16 नोव्हेंबर 23
माती. आपल्या सगळ्याना जन्म देणारी आणि शेवटी सामावून घेणारी ही माती. इंदिरा संत यांची ही कविता फार हळुवारपणे पद्मजा फेणाणी यांनी पेश केली आणि जाणकार रसिकांनी त्याचे भरभरून कौतुक केले. मुळात इंदिराबाईंचे जगणे, लिहिणे आणि व्यक्त होणे हे सारेच ऋजु आणि मुलायम. प्रीती आणि निसर्गप्रतीची त्यांची ओढ या दोन्ही गोष्टी अलवारपणे त्यांच्या शब्दांतून उमटत राहतात. आणि ते शब्द मग आपल्याला भुलावत राहतात.
मृण्मयी ही त्यांची गाजलेली कविता.
रक्तामध्ये ओढ मातीची मनास मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती मातीचे मम अधुरे जीवन
मातीचा गंध घेताना, लहानपणी मातीत खेळताना, मोठेपणी मातीत कष्ट करून घाम गाळताना पदोपदी आपल्याला मातीचा संग लाभतो. प्रत्येक ऋतूमध्ये मातीतून नवे जीवन सामोरे येते. त्या त्या ऋतूत मातीतून नवे अंकुर, नवी पालवी, नवीन फुले असे किती काय काय उगवून येते. त्या सगळ्याकडे बारकाईने पाहिले की त्यातील देखणेपण स्निग्धतेची एक नवी जाणीव आपल्याला मिळते. निसर्गातील हळवे कोवळे विश्व टिपत जाताना किती सुरेख शब्द या कवितेत ओवले आहेत ते पहा ना;
कोसळतांना वर्षा अविरत स्नान समाधीमध्ये डुबावें
दवात भिजल्या प्राजक्तापरि ओल्या शरदामधी निथळावे।।
वर्षा, शरद आणि हेमंत ऋतूमधील लोभस बारकावे किती अलगद या कवितेत उमटून जातात ना ? त्याच्या आठवणीत दंग झालेली ती प्रिया त्या वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी रंगवत राहतात. वर्षाऋतूत नहात राहणाऱ्या तिची स्नानसमाधी हे शब्द वाचताना डोळ्यासमोर पहिल्या पावसाचे टपोरे थेंब समाधानाने अंगावर घेताना डोळे मिटून दंग झालेली ती डोळ्यासमोर जणू साकार होते. शरद चांदण्यात तर माणसाच्या मनोवृत्ती अधिक हळूवार होतात. इथे मग त्यांना दवात पहाटे निथळणारा कोमल प्राजक्त दिसला नसता तरच नवल होते.
हेमंताचा ओढून शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातल्या फुलाफुलांचे
छापील उंची पातळ ल्यावे।।
असे त्या म्हणतात तेंव्हा वसंतात भरभरून फुलेलेले अमलताश, गुलमोहर, कांचन, पळस आणि पांगाऱ्याची देखणी श्रीमंती डोळ्यासमोर उभी राहतेच. या मातीतून फुलणारे हे ऋतू. आणि याच मातीतून जगत असलेली आपण माणसे एकमेकांच्यात किती एकरूप होऊन गेलो आहोत ना?
-सुधांशु नाईक(9833299791)🌿
No comments:
Post a Comment