकत्र येतात, रूढी असतात, रीतीरिवाज असतात आणि मग ओठावर गाणे येते;
भिजलेल्या क्षणांना आठवणीची फोडणी
हळदीसाठी आसुसलेले हळवे मन अन कांती
आयुष्य हे चुलीवरल्या कडईतले कांदे पोहे…..
लग्नसराईची तर सगळे विक्रेते आतुरतेने वाट पाहत असतात. हॉलवाले, केटरिंगवाले, दागिनेवाले, हार फुलं विक्रेते, कपडेवाले, घोडेवाले, शिंपी, मेकअपवाले, फोटो-विडिओवाले, मिठाईवाले अशा अनेक व्यवसायांचे गणितच मुळी लग्नसराईच्या दिवसांवर अवलंबून असते. भारताच्या अर्थव्यवस्थेची गणितेच वेगळी असतात. इथे उत्सव नकोत, थाट माट नको वगैरे कितीही बोलले गेले तरी या सगळ्यामुळे तर पैसा फिरत राहतो. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून पैसा ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे विविध कामांच्या मेहनतीमुळे येत राहतो आपोआप अर्थव्यवस्थेला चालना मिळत राहते.
नात्यांच्या या बाजारातून विक्रेत्यांची दाटी
आणि म्हणे तो वरचा ठरवी शतजन्माच्या गाठी
रोज नटावे रोज सजावे धरून आशा खोटी
पाने मिटूनी लाजळूपरी पुन्हा उघडण्यासाठी
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे….
अनेकांना आपल्याला हवा तसा जीवनसोबती मिळतो तोही याच दिवसात. कधी मने आधी जुळतात आणि मग लग्ने होतात तर कधी आधी लग्ने होतात आणि मग मने जुळू पाहतात. याबाबतीतले प्रत्येकाचे सगळे अंदाज वेगळे वेगळेच. प्रत्येकीला आपल्या मनातील राजकुमाराची स्वप्ने जशी असतात तशीच त्याला त्याची राजकुमारीदेखील हवी असतेच. कधी भेटतात एकमेकांना हवे असतात तसे दोघेही..
आणि मग आयुष्य जणू परीकथा वाटू लागते...
दूर देशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहताना
कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानी मनी नसताना
नकळत आपण हरवून जावे स्वतः मग जपताना...
असेच प्रत्येकाच्या बाबत घडत राहायला हवे. प्रत्येकजण स्वप्ने पाहतो हव्या असलेल्या जोडीदाराची. ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरवीत, हवंसं वाटाणारे जिवलग लाभणे यासारखा आनंद दुसरा नाही हेच खरे.!
-सुधांशु नाईक(9833299791)🌿
No comments:
Post a Comment